विवेकपूर्ण जीवनशैलीसाठी राष्ट्रसंतांचे विचार महत्त्वाचे : वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

    20-May-2023
Total Views |
tukdoji maharaj

अमरावती
: धावपळीच्या व स्पर्धेच्या आजच्या युगात मनःशांती, तणाव निरसन, विवेकपूर्ण जीवनपद्धतीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार अंगिकारणे आवश्यक आहे. ग्रामगीतेचे नियमित पठण, प्रार्थना व भजन आदींचा समावेश आपल्या जीवनशैलीत व्हावा, असे आवाहन वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

मंत्री मुनगंटीवार यांनी आज पहाटे गुरुकुंज मोझरी आश्रमाला भेट देऊन सामुहीक प्रार्थनेत सहभाग घेतला. येथील सर्व तीर्थकुंडात मंत्री मुनगंटीवार यांचे वडील दिवंगत सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या अस्थीं विसर्जित करण्यात आल्या. यावेळी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, उप सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, सरचिटणीस जर्नादन बोथे गुरुजी, सुभाष सोनारे, निवेदिता चौधरी यांच्यासह आश्रमाचे सदस्य व सेवेकरी उपस्थित होते.

प्रारंभी मंत्री महोदयांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी सामुहीक प्रार्थनेत सहभाग घेऊन ध्यानसाधना केली. कारे धरी गिरीधारी अबोला, नको वेळ लावू प्रभू भेटण्याला, सबका भला करो, यही आवाज कहेंगे या भजनगीतांचे गायन झाले. भगवद्गीतेच्या अध्यायाचे पठन, प्रभु श्रीरामाचा जयघोष झाला. यावेळी मंत्री मुनगंटीवार यांनी श्री गुरुदेव जीवन विद्या सुसंस्कार व छंद शिबिर तसेच श्री गुरुदेव आयुर्वेदीक महाविद्यालयाला भेट देऊन पाहणी केली. या शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी शिबिरातील विद्यार्थ्यांद्वारे खंजिरी वादन करत हनुमान चालीसाचे सादरीकरण झाले. खंजिरी वादन ऐकून मन प्रसन्न झाल्याचे ते म्हणाले, आनंदाचा महामार्ग दाखवणिाऱ्या राष्ट्रसंतांच्या भूमीत तुम्ही जन्मला आहात. तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात. सुदृढ मनासाठी व सकारात्मक विचारांसाठी भजन आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.