इतिहास जगणारा माणूस...

    23-Mar-2023
Total Views |
Santosh Chandane

 
इतिकासकालीन विविध दस्तावेजांचा, नाण्यांचा ऐतिहासिक ठेवा बंदिस्त न राहता, लोकाभिमुख व्हावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून फिरत्या प्रदर्शनाच्या माध्यमातून जनजागृती करणार्‍या संतोष चंदने यांच्याविषयी...


संतोष चंदने यांना शालेय वयातच इतिहास विषयात गोडी निर्माण झाली. पश्चिम किनारपट्टीवर डौलात उभा असलेला सह्याद्री आणि छत्रपती शिवराय हे त्यांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू. ‘स्काऊट’च्या निमित्ताने बदलापूर येथील निसर्ग सान्निध्यातील स्थळांना भेटी दिल्या. तेथूनच इतिहासाप्रति आवड निर्माण झाली अन् हा इतिहासाचा वारसा जागरुक ठेवण्यासाठी मग संतोष यांनी धडपड सुरु केली. भटकंती करता करता समुद्रकिनार्‍यावरील शंखशिंपले संग्रहित करण्याचा छंद त्यांना जडला. तो पुढे ऐतिहासिक शस्त्रास्त्रं, नाणी, दिवे, ऐतिहासिक दस्तावेज, संस्थानिकांचे स्टॅम्प पेपर, मोडी लिपीतील पेपर इथपर्यंत येऊन थांबला. त्यांच्याकडे आजपर्यंत शेकडो नाणी, शस्त्रास्त्रे संग्रही आहेत. आपल्याजवळ असलेला हा ऐतिहासिक ठेवा केवळ चार भिंतीत न राहता, तो लोकाभिमुख करता यावा, यासाठी याचे फिरते प्रदर्शन महाराष्ट्रभर करीत असल्याचे संतोष सांगतात.

कुळगाव (बदलापूर) येथे संतोष चंदने यांची दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. तसे लाहे (जि. ठाणे) हे त्यांचे मूळ गाव. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर पुढे ‘आयटीआय’मध्ये त्यांनी शिक्षण घेतले. नोकरीसाठी विविध कंपन्यांमध्ये अर्ज केल्यानंतर मित्राच्या मदतीने ‘टेल्को पिंपरी’ येथे अर्ज केला. मुलाखतीसाठी संतोष हजर राहिले आणि मग काय त्यांना नोकरीही मिळाली. ते नोकरीच्या निमित्ताने पुण्यात दि. ३ मे, १९९२ रोजी स्थायिक झाले. नोकरी करताना त्यांच्या कामातील प्रगती बघता, अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. मात्र, इतिहासाची आठवण आणि त्यासाठी काहीतरी करण्याची धडपड संतोष यांना स्वस्थ बसू देत नव्हती. मग, तिथूनच हा आपला ऐतिहासिक वारसा हा सर्वसामान्यांपर्यंत कसा पोहोचवता येईल, यासाठी ते झपाटून कामाला लागले. हाच ध्यास ठेवून पुणे, बारामती, संभाजीनगर, धाराशिव, फलटण, मुंबई, ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा यांसह विविध ठिकाणी आपल्या संग्रहाचे प्रदर्शन भरवून इतिहास जीवंतपणे मांडू लागले.

लहानपणापासून तशी संतोष यांना फिरण्याची सवय होतीच. पण, या भटकंतीला डोळसपणे पाहण्याची दृष्टी या पुणे शहराने दिल्याचे ते आवर्जून नमूद करतात. पूर्वी संतोष यांची फिरस्ती ही केवळ जंगल, गडकिल्ल्यांपुरती मर्यादित होती. पण, कामानिमित्त ‘पुणे व्हेंचर ग्रुप’शी ते जोडले गेले. त्याच माध्यमातून पुढे गडकिल्ले, मंदिर, जंगल, ट्रेकिंगचा अनुभव घेतल्याने इतिहासाबद्दल आणखीन जवळीक संतोष यांच्या मनात निर्माण झाली. पुणे हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, खानदेश हे सर्व भाग मग संतोष यांना जवळचे वाटू लागले. पुढे असाच भटक्यांचा एक कट्टा तयार झाला. त्यात नवनवीन ठिकाणांची माहिती जमत गेली. मग, त्या-त्या शहराची, गावांची आणि त्यासंबंधीचा इतिहास, दस्तावेज ते जमा करु लागले. त्या गावांचा अभ्यास करुन त्या गावाची त्यांनी माहिती गोळा केली.

