रुग्णाचे विश्लेषण आणि समन्वय

    22-May-2023
Total Views |
patient analysis and Coordination

माणूस जेव्हा आजारी पडतो; त्यावेळी माणसाचे शरीर हे एक प्रकारचा बचावात्मक पवित्रा घेत असते व आजारापासून शरीराला वाचवण्यासाठी या पवित्र्यातून सर्वतोपरी प्रयत्न करत असते. त्यासाठी मग ते काही लक्षणेही दाखवत असते, त्यालाच आपण ‘Compensatory Mechanism’ असे म्हणू शकतो.

या पवित्र्याचा अभ्यास करणेही फार महत्त्वाचे असते. त्यामुळे माणसाची रोगप्रवणस्थिती व संवेदनशीलता लक्षात येते. तसेच, आजाराच्या हल्ल्यात माणूस कशाप्रकारे प्रतिकार करतो, त्यावर त्याचे वैयक्तिकीकरण (Individualization) अवलंबून असते. आजारामुळे शरीराची सहजता लोप पावते व सहजता ही साधारणपणे कुठल्याही गोष्टींवर अवलंबून नसते. पण, आजारी पडलेल्या माणसाला बरे वाटण्यासाठी कुठल्यातरी गोष्टीवर अवलंबून राहावे लागते. एखाद्या माणसाच्या मागे जर अचानकपणे वाघ लागला, तर तो माणूस धावत सुटेल. या ठिकाणी धावणे ही क्रिया सहज आहे व त्यातूनच तो स्वत:ला वाचवू शकतो. परंतु, जर एखाद्या माणसाच्या मागे जर एखादे नुकतेच जन्मलेले किंवा अगदी छोटे कुत्र्याचे पिल्लू येत असेल आणि तरीही तो माणूस जीवाच्या आकांताने धावत असेल, तर त्या माणसाचा तो चुकीचा पवित्रा ठरतो. अशा माणसाला भयगंड असू शकतो व त्याला औषधाची गरज असते.

जोपर्यंत माणसाला ‘Compensatory Mechanism’मधून बरे वाटत असते, तोपर्यंत तो आजारी पडत नाही. परंतु, ज्यावेळी यातूनही जेव्हा त्याला मनाजोगतो परिणाम दिसून येत नाही, त्यावेळी त्याची आजारपणाची स्थिती (Diseased) सुरू होते.  उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या वर्गात किंवा क्लासेसमध्ये असे वाटत असेल की, शिक्षक त्याच्याकडे लक्ष देत नाहीत किंवा त्याचे कौतुक करत नाहीत, तर स्वाभाविकपणे त्याला त्याचे वाईट वाटते किंवा राग येऊ शकतो, दु:ख होऊ शकते. परंतु, नुसत्या या स्थितीमुळे तो मुलगा आजारी पडणार नाही. इतक्या सहज जर माणसाची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाली असती, तर माणूस सततच आजारी राहिला असता. अशा परिस्थतीत माणसाची नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू होते. झालेले ‘Damage Control’ करण्याकरिता मग या स्थितीतही मुलगा सुरुवातीला शिक्षकांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न करेल, शिक्षकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करेल.

हा झाली त्याचा ‘Compensatory Mechanism.' या प्रकियेमध्ये जर त्या विद्यार्थ्याला कौतुकाचे बोल मिळाले किंवा त्याला जर असे वाटायला लागले की, आता त्याच्याकडे शिक्षक लक्ष देत आहेत, तर पुढील आजाराची पातळी टाळता येते. परंतु, जर तसे झाले नाही, तर मात्र हळूहळू या मुलाच्या मनात एक प्रकाराची अढी निर्माण होते व त्याच्या मनात काही समज तयार होतात. त्याला ‘स्थितीची निर्मिती’ असे म्हणतात. या मनाच्या स्थितीमधूनच मग लक्षणे व चिन्हे दिसायला लागतात यालाच ‘सायकोलॉजी’ व ‘सायकीयाट्री’मध्ये ‘भ्रमाची अवस्था’ असे म्हटले जाते व ’'Start of Delusion' असे म्हटले जाते. याबाबत आपण आता अजूनही महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत. (क्रमश:)


डॉ. मंदार पाटकर 
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.