कायक वृत्तीचे सतीश पाटील

    22-May-2023   
Total Views |
article on entrepreneur Satish Patil

 सतीश पाटील यांचा बांधकाम मजदूर ते यशस्वी उद्योजक हा प्रवास थक्क करणारा आहे. लिंगायत समाजातच नव्हे, तर पुण्यात सर्वत्रच ते आदरणीय आहेत. त्यांचा जीवनसंघर्ष उलगडणारा हा लेख...

बसवेश्वर महाराजांनी ’कर्म करण्याच्या वृत्तीला ’कायक’ असे नाव दिले. कोणतेही काम आणि व्यवसाय हे हीन किंवा श्रेष्ठ नसते. कोणत्याही कर्मकांडात न गुंतता स्वत:ची भाकरी मिळवण्यासाठी कष्ट करा. कष्ट केल्यावरच स्वर्ग म्हणजे शीव आणि मोक्ष मिळतो, अशी बसवेश्वर महाराजांची शिकवण. कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील बडदाळ गावचे बसवंत गोंडाप्पा पाटील आणि त्यांची पत्नी भागम्मा हे लिंगायत समाजातील दाम्पत्य स्वामी बसेवश्वर महाराजांच्या विचारानुसारच जीवन जगत होते. या दोघांना आठ अपत्य. त्यापैकी एक सतीश. १९६९ साली पाटील यांचे संयुक्त कुटुंब शेतजमिनीच्या वाटणीत विभागले गेले. बसवंत कुटुंबाला घेऊन कामाधंद्यानिमित्त पुण्याला आले. इथे ते कंत्राटी मजूदर म्हणून काम करू लागले. गावात असेपर्यंत सतीश इयत्ता चौथीपर्यंत शिकले होते. पण, पुण्याला आल्यावर तेही बसवंत यांच्यासोबत मातीकामाला जाऊ लागले.

गरिबी असली तरीसुद्धा पाटील यांच्या घरची एक पद्धत होती, ती म्हणजे घरी कुणीही आले तरी त्यावेळी त्याला विन्मुख पाठवायचे नाही. भागम्माबाई तर मजदूर आयाबायांना स्वतः बोलावून घेत. मायेने त्यांची विचारपूस करत. गरम गरम भाकरी-भाजी बनवून त्यांना जेऊ घालत. त्या म्हणत, ”भगवंताने आपल्याला थोडे का होईना दिले आहे. त्याचे ऋण आपण कसे फेडणार?” अडल्यानडल्यांसाठी पाटील कुटुंबीयांचे दार नेहमीच उघडे असे. याच मानवशील संस्कारामध्ये सतीश यांचे संगोपन होत होते. वयाच्या ११ ते १४व्या वर्षांपर्यंत सतीश मातीकाम बांधकाम मजदूर म्हणून काम करत होते. ते जिथे काम करत होते, त्या परिसरात एका बंगल्याचे बांधकाम सुरू झाले. पण, छोट्या बंगल्यासाठी काही दिवसांसाठी मजदूर मिळणे अवघड होते. त्यांनी सतीश यांना मजदूर मिळवून देशील का, म्हणून विचारले.

सतीश यांनी संपर्कातील लोकांना घेऊन त्या बंगल्याचे काम ठरावीक मुदतीत आणि अपेक्षापेक्षा उत्तमरित्या करून दिले. बांधकाम व्यावसायिक म्हणून सतीश यांचे ते पहिले काम. इतरांपेक्षा उत्तम, माफक दरात दर्जेदार काम करतो, म्हणून मग त्या परिसरातील छोटी-मोठी खासगी बांधकामे सतीश यांना मिळू लागली. या व्यवसायात त्यांचा जम जमला. आयुष्यात पहिल्यांदा बँकेत खाते उघडले आणि तिथेच रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांशी त्यांची ओळख झाली. तेव्हा सतीश २३ वर्षांचे होते आणि साल होते १९८३. आज चार दशकं उलटली तरील सतीश यांचा संघसंपर्क आणि स्नेह कायम आहे. पुढे बांधकाम व्यवसायामध्ये त्यांनी भरारी घेतली आणि ‘एस डी पाटील कंपनी’, ‘गणेश कन्स्ट्रक्शन’, ‘गणेश असोसिएट्स’ अशा तीन कंपन्यांच्या माध्यमातून पुण्यातील गरजू आणि निम्न मध्यमवर्गीयांसाठी गृहनिर्मिती केली.