ऐतिहासिक संदर्भासाठी ‘पेशवे दप्तर’ व ‘भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे’ येथे जाण्याचा त्यांना योग आला. इतिहास जाणून व समजून घ्यायचा असल्यास मोडी लिपी समजून घेणे क्रमप्राप्त होते. मग, महाराष्ट्र शासन पुराभिलेख संचालनालयाची मोडी लिपी परीक्षा संतोष यांनी दिली. मोडी लिपी आत्मसात केल्यामुळे आपसुकच विविध पुरातन स्थळे, व्यक्तिमत्त्वे यांची ऐतिहासिक माहिती संतोष यांना मिळू लागली. या ज्ञानार्जनाच्या प्रक्रियेत दस्तावेज न केवळ वाचणे, पण त्याच्या खोलात जाऊन तत्कालीन इतिहास उलगडण्याची उत्कंठा यामुळे आणखी वाढू लागली. ज्याची ‘गॅझेट’मध्ये नोंद नाही, ती शासनदरबारी करता यावी व त्याच्या नोंदी ‘गॅझेट’मध्ये करता याव्यात, यासाठी प्रयत्न संतोष यांनी केली. इतिहासाच्या लेखनासाठी संदर्भ साधन गोळा करणे ते संग्रहित करुन त्याच वाचन करणे सुरू ठेवले. यासाठी अभ्यासिकेत हजारांच्यावर पुस्तकसंग्रहही केला. त्यात अधूनमधून भरही पडते. काळण समाजाचा इतिहास, समाजातील व्यक्ती, संत-परंपरा, सामाजिक व शैक्षणिक, धार्मिक योगदान तसेच काळण समाजातील घराण्यातील देवता, देवाची टांक यावर एकत्रित माहिती गोळा केली असून, ती ‘काळणायन’ म्हणून पुस्तकरुपाने प्रकाशित करण्याचा मानस आहे. सध्या विविध प्रकारांची ८०० शस्त्रे असून, आणखी काही शस्त्रे गोळा करण्याचा ध्यास आहे. तसेच, भविष्यात कायमस्वरुपी संग्रहालय उभे करण्याचा विचार असल्याचे संतोष सांगतात.

मंदिरातील मूर्ती, दिवे, बांधकाम शैली, दीपमाळ, शिलालेख याचा अभ्यास करताना, गडकिल्ले पाहताना, बुरुज, दरवाजे बांधणी, तटबंदी, माची, टांक, कोठार इत्यादींतील वेगळेपणा जाणवला. त्याची माहिती आपल्या पिढीला व येणार्‍या पिढीला व्हावी, यासाठी काम सुरु आहे. त्या माध्यमातूनच इतिहासाची नोंद असलेली वेगळी ओळख असो वा एखादे शस्त्र ते गोळा करुन ते जमवू लागले. ते म्हणतात की, “इतिहास हा विषय घरात बसून लिहिता येत नाही, त्यासाठी अनेक ठिकाणी भेटी द्यावी लागतात. संदर्भग्रंथ, दस्तावेज गोळा करावे लागतात. त्यामुळे बाहेर जाणे, फिरणे हे प्रत्येकाने केले पाहिजे.” त्यांच्या या अनमोल संग्रहाची दखल घेऊन दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर त्यांची प्रकट मुलाखत प्रसारित झाल्याचेही ते सांगतात. असे आगळेवेगळे ध्येय बाळगणारे संतोष चंदने यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा...!



-पंकज खोले




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.