सर्जनशील आणि कर्मयोगी दादा वाडेकर

    18-Mar-2023
Total Views |
 
Jaywant Harishchandra Wadekar
 
 
वाडा तालुक्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक जयवंत हरिश्चंद्र वाडेकर यांचे वयाच्या 82व्या वर्षी नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. वाडेकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पालघर जिल्ह्याचे माजी संचालक, पंचायत समिती सदस्य, पालघर जिल्हा भाजपचे प्रसिद्धी प्रमुख अशी विविध पदे भूषविली होती. तसेच एक यशस्वी उद्योजक, स्वातंत्र्यसेनानी, समाजसेवक म्हणूनही ते कायम स्मरणात राहतील. त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा लेख...
 
'जयवंत वाडेकर’ असं म्हंटल, तर खरंतर लक्षात येणार नाही. ‘दादा वाडेकर’ म्हंटल की, नेमकी तार जुळते. दादांना ओळखणार्‍या बहुतेकांना त्यांचे पहिले नाव ठाऊक असणे तसं दुर्मीळच. दादांशी माझी ओळख 2018 मध्ये अक्षय कृषी परिवाराने नागपूर येथे आयोजित केलेल्या एका बैठकीत झाली. या बैठकीत छोट्या आणि सीमांत शेतकर्‍यांसाठी हाताने आणि बैलांच्या साहाय्याने चालणार्‍या अवजारांच्या पुनरुज्जीवनासाठी एका देशव्यापी कार्यक्रमाच्या स्वरूपाची सघन चर्चा झाली. या बैठकीत दादांनी विषयतज्ज्ञ म्हणून विचार मांडले. हाताने किंवा बैलांच्या साहाय्याने चालणार्‍या अवजारांच्या पुनरुज्जीवनासाठी एक फिरते प्रदर्शन उभे करावे लागेल आणि सोबतच देशाच्या विविध भागात तिथल्या परिस्थितीनुरूप योग्य अवजारांची छोटीछोटी प्रदर्शने उभी व्हायला हवीत, हा त्यांनी मांडलेला महत्त्वाचा मुद्दा होता.स्वतःच्या यंत्रशाळेत असे छोटेखानी प्रदर्शन त्यांनी स्वतः उभारले होते. ‘बोलण्याइतकाच कृतीवर भर’ हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा भाग होता. या बैठकीच्यावेळी त्यांचे वय 75 वर्षे होते. सामान्यपणे हे वय म्हणजे निवृत्त होऊन शांतपणे घरी बसून राहण्याचे किंवा स्वतःच्या आरोग्याच्या प्रश्नांना सामोरे जाण्याचे असते. दादांसाठी हे दोन्हीही जणू अस्तित्वातच नव्हते.
 
नागपूरच्या बैठकीनंतर वेळोवेळी फोनवर आणि कारणपरत्वे अन्य एक-दोन ठिकाणी दादांशी भेटीगाठी होत राहिल्या. आमची शेवटची प्रत्यक्ष भेट मात्र मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात झाली. जून 2022 ते जानेवारी 2023 या दरम्यान अक्षय कृषी परिवाराने छोट्या आणि सीमांत शेतकर्‍यांसाठी हाताने आणि बैलांच्या साहाय्याने चालणार्‍या अवजारांच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्र सुरू करणे, यावर एक विचारमंथन चालवले. त्याचा भाग म्हणून एक संपूर्ण दिवस दादांसोबत त्यांच्या घरी आणि यंत्रशाळेत व्यतीत केला. तेव्हा खर्‍या अर्थाने दादांच्या सखोल चिंतनाची आणि खळाळत्या उत्साहाची प्रचिती आली. दादांची यंत्रशाळा म्हणजे त्यांचे कर्ममंदिर होते. तिथे त्यांच्यासोबत त्यांनी तयार केलेली वेगवेगळी शेती अवजारे प्रत्यक्ष पाहणे, त्या अवजारांचा जन्म कसा झाला हे ऐकणे आणि त्यांचा उपयोग कसा करायचा, हे प्रत्यक्ष समजावून घेणे, हा एक विशेष अनुभव होता. आत्ता हा स्मरणलेख लिहिताना जाणवतंय की पुन्हा तो अनुभव आता कधीही मिळणे नाही.
 
दादांच्या सोबत काम करणारी त्यांची टोळीही विशेषच होती. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागे असणार्‍या समुदायातील गुणी मुलांना आणि मुलींना हेरून, त्यांच्या शिक्षणाचा आधार होऊन तयार केलेले कारागीर म्हणजे दादांचे रोजचे सहकारी. त्यांच्या यंत्रशाळेत अशा पाच-सहा सहकार्‍यांना आम्ही भेटलो. त्यात मुलीसुद्धा होत्या. काही अवजारे दादांनी नव्याने तयार केली होती आणि काही पारंपरिक किंवा आधीच बाजारात उपलब्ध असलेली सुधारून केलेली होती. वेगवेगळ्या प्रकारचे विळे, छाटणीची हत्यारे, माती भुसभुशीत करण्याची, तण उपटण्यासाठीची अशी दादांनी त्यांच्या यंत्रशाळेत तयार केलेली असंख्य आयुधे आम्ही पाहिली. प्रत्येक आयुधाची माहिती दादा अत्यंत ममत्वाने सांगत होते, जणू काही एखाद्या आईने तिच्या गुणी मुलाचे कौतुक सांगावे तसे.
 
