लोकमान्य सेवा संघ, पारले शताब्दी वर्षानिमित्त...

    18-Mar-2023
Total Views |
 
Lokmanya Seva Union
 
मुंबईतील विलेपार्ले पूर्व येथील ‘लोकमान्य सेवा संघ’ या संस्थेचे यंदाचे शताब्दी वर्ष. लोकमान्य टिळकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लोकसेवा करावी म्हणून या संस्थेची 1923 रोजी स्थापन झाली. आज टिळक मंदिर ही भव्य वास्तू विलेपार्ले पूर्व येथे दिमाखात उभी आहे. शतकमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेने दि. 10 मार्चपासून ते दि. 22 मार्चपर्यंत दररोज सायंकाळी विविध विषयांना स्पर्श करणार्‍या कार्यक्रमांचे आयोजनही केले आहे. तेव्हा, शतकमहोत्सवी वर्षानिमित्ताने संस्थेच्या व्यापक कार्याचा घेतलेला हा आढावा...
 
लोकमान्य टिळक गेले आणि त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काही तरी साजेसे करावे, म्हणून मुंबईच्या विलेपार्ल्यातील टिळकप्रेमी मंडळी एकत्र आली. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सेवा करावी, या एकमेव हेतूने दि. 11 मार्च, 1923 रोजी ‘लोकमान्य सेवा संघ, पारले’ या संस्थेची स्थापना झाली.
 
विलेपार्ले पूर्वेस रेल्वे स्थानकापासून जवळच ‘टिळक मंदिर’ ही संस्थेची प्रशस्त वास्तू दिमाखात उभी आहे. गेली 100 वर्षे अनेकविध कार्यक्रम आणि उपक्रम संस्थेमार्फत अव्याहतपणे आयोजित केले जातात. बालकांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्याच हितासाठी कार्यरत असलेली अशी ही नावलौकिक प्राप्त संस्था. जवळपास 18 शाखांच्या माध्यमातून ही संस्था पार्लेकरांना समृद्ध करत असते. यामध्ये ग्रंथालय, व्यायामशाळा, सांस्कृतिक शाखा, स्त्री शाखा, प्रचार शाखा, क्रीडा शाखा, नागरिक दक्षता शाखा, वैद्यकीय केंद्र, कर्णबधिर विद्यालय, बालसंगोपन केंद्र, ग्राहक पेठ, गुंतवणूक प्रबोधन केंद्र, बालक पालक मार्गदर्शन केंद्र, आनंद धाम, दिव्यांग पुनर्वसन केंद्र, युवा मंच, दिलासा केंद्र, पु. ल. गौरव दर्शन दालन अशा 18 शाखांचा समावेश आहे. ‘पद्मभूषण’ पु. ल देशपांडेंची कलासाधना येथेच पार पडली. त्यांची सांस्कृतिक जडणघडण टिळक मंदिराच्या प्रांगणात झाली. आचार्य अत्रे, ग. दि. माडगूळकर, कुसुमाग्रज, पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व, पं. रविशंकर अशा अनेक प्रतिभावंत कलाकारांनी या कलामंदिरात आपली कला सादर केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा अनेक दिग्गजांनी या वास्तूत आवर्जून उपस्थिती लावली आहे. शतकपूर्तीच्या गणेशोत्सव समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संस्थेला भेट दिली होती व संस्थेच्या सर्वसमावेशक कार्याचे मनसोक्त कौतुकही केले होते.
 

Lokmanya Seva Union 
 
’सेवा करावया लावा, देवा हा योग्य चाकर’ हे ‘लोकमान्य सेवा संघा’चे बोधवाक्य. समर्थ रामदास, छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य बालगंगाधर टिळक या त्रिमूर्ती संस्थेचे मानचिन्ह आहेत.
 
संस्थेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त समाजाच्या बदलत्या रुपड्याप्रमाणे आणि वाढत्या गरजांप्रमाणे संस्थाही नवनवीन उद्दिष्टे मनात घेऊन सज्ज झाली आहे. आगामी काळात पाच नवे उपक्रम हाती घेण्याचा संस्थेचा मानस दिसतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी जांभुळपाडा येथे जे निवासस्थान आहे, त्याच्या नूतनीकरणाचा विचार येत्या काळात केला जाईल. अद्ययावत यंत्रणा असलेले ग्रंथालयदेखील सुरू करण्यात येईल. तसेच सध्याच्या घडीला अपेक्षित असलेली, अद्ययावत यंत्रणांनी सुसज्ज व्यायामशाळा तयार करण्यात येईल. संस्थेच्या गोखले सभागृहाचे नूतनीकरण आणि स्थानिक कलाकरांना प्रोत्साहन देण्यासाठी कायमस्वरूपी कलादालन, अशी या संस्थेची आगामी उद्दिष्टे आहेत. या सर्व कार्यासाठी निधीची आवश्यकता भासते. तो निधी प्राप्त व्हावा, म्हणून संस्था रसिक पार्लेकरांना समाजकार्यासाठी निधी देण्याविषयक आवाहन करते.
 
