‘ऑपरेशन कावेरी’

    27-Apr-2023   
Total Views |
 
Operation Kaveri
 
 
सुदान... एरवी फारसा बातम्यांमध्ये न झळकणारा हा आफ्रिकन देश सध्या जगभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. सुदानी लष्कर आणि निमलष्करी दल यांच्यातील सत्ता आणि नेतृत्व संघर्षाची या अनागोंदीला लाभलेली किनार. आजवर दोन्ही सैन्य दलांनी एकमेकांविरोधातच पुकारलेल्या या अजब संघर्षात 400 हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. तरीही सुदान धुमसतो आहे. पण, दोन्ही लष्कर गटांनी जाहीर केलेल्या 72 तासांच्या युद्धविरामामुळे कित्येक देशांनी आपापल्या नागरिकांना या देशातून बाहेर काढण्यासाठीच्या अभियानांना गती दिली. त्यात मग भारताचाही अपवाद नाही.
 
भारतानेही सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी ‘ऑपरेशन कावेरी’ अभियानाची घोषणा केली. लगोलग भारतीय सैन्य, नौदल आणि हवाईदलांनी आपली सज्जता सिद्ध करत, आतापर्यंत 1100 भारतीय नागरिकांना सुदानमधून सुखरुप बाहेर काढले आहे. त्यांना सुदानमधून जवळच असलेल्या सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये जहाजाने, विमानाने आणले गेले. मग जेद्दाहमधून विमानाने मुंबई, दिल्लीकडे या भारतीयांनी प्रयाण केले. आतापर्यंत 500 हून अधिक सुदानमध्ये अडकलेले भारतीय दिल्ली आणि मुंबईत पोहोचले आहेत. मायदेशी पाऊल ठेवताच ‘भारतमाता की जय’बरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचाही जयघोष करत त्यांनी मोदी सरकार आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचेही यावेळी आभार मानले. कारण, सुदानमधून आपली सुटका होईल अथवा नाही, याची अनेकांना शाश्वती नव्हतीच. सुदानमध्ये दिवसेंदिवस बिकट होणारी परिस्थिती, अन्नधान्याचा तुटवडा, इंधनाची टंचाई, वीज-पाणी अशा सर्वच सोईसुविधा खंडित झालेल्या. त्यात घराबाहेर पाऊल ठेवायचे म्हटले तरी कुठून गोळी-बॉम्बने कधी घात होईल, त्याची खात्री नाहीच. अशा जीवन-मरणाच्या परिस्थितीतून ‘ऑपरेशन कावेरी’च्या माध्यमातून सुदानमधील भारतीयांना मायदेशी आणण्यासाठीच्या हालचाली यशस्वी झालेल्या दिसतात. एका आकडेवारीनुसार, सुदानमधील भारतीयांची संख्या ही साधारण चार ते पाच हजारांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अजूनही मोठ्या संख्येने भारतीय परतीच्या प्रतीक्षेत आहेत. पण, यानिमित्ताने एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय सुदानसारख्या आफ्रिकन देशात स्थायिक का होतात, असा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो.
 
खरंतर भारतीयांचे सुदानमध्ये उद्योग-व्यवसाय-नोकरीसाठी दाखल होणे हा काही काल-परवाचा विषय नाही. इतिहासात डोकावले असता, मेसोपोटोमिया साम्राज्य अस्तित्वात असतानाही साधारण पाच हजार वर्षांपासून त्यांचे सिंधू संस्कृतीशी व्यापारी संबंध प्रस्थापित झाले होते. तसेच, 150 वर्षांपूर्वी एक गुजराती व्यावसायिक सर्वप्रथम सुदानमध्ये स्थायिक झाल्याचीही नोंद आढळते. त्यांचे नाव लवचंद अमरचंद शहा. सुदानमध्ये स्थायिक झालेल्या या पहिल्या भारतीयाने आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. एवढेच नाही, तर हे शहा ज्या सौराष्ट्रचे होते, तेथून आपले मित्र, नातेवाईक यांनाही त्यांनी सुदानमध्ये स्थिरावण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य केले. अशाप्रकारे व्यवसाय-व्यापाराच्या निमित्ताने सुदानमध्ये भारतीयांची संख्या ही कालौघात वाढत गेली. आज अनेक भारतीय कंपन्या आणि रुग्णालयेही सुदानमध्ये सक्रिय आहेत. तसेच, व्यापाराच्या बाबतीत सांगायचे झाल्यास चीननंतर भारत हा सुदानचा दुसरा मोठा निर्यातदार देश आहे. साखर, रसायने, औषधे, मशिनरी, कपडे, खाद्यान्न यांसारख्या वस्तूंची आपण सुदानला निर्यात करतो, तर लोह, चामड्याच्या वस्तू, कृषी उत्पादने यांची आपण सुदानकडून आयात करतो. त्यामुळे व्यापारी पातळीवरही दोन्ही देशांचे संबंध हे अलीकडच्या काळात अधिक वृद्धिंगत झालेले दिसतात म्हणूनच सुदानमध्ये भारतीयांचे अस्तित्व हे दखलपात्र आहे, असेच म्हणावे लागेल.
 
पण, या देशातील अराजकाची सद्यःस्थितीलक्षात घेता, तिथे भारतीयांचे वास्तव्य हे जीवावरही बेतू शकते. एवढेच नाही, तर खुद्द सुदानी नागरिकांनीही त्यांचे घरदार सोडून इतर आफ्रिकन देशांकडे आता पलायन केले आहे. त्यामुळे सुदानमधील या गृहयुद्धावर लवकरात लवकर तोडगा निघावा आणि तिथे शांतता प्रस्थापित व्हावी, हीच अपेक्षा.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची