मुंबई : २००० ची नवी नोट मागे घेण्याचा निर्णय रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने घेतला आहे. तुम्ही या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत वापरु शकता. तसेच या मुदतीआधी तुम्हाला नोटा बॅंकेत जमा कराव्या लागतील. ३० सप्टेंबरपर्यंत नोटा जमा करुन त्या बदल्यात इतर मुल्यांच्या नोटा घ्याव्यात, असं आरबीआय ने म्हटलं आहे.
30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले असल्याचे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे. 2000 रुपयांच्या नोटा या रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर 2016 मध्ये चलनात आणल्या होत्या. RBI कायदा 1934 अंतर्गत कलम 24(1) अन्वये या नोटा चलनात आल्या. त्यावेळी भारत सरकारने रुपये 500 आणि 1000 मूल्याच्या नोटा चलनातून बाद केल्याने त्याची भरपाई काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ही सोय केली होती.
तात्पुरत्या वापरानंतर या नोटा 2018-19 साली छापणं रिझर्व्ह बँकेने बंद केलं. मार्च 2017 सालीच या नोटांचा वापर येत्या चार-वर्षांपुरताच करण्यात येईल, असे संकेत रिझर्व्ह बँकेने दिले होते. तेव्हापासूनच बाजारात या नोटा दिसणं कमी झालं होतं. दरम्यान, नोटाबंदीनंतर इतर मूल्यांच्या अनेक नोटा बाजारात दाखल झाल्या. अखेरीस, रिझर्व्ह बँकेच्या क्लिन नोट पॉलिसीअंतर्गत 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
क्लिन नोट पॉलिसी काय आहे?
रिझर्व्ह बँकेकडून क्लिन नोट पॉलिसी हे धोरण स्वीकारण्यात आलेलं आहे. यानुसार लोकांच्या वापरासाठी बाजारात चांगल्या दर्जाच्या नोटांचा पुरवठा होईल, याची दक्षता रिझर्व्ह बँकेकडून घेतली जाते.