आदिवासींच्या धर्मांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

    21-May-2023
Total Views |
Conversion of tribal community

खानिवडे
: आदिवासी भागातील अशिक्षितपणाचा फायदा घेत ख्रिश्चन मिशनर्‍यांकडून होणार्‍या धर्मांतराची चर्चा पालघर जिल्ह्यात नेहमी होत असून, सध्या दुर्गम आदिवासी भागात ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या भागात आता ख्रिश्चन धर्माची सर्वच पूजा-अर्चा करत असल्याचे बोलले जात आहे. ख्रिश्चन धर्मीयांप्रमाणे हे आदिवासी बांधव लग्न व अन्य सण-उत्सव कार्य करत असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. म्हणूनच ख्रिश्चन धर्माची पूजा-अर्चा करणार्‍या कुटुंबांविरोधात, वावर-वांगणी ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव केला आहे. त्या कुटुंबांना आदिवासींच्या सर्व योजना बंद करण्याचा ठराव घेण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुका हा डोंगराळ भागात असून, ९५ टक्के आदिवासी लोकवस्ती आहे. त्यातच यामध्ये जव्हार तालुक्यातील काही भागातील आदिवासी कुटुंबांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याची जोरदार चर्चा आहे. यामध्ये जव्हार तालुक्यातील दुर्गम भागातील वावर-वांगणी ग्रामपंचायत हद्दीत ख्रिश्चन धर्माची पूजा करणार्‍या कुटुंबांविरोधात नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत एकहाती ठराव घेऊन, जी कुटुंबे ख्रिश्चन धर्म स्वीकारतील, त्या कुटुंबांना यापुढे कोणतेही घरकुल, शौचालय, अन्य शासकीय सुविधा आणि शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही, असा ठराव घेण्यात आला आहे. यावेळी वावर वांगणी ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद बुधर आणि सदस्य यशवंत बुधर यांनी स्पष्टपणे सांगितले की, यापुढे जातीचा दाखला असेल किंवा इतर सगळे कागदपत्रेही ख्रिश्चन असल्याचे करून घ्यावे आणि यापुढे तुम्हाला आदिवासी नावाने कोणत्याही योजनाचा लाभ घेता येणार नाही आणि ज्यांच्याकडे आदिवासीच्या नावाने काही पदे असतील, तर ती तत्काळ रद्द करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.