आपला फॉर्म्युला मोदीजींची कार्यशैली... आपला नरेटिव्ह सामान्यांच्या विकासाचा
समर्पण आणि केवळ समर्पण हा यशाचा मंत्र; देवेंद्र फडणवीस
18-May-2023
Total Views | 44
पुणे : भाजपाच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौफेर फटकेबाजी केली. महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर तोड डागतानाच आपला फॉर्म्युला मोदीजींची कार्यशैली... आपला नरेटिव्ह सामान्यांच्या विकासाचा असा नाराही दिला. यासोबत आपल्या खास शैलीत शेरोशायरी सादर करीत त्यांनी कार्यक्रमात उत्साह भरला.
उद्धव ठाकरे म्हणतात सुप्रीम कोर्टात आम्ही जिंकलो आणि निकाल महाराष्ट्राच्या गावांगावांत पोहोचवा. मी यावर थोडी स्पष्टता देतो. याचिकेत एकूण ८ प्रेयर होत्या. या मागण्यांपैकी कोणतीही मागणी मान्य झाली नाही. राज्यातील जाणकार नेते शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक ३१८ व ३१९या दोन पानांवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबाबत काय लिहिले आहे हे एकदा आवर्जून वाचा. यांची लोकशाहीची व्याख्या काय? संजय राऊतांना बेल मिळाली की लोकशाहीचा विजय. नवाब मलिकांना बेल मिळाली नाही की, लोकशाहीची हत्या.
महाराष्ट्रात मविआतील एक पक्ष भाकरी फिरविणारा. दुसरा भाकरीचे तुकडे तोडणारा... तर तिसरा संपूर्ण भाकरीच हिसकावून घेणारा. पण, आपला पक्ष गरिबांच्या भाकरीची चिंता करणारा. २०२३ चे शेवटचे ६ महिने... २०२४ चे पहिले ६ महिने... हेच आपले ध्येय असली पाहिजे.आणि त्यासाठी सर्वांनी झोकून दिले पाहिजे. एकाचवेळी अनेक कामे. संघटनेत संपर्क, सरकार-जनता संवाद सेतू, सरकारची कामे पोहोचवा, समर्पण आणि केवळ समर्पण हा यशाचा मंत्र असल्याचे फडणवीस म्हणाले.