अत्यंत थकलेल्या, उपाशी असलेल्या वामनरावांना नाशिकच्या सरकारवाडा येथे असलेल्या तुरुंगात डांबण्यात आले. त्यांची कसून चौकशी झाली. पण, वामनराव नमले नाहीत. पुढे खटला उभा राहिला. कान्हेरे, कर्वे, देशपांडे यांना फाशी सुनावण्यात आली. तात्याराव सावरकर, बाबाराव सावरकर आणि वामनराव जोशी यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. वामनराव जोशी यांनी त्यांच्या आयुष्यातील उमेदीचा नऊ वर्षांचा काळ अंदमानात घालवला. त्यांनी कोलू फिरवला आणि अंदमानात जे अनन्वित छळ होत होते, त्याला तोंड दिले.
अंदमान येथील सेल्युलर तुरुंगातील स्मृतिस्तंभावर तीन मराठी क्रांतिकारकांची नावे कोरलेली आहेत. वि. दा. सावरकर, ग. दा. सावरकर आणि वामन नारायण जोशी. यापैकी पहिले दोघे आपल्याला माहीत आहेत, पण वामनराव जोशी यांचे नाव कुणालाच ठाऊक नाही.आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी फार मोठे योगदान दिले आहे. क्रांतिकार्य करणार्या व्यक्ती कधीही कोणत्याही गोष्टींची नोंद ठेवत नसत किंवा अशी नोंद असली, तरी काही काळाने ती नष्ट करून टाकत असत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने कितीही मोठी जोखीम पत्करली, (सरकारच्या दृष्टीने ) कितीही भयानक कृत्य केले तरी त्याचे तपशील मिळणे अवघड जाते. त्यामुळे असे अनेक क्रांतिकारक अज्ञात राहिले आहेत. असेच, एक थोर देशभक्त म्हणजे वामनराव (दाजी) नारायण जोशी. त्यांचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यात असलेले समशेरपूर; पण नाशिकशी त्यांचा निकटचा संबंध होता. ते नाशिकमधील क्रांतिकारी चळवळीत सामील झाले.
१९०९ मध्ये नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनचा वध झाला आणि पोलिसांची दमनशाही सुरू झाली. वामनराव नाशिकहून निसटले होते. पोलीस त्यांचा शोध घेऊ लागले. अखेर त्यांना समशेरपूर येथून अटक करण्यात आली. त्यांचे हात साखळदंडाने बांधण्यात आले. ब्रिटिश पोलीस घोड्यावर आणि वामनराव चक्क पायी असे त्यांना नाशिकपर्यंत आणण्यात आले. हे अंतर होते ५५ किमी! अत्यंत थकलेल्या, उपाशी असलेल्या वामनरावांना नाशिकच्या सरकारवाडा येथे असलेल्या तुरुंगात डांबण्यात आले. त्यांची कसून चौकशी झाली. पण, वामनराव नमले नाहीत. पुढे खटला उभा राहिला. कान्हेरे, कर्वे, देशपांडे यांना फाशी सुनावण्यात आली. तात्याराव सावरकर, बाबाराव सावरकर आणि वामनराव जोशी यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. वामनराव जोशी यांनी त्यांच्या आयुष्यातील उमेदीचा नऊ वर्षांचा काळ अंदमानात घालवला. त्यांनी कोलू फिरवला आणि अंदमानात जे अनन्वित छळ होत होते, त्याला तोंड दिले. एकदा वामनराव जोशी यांची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे त्यांनी कोलू फिरवण्यास नकार दिला. त्यावेळी तेथील उद्दाम शिपायाने त्यांना शिवी हासडली.
वामनराव जोशी यांना तो अपमान सहन झाला नाही. ते इतके संतापले की, त्यांनी मागचा पुढचा विचार न करता त्या शिपायाच्या सरळ मुस्कटात मारली. हे फार मोठे धाडसाचे कृत्य होते. त्यानंतर सगळे पोलीस वामन जोशी यांच्यावर तुटून पडले, हे सांगणे नकोच. त्यांना जबर मारहाण झाली. वामनराव किती स्वाभिमानी आणि त्याचबरोबर किती धाडसी होते, हेच यावरुन आपल्याला लक्षात येते. एकदा बाबाराव सावरकर आजारी पडले. त्यावेळेस त्यांचा स्वयंपाक करण्याची जबाबदारी वामनराव यांच्यावर सोपविण्यात आली. ती त्यांनी आनंदाने पार पडली. १९२२ मध्ये त्यांची मुक्तता झाली. मधल्या काळात घरी फारसा संपर्क नव्हता. ते समशेरपूरला घरी आले, तर त्यांच्यापुढे दु:खाचे ताट वाढून ठेवलेले होते. आई आणि वहिनी यांचा मृत्यू झालेला होता. एक भाऊ घरातून निघून गेला होता. काही काळाने वामनराव यांचा विवाह करण्याचे ठरले. पण, क्रांतिकारकाला कोणता वधूपिता मुलगी देणार? अनेक दिवस तसेच गेले. पुढे त्यांचा विवाह झाला. पण, त्यांचे नशीब इतके वाईट की, अवघ्या चारच महिन्यांत त्यांच्या पत्नीने जगाचा निरोप घेतला. नोकरी मिळेना-कारण क्रांतिकारकाला नोकरी देण्याची जोखीम कोण पत्करणार? त्यांना प्रचंड आर्थिक ओढाताण सहन करावी लागली. दुर्देवाचे असे दशावतार पाहत-पाहत त्यांना जीवन कंठावे लागले.
त्यांची शेवटची काही वर्षे तुलनेने बरी गेली. पं. नेहरू यांनी त्यांना आर्थिक मदत केली, तर काही मित्रांनी त्यांचा पुण्यात सत्कार घडवून आणला. वामनराव जोशी यांची ही त्यागमय आणि खडतर जीवनाची कहाणी आतापर्यंत अज्ञातच राहिली होती. तिच्यावर प्रकाश टाकण्याचे काम त्यांची पुतणी शरयू कुलकर्णी यांनी नुकतेच केले आहे. वामनराव यांचे एक छोटेखानी चरित्र त्यांनी लिहिले आहे. सौ. शरयू ताई यांनी वयाची पंच्याहत्तरी पार केलेली आहे. पण, याही वयात त्यांनी कष्टपूर्वक या चरित्राचे लेखन केले आहे. स्वा. सावरकर, सेनापती बापट अशा थोर विभूतींना सुद्धा वामनराव यांच्याबद्दल किती आपुलकी होती, याची माहिती आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळते. गोविंदराव, माधवराव आणि बळवंतराव डावरे या तिघा बंधूंनी स्वातंत्र्य आंदोलनात केलेला अज्ञातत्याग आपल्याला इथे वाचायला मिळतो. वामनराव जोशी यांचे नाव वामन असले, तरी त्यांचे कर्तृत्व उत्तुंग होते. या पुस्तकाच्या रूपाने त्यांचे हे कर्तृत्व शरयूताई कुलकर्णी यांनी समाजापुढे आणले आहे. नाशिकच्या ’अक्षरब्रह्म प्रकाशन संस्थे’ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
डॉ. गिरीश पिंपळे