योगतपस्विनी!

    29-Mar-2023
Total Views |
 

Dr. Kajal Patni
 
 
योगविद्येस घरोघरी पोहोचविण्याची जिद्द मनाशी बाळगणार्‍या नाशिकच्या डॉ. काजल पटणी यांचा योग विद्यापीठ उभारण्याचा मानस आहे. त्यांच्या या स्वप्नपूर्तीचा घेतलेला हा धांडोळा...
 
अत्यंत संयमी, पण तितक्याच चाणाक्ष स्वभावाच्या डॉ. काजल पटणी यांनी योगक्षेत्रात केलेले कार्य अतुलनीय असेच. पण म्हणतात ना, ध्येयवेड्या लोकांसाठी आकाशही ठेंगणे असते, तसेच डॉ. काजल पटणी यांच्याविषयी म्हणता येईल. शिक्षणाला वयाची मर्यादा नसते, हे डॉ. पटणी यांनी स्वतःच्या कृतीतून सिद्ध केले. म्हणूनच योगक्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्ती गाजविणार्‍या डॉ. काजल पटणी यांच्याकडे भारतीय योगाच्या आंतरराष्ट्रीय ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर’ म्हणून बघितले जाते.
 
विदर्भातील अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात काजल पटणी यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण धनाबाई विद्यालयात झाले. पुढे अकोला येथील धनाबाई, सीताबाई कला महाविद्यालयात त्यांनी ‘अर्थशास्त्र’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. 2003 मध्ये डॉ. पराग पटणी यांच्याशी विवाह झाल्यानंतरही त्यांची शिक्षणाची ओढ कायम होती. मात्र, एकत्र कुटुंबात राहावे लागल्याने, अगोदर त्यांनी संसाराची घडी बसविली. 2008 मध्ये जुळी मुले झाल्यानंतर त्यांची जबाबदारी आणखी वाढली. अर्थात, या सर्व प्रवासात पती डॉ. पराग पटणी यांची त्यांना पावलोपावली साथ मिळत गेली.
 
पुढे डॉ. काजल यांनी योग या क्षेत्रात स्वतःला घडविण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी नागपूर येथील रामटेक विद्यापीठात ‘एम.ए. योगशास्त्र’साठी प्रवेश घेतला. संसाराचा गाडा हाकत त्यांनी अत्यंत मेहनतीने शिक्षण पूर्ण केले. पण, येथेच न थांबता जागतिक स्तरावर स्वतःला सिद्ध करण्याचे जणू काही त्यांनी ध्येय समोर ठेवले. त्यानुसार त्यांनी विविध योगस्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. 2013ला नाशिकमध्ये जिल्हास्तरीय योगस्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. या स्पर्धेत साधारणतः 50 पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. शिवाय एकापेक्षा एक प्रतिस्पर्धी असल्याने, स्पर्धा चुरशीची होणार होती. मात्र, हे आव्हान पेलत डॉ. काजल यांनी ‘ओपन ग्रुप’मध्ये प्रवेश मिळविला. पुढे 2014मध्ये गोंदिया येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली. येथेही त्यांनी विजयश्री खेचून आणली. त्यानंतर हैदराबाद, तेलंगण येथील राष्ट्रीय स्पर्धाही त्यांनी गाजवल्या. एकीकडे संसार, मुलांचा सांभाळ व दुसरीकडे ‘करिअर’ अशा दोन्ही आघाड्यांवर डॉ. काजल पटणी यांची यशस्वी घोडदौड सुरू होती. मात्र, मुले लहान असल्याने त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर लगेचच भरारी घेता आली नाही. मात्र, यामुळे त्यांची जिद्द तीळमात्रही कमी झाली नाही. उलट त्यांचा उत्साह वाढत गेला. शिवाय समाजातही योगाचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी त्यांची धडपड सुरू झाली.
  
2017 मध्ये पुद्दुचेरी येथे 45 दिवसांचे ‘योगशिक्षण’ या आंतरराष्ट्रीय कोर्सचे आयोजन केले होते. त्यास डॉ. पटणी यांनी प्रवेश घेतला. या कोर्सअंतर्गत सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत योगाची प्रात्यक्षिके करावी लागत असत. अत्यंत खडतर असा हा 45 दिवसांचा कोर्स त्यांनी केवळ 16 दिवसांमध्येच पूर्ण केला. योगामध्ये डॉ. काजल यांची असलेली रुची व अभ्यास बघून आयोजकही थक्क झाले. त्यांनी उर्वरित दिवसांमध्ये डॉ. काजल यांना योगशिक्षिका म्हणून इतरांना योगाचे धडे देण्यास सांगितले. शिवाय योगशिक्षिका म्हणून प्रमाणपत्रही दिले. या संस्थेचे पदाधिकारी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी डॉ. काजल यांच्यावर देशांतर्गत विविध स्पर्धा घेण्याची जबाबदारीही सोपविली. त्यासाठी त्यांना ‘स्पोर्ट्स योगा अलायन्स इंटरनॅशनल’ या संस्थेच्या महाराष्ट्र राज्याच्या सचिवपदावरही त्यांची नियुक्ती केली. त्यानुसार दि. 2 डिसेंबर 2018 रोजी डॉ. काजल पटणी यांनी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेसाठी संबंध महाराष्ट्रातून 543 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यानंतर 23 जून 2019 मध्ये नाशिकला राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत डॉ. काजल यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर संघटनेचे नेतृत्व करावे, असे ठरविण्यात आले व त्यांची ‘स्पोर्ट्स’ व ‘योगा इंटरनॅशनल’च्या अध्यक्षपदी वर्णी लागली. आता त्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ गाजवायचे होते.
 
दि. 9 नोव्हेंबर, 2019 मध्ये त्यांच्या नेतृत्वात इंडोनेशिया, बाली येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत 250 पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये 43 स्पर्धक भारतातील होते. त्याचबरोबर डॉ. काजल यांचे नेतृत्वही आंतरराष्ट्रीय स्तरावरही सिद्ध झाले. डॉ. काजल यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण तेव्हा आला, जेव्हा सहा वर्षांच्या अथक परिश्रमानंतर एशिया विद्यापीठात सादर केलेल्या शोधनिबंधासाठी त्यांना ‘डॉक्टरेट’ या मानाच्या पदवीने गौरविण्यात आले. या पदवीमुळे डॉ. काजल यांची जबाबदारी आणखी वाढली. समाजात योगाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांची खरी कसोटी लागणार होती. अशात त्यांनी ‘गीतयोगा’ आणि ’फिटनेस फाऊंडेशन’ सुरू केले. या संस्थेच्या माध्यमातून शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागांमध्ये जाऊन ंयोगाचा प्रचार व प्रसार करण्यास सुरुवात केली. तसेच वनवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी मदत सुरू केली.
 
‘योग’ या शब्दाचा अर्थच मुळात जोडणे असा असल्याने, त्यांनी समाज जोडण्याच्या कामालाही प्राधान्य दिले. शरीर, आत्मा, मन असो किंवा जात, धर्म आणि संप्रदाय असो, या सर्वांना योगाने जोडण्याचा त्यांचा ध्यास आहे. तसेच योग विद्यापीठ स्थापन करण्याचा त्यांचा मानस आहे. डॉ. काजल पटणी यांच्या यांच्या प्रयत्नांना दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे शुभेच्छा.
 
- अमित यादव
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.