सतीश हे काही श्रीमंत घरचे किंवा मोठे पाठबळ असणारे व्यावसायिक नव्हते. अनेकदा त्यांचे अंदाजही चुकले. अगदी सगळे विकून देणी फेडावी लागतात की काय, असेही दिवस आले. पण, सतीश अजिबात डगमगले नाहीत. आपण चांगले तर जग चांगले आपण चांगले निर्मळ भावनेने काम करतो, तर परमेश्वर आपल्याला कधीच अडचणीत आणणार नाही, हा विश्वास त्यांना कायमच राहिला आणि तो सार्थही ठरला. दुसरीकडे बांधकाम क्षेत्रात स्थिर होतानाच त्यांना दिसत होते की, ते ज्याप्रमाणे दुसर्‍याच्या हाताखाली बालपणीच मजदूर म्हणून राबले, तसेच वास्तव आजही आहे. बांधकाम साईटवर कितीतरी मजदूर आपल्या लेकराबाळांसकट यायचे. तेही कामाला यायचे. या मजदुरांच्या मुलांना नाममात्र शुल्कात शिकता यावे, यासाठी सतीश यांनी शाळा उभी केली. आज यशवंत शिक्षण संस्थेअंतर्गत पुण्यात चार शाळा आहेत. त्यातली एक इंटरनॅशनल शाळा आहे, तर दोन महाविद्यालयेही आहेत. ईश्वराची अपरंपार कृपा त्याचे सदैव स्मरण राहावे म्हणून त्यांनी दापोडी येथे गणेशमंदिरही बांधले. समाजनिष्ठा आणि देशनिष्ठेच्या भावनेने समाजातील गोरगरीब, गरजूंच्या मदतीसाठी सतीश नेहमीच तत्पर असतात.

कोरोना काळात तर सतत दोन वर्षे त्यांनी हजारो पोलीस बांधवांना दररोज नारळपाणी, चहा आणि नाश्ता उपलब्ध करून दिला, तर चार हजार कुटुंबीयांना रेशन वितरित केले. पण, याबाबत सतीश यांचे म्हणणे की, “आई तर गरजूंना गरम गरम भाकरी खाऊ घालायची, त्या तुलनेत हे सगळे काहीच नाही.” असो. ते सावरकर मंडळाचेही काम करत. या दरम्यान उत्कृष्ट कार्य केले म्हणून २००७ साली त्यांचा सत्कार गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. पुढे सतीश यांनी सावरकर मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही कार्य केले. रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या विचारकार्याचा सतीश यांच्यावर फार मोठा ठसा.

सतीश म्हणतात की, “२००० सालापासून मी अनेकदा सरसंघचालकांना भेटलो. पण, त्यांचे साधे जीवन आणि उच्च विचार, कोणताही भेदभाव न करता सगळ्यांना सोबत घेऊन चालणे आणि प्रत्येकाला प्रेरणा देणे, हे सगळे माझ्या आयुष्यासाठी प्रेरणादायी आहे.” तर असे सतीश पाटील हे वीरशैव लिंगायत मंचाचे मुख्य सदस्यही आहेत. मंचाच्या माध्यमातून बसवेश्वर महाराजांचे सत्य विचार समाजात जागृती करावी आणि त्यायोगे समाज आणि देशाच्या प्रगतीमध्ये खारीचा वाटा उचलावा, असे सतीश पाटील यांचे पुढील लक्ष्य आहे. सतीश पाटील यांचे विचार आणि कर्म केवळ त्यांच्या समाजासाठीच नाही, तर सगळ्यांसाठीच दीपस्तंभ आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.