फक्त आयुधे नव्हे, तर दादांनी शेती सामान आणि शेतमाल वाहून नेण्यासाठी सुबक अशी माणसाच्या किंवा बैलांच्या श्रमाने चालणारी वाहनेसुद्धा तयार केली आहेत. 80च्या दशकांत दादांनी निर्मित केलेल्या बैलगाडीची ‘आयआयटी’ पवईच्या यंत्र विभागाने प्रशंसा केली होती. त्या काळात वर्षाला 12-14 गाड्या तयार करून महाराष्ट्रभर विकल्या असाव्यात, अशी आठवण दादांनी सांगितली होती. ‘आयआयटी’ पवईने केलेली प्रशंसा महत्त्वाची होतीच. परंतु, दादांच्या शब्दात सांगायचे, तर आजही त्या बैलगाडीला मागणी आहे, हे त्याहून महत्त्वाचे होते. बैल आधारित शेती अगदी कमी झाली आहे, शेतीसाठी बैलगाड्यांचा वापरही ट्रॅक्टरमुळे कमी झाला आहे. मागणी आली म्हणून एखाद-दुसरी बैलगाडी तयार करणे हे आर्थिक आणि तयार करण्यासाठी आवश्यक असणार्‍या सामग्रीच्या दृष्टीने तितकेसे संयुक्तिक नाही. त्यामुळे आता त्या बैलगाडीची निर्मिती थांबवली आहे, हेसुद्धा दादांनी अगदी मनमोकळेपणाने सांगितले.
 
ऑगस्ट 2022 मधील आमच्या भेटीच्या शेवटी दादांनी त्यांच्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला सांगितल्या. पहिली म्हणजे वेगवेगळी यंत्रे उघडून पाहणे, त्यात आपल्या गरजेनुसार बदल करून पुन्हा जोडणे, सुधार करीत राहाणे, अपेक्षित यश येईपर्यंत चिकाटीने पुन्हा पुन्हा प्रयोग करणे, या आपल्या आवडी त्यांनी आयुष्यभर जोपासल्या. ते अत्यंत सर्जनशील आयुष्य जगले. दुसरी म्हणजे, भगवद्गीतेचा अभ्यास. विनोबा भावेंच्या ‘गीताई’च्या माध्यमातून त्यांनी भगवद्गीता समजून घेतली. कर्मयोगी होण्याची प्रेरणा त्यांना गीतेतून मिळाली, असे त्यांनी आवर्जून सांगितले. ‘गीताई’ने त्यांना दिलेल्या दृष्टीच्याप्रती कृतज्ञता म्हणून आणि त्यांच्यासारखा लाभ इतरांना मिळो, या भावनेतून त्यांना भेटायला आलेल्या प्रत्येक अभ्यागताला ‘गीताई’ची एक प्रत ते भेट देत असत. मलाही त्यांच्या या औदार्याचा लाभ मिळाला आहे.
 
दादांनी आयुष्यभर ज्या विषयाला वाहून घेतले होते तो ‘हाताने आणि बैलांच्या साहाय्याने चालणारी शेती अवजारे’ हा तसा दुर्लक्षित राहिलेला विषय. शेतीच्या आधुनिकीकरणाचे धोरण, उत्पादन केंद्रित शेती, डिझेल, पेट्रोल, कोळसानिर्मित वीज अशा ऊर्जास्रोतांचे शेतीतील वाढते महत्त्व अशी त्यांची अनेक कारणे आहेत. परंतु, आपल्या देशातील 65 टक्के संख्या सीमांत (एक एकर किंवा कमी क्षेत्र) आणि छोटे (अडीच एकर किंवा कमी) या गटात मोडतात, त्यांच्याकडे उपलब्ध असणारी संसाधने बहुतांशी तुटपुंजी आहेत आणि बहुतेकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, हे लक्षात घेता कमी खर्चिक, सहज उपलब्ध होतील, अशा हाताने आणि बैलांच्या साहाय्याने चालणार्‍या शेती अवजारांचे महत्त्व वादातीत आहे.
 
दादांशी केलेल्या चर्चांतून समोर आलेला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, सध्या हाताने आणि बैलांच्या साहाय्याने चालणार्‍या शेती अवजारांचा प्रचार-प्रसार, स्थानिक पातळीवर आवश्यक ते बदल घडवणारी त्यांच्यासारखी माणसे यांची उणीव आहे. ती दूर करण्यासाठी योग्य ती पावले उचलणे, हीच त्यांच्यासाठी योग्य श्रद्धांजली ठरेल.
 
- रघुनंदन वेलणकर
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.