दिल्ली होणार प्रदूषण आणि वाहतूककोंडीमुक्त

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही रस्तेबांधणीत २० लाख टन कचर्‍याचा वापर

    17-Mar-2023
Total Views |
Delhi will be free from pollution and traffic jams

नवी दिल्ली : “देशाची राजधानी दिल्लीमध्ये सध्या ६० हजार कोटी रुपयांचे रस्ते आणि महामार्ग बांधणी प्रकल्प सुरू आहेत. त्याद्वारे लवकरच प्रदूषण आणि वाहतूककोंडीमुक्त शहर बनविण्यात येईल,” अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीतील ‘अर्बन एक्सटेन्शन रोड’ (युईआर-२) याच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की, “हा रस्ता तयार झाल्यानंतर दिल्लीतील वाहतूक आणि प्रदूषण या दोन्हीपासून दिलासा मिळणार आहे. यासोबतच हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधून येणारी वाहतूक दिल्ली शहरात न येता बाहेरूनच पुढे जाणार आहे. हा रस्ता पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, गुरुग्राम यांना जोडेल. ‘युईआर-२’चा प्रारंभ दिल्लीतील अलिपूर येथून होईल. त्यानंतर तो दिल्ली-चंदिगढ महामार्ग, दिल्लीतील मुंडका, बकरवाला, नजफगढ, द्वारका येथून महिलापालपुरजवळ दिल्ली-गुरुग्राम द्रुतगती महामार्गावर संपणार आहे.
 
यामुळे दिल्ली शहरावर येणारा वाहतुकीचा ताण कमी होईल,” असे गडकरी म्हणाले. सध्या दिल्लीमध्ये ६० हजार कोटी रूपयांची रस्ते-महामार्ग प्रकल्प सुरू असल्याचे गडकरी यांनी सांगितले.गडकरी म्हणाले की, “दिल्लीच्या विकास आराखड्यामध्ये ‘युईआर-२’साठी १९८० सालीच आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानंतर हा विषय मागे पडला. मात्र, आता या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या सहा महिन्यांत हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे.”


२ वर्षांत कचर्‍याचे डोंगर भुईसपाट


“दिल्लीमध्ये गाझीपूर, ओखला आणि भलस्वा येथे कचर्‍याचे डोंगर उभे राहिले आहेत. मात्र, येत्या दोन वर्षांत कचर्‍याचे डोंगर भुईसपाट होणार आहेत. त्यासाठी रस्ते बांधणीमध्ये कचर्‍याचा वापर करण्यात येत असून ‘युईआर-२’च्या बांधणीमध्ये २० लाख टन कचर्‍याचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे लवतरच दिल्लीस कचर्‍याच्या प्रदुषणापासून मुक्ती मिळेल,” असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

परालीपासून तयार होणार डांबर

 
“दिल्लीमध्ये हिवाळ्याच्या प्रारंभ आसपासच्या राज्यांमध्ये जाळल्या जाणार्‍या परालीमुळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होते. मात्र, त्यासाठी ’इंडियन ऑईल’तर्फे परालीपासून इथेनॉल आणि डांबर तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यात आला असून त्यास लवकरच मान्यता देण्यात येणार आहे.या प्रकल्पाद्वारे एक लाख लीटर इथेनॉल आणि १५० टन डांबराची निर्मिती केली जाणार आहे. यामुळे सध्या ८० लाख टन डांबराची आयात करावी लागत असली, तरी लवकरच भारत डांबराची निर्यात करेल, असे गडकरी यावेळी म्हणाले.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.