गेल्या 100 वर्षांत वेगवेगळ्या लोकांनी आपापल्या परीने काम करत ‘लोकमान्य सेवा संघ’ ही संस्था आजमितीस घडवली आहे. सर्वसाधारण माणसांनी केलेले हे एक असामान्य काम आहे. एखादी व्यक्ती समाजापेक्षा मोठी न होता कार्य करते, हे या संस्थेचे वैशिष्ट्य. इथे येऊन गेलेल्या मान्यवरांची नावे पाहिली तर भारतातील अग्रगण्य व्यक्ती इथे येऊन गेल्या आहेत. महात्मा गांधींपासून गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद मोदींपर्यंत अनेक मान्यवर. संस्थेमध्ये एकंदर 20 ते 21 वेगवेगळ्या प्रकारच्या शाखा चालतात. मुलांच्या संगोपनापासून वृद्धाश्रमापर्यंत अनेक उपक्रम राबविले जातात. भविष्याकडे पाहता, बदलत्या काळाला आवश्यक गोष्टी संस्थेने कराव्या, असे मी संस्थेतर्फे म्हणू शकेन. आम्हाला वेगवेगळ्या घटकांकडून मदत मिळते, पण ती अधिक मिळावी. क्रियाशील कार्यकर्ते आणि दानशूर व्यक्ती अशा संगमातून कोणतीही संस्था टिकते. संस्था टिकली तर समाज टिकतो, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. अशा संस्था बलवान व्हाव्या यासाठी समाजातील सर्व व्यक्तींनी एकत्र येणे आवश्यक आहे.
 
- मुकुंद चितळे, अध्यक्ष, लोकमान्य सेवा संघ
 
 
‘लोकमान्य सेवा संघा’ला आज 100 वर्षे पूर्ण झाल्याचा कार्यक्रम करताना आम्हाला आनंद वाटतो आहे. कारण, हे सगळे रसिकांना आवडतील असे कार्यक्रम आहेत. पार्लेकर रसिकही या कार्यक्रमांना उत्तम दाद देतात. या संस्थेचा पुनर्विकास व्हायचा आहे. त्यालाही पार्लेकर नक्की हातभार लावतील आणि ही संस्था आणखीन मोठी करतील, याबाबत मला विश्वास आहे.
 
- सुनील मोने, उपाध्यक्ष, लोकमान्य सेवा संघ
 
 
परिणत कवण जन्मला...
 
‘लोकमान्य सेवा संघा’च्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त शरयू नृत्य कलामंदिरच्या 35 कलाकारांनी अत्यंत सुंदर नृत्यनाटिका सादर केली. ’परिणत कवण जन्मला’ या कार्यक्रमात एकूण नऊ कर्तृत्वान व्यक्तींचा समावेश होता. परशुराम, रावण, द्रोणाचार्य, चाणक्य पासून ते अगदी बाजीराव, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत व झाशीची राणी लक्ष्मीबाई अशा एकूण नऊ व्यक्तींच्या आयुष्यात त्यांनी समाजसुधारणेसाठी वापरलेली विविध शस्त्रे यांच्या कथा यातून सांगितल्या गेल्या. शरयू नृत्य कलामंदिरच्या सोनिया परचुरे यांची ही अनोखी संकल्पना होती, ज्यात निरूपण व संगीताच्या ठेक्यावर कथ्थक नृत्याने या नऊ कथा सांगितल्या गेल्या. वेगवेगळ्या काळातील कथा असल्याने त्या त्या कालानुरूप वस्त्र व शस्त्र वापरलेली दिसतात. परशुरामाचे परशु, रावणाचे खङ्ग, द्रोणाचार्यांचा धनुष्यबाण, आर्य चाणक्यांनी तर आपली बुद्धीच शस्त्र म्हणून वापरली. बाजीरावांचा दांडपट्टा, झाशीच्या राणीची तलवार, वासुदेव बळवंत फडकेंची लाठी, लोकमान्य टिळकांची लेखणी आणि सावरकरांनी कवितेलाच आपलं शस्त्र केलं. हर्षदा बोरकर यांची लेखणी, अजित परब यांचे संगीत, ‘शरयू’च्या कलाकारांची मेहनत आणि सोनिया परचुरे यांची विलक्षण संकल्पना, यातून ही कलाकृती तयार झाली. सोनिया यांनी केलेले नृत्य दिग्दर्शन व करवून घेतलेली एकूणच तयारी अप्रतिम आहे. याविषयी बोलताना सोनिया परचुरे म्हणाल्या की, “मुलांनी खरंच छान नृत्यनाटिका सादर केली. अजूनही छान करता आले असते. कारण, मी कधीच सादर झालेल्या कलाकृतीबाबत (त्यांच्याही आणि माझ्याही) समाधानी नसते.”
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.