इंदापूर येथील श्री मालोजीराजेंच्या गढीच्या होणार संवर्धन

पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली माहिती

    15-Mar-2023
Total Views |
malojiraje-fort-in-indapur-will-be-conserved-mangalprabhat-lodha

मुंबई : हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा श्री मालोजीराजे भोसले यांच्या पराक्रमी इतिहासाला उजळा देण्यासाठी, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील जुनी कचेरी म्हणजेच मालोजी राजे यांच्या गढीच्या संवर्धनासाठी पर्यटन विभागातर्फे २ कोटींचे प्रावधान करण्यात येईल. तसेच या ऐतिहासिक स्थळाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात येईल!, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेतील लक्षवेधी प्रश्नाच्या उत्तरादरम्यान दिली आहे.
 
माजी राज्यमंत्री व इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी याबाबत विधानसभेत, लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा श्री मालोजीराजे यांनी पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात वास्तव्य केलेला भुईकोट किल्ला (जुनी तहशील कचेरी) हा, प्रशासकीय दृष्टीने महसूल विभागाकडे दप्तरी नोंद आहे. महसूल विभागाच्या नोंदीमध्ये मालोजीराजांच्या इतिहासाच्या बाबींचा उल्लेख आहे. इतिहासाची साक्ष असणाऱ्या या ऐतिहासिक जुनी तहशील कचेरी म्हणजेच मालोजीराजे यांच्या गढीचे संवर्धन करून जुने बुरुज गाव वेस बुधरे यांचे पुनर्जीवन करून, या कचेरीच्या जागेतच छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांचे स्मारक उभारावे.

 तसेच श्री मालोजीराजेंच्या पादुकासाठीही दगडी मूळ स्वरूपाचा चबुतरा उभारून, त्यांचे जीवनचरित्र महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी पर्यटन विभागाकडून प्रयत्न करणेबाबत मागणी करण्यात येत आहे. याविषयी राज्याचे पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सकारात्मक निर्णय घेतला असून, या गढीच्या संवर्धनासाठी पर्यटन विभागातर्फे २ कोटींचे प्रावधान करण्यात येईल. तसेच २ महिन्यांच्या आत गढीवर बैठक घेऊन, हा विषय तडीस नेण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. तसेच हे स्थळ ७ दिवसांच्या आत पर्यटनस्थळ म्हणून, घोषित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी, याठिकाणी दिली आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.