मुंबई : (Raj Thackeray) हिंदी सक्तीचे जीआर रद्द झाल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी दि. ३० जूनला पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले आहेत. तसेच मोर्चा रद्द झाला असला तरी ५ जुलैला विजयी मेळावा होणार असल्याचे सांगितले तसेच या मेळाव्याला पक्षीय लेबल न लावण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, "काल महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द केले किंवा महाराष्ट्राच्या जनतेने रद्द करायला त्यांना भाग पाडले. यासाठी मी जनतेचे आभार मानतो. सगळ्या बाजूंनी तो रेटा आला, त्यामुळे सरकारला जीआर मागे घ्यावे लागले. यासाठी मी मराठी कलाकार, साहित्यिक, मराठी वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या यांचेही आभार मानतो. हिंदीचा विषय श्रेयवादाचा नाही. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. ही प्रांताची भाषा आहे. सरकार पुन्हा या वाटेला जाणार नाही, अशी अपेक्षा आहे. मराठीच्या विषयात कोणतीही तडजोड होणार नाही", असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
मेळावा जरी झाला तरी त्याला पक्षीय लेबल लावण्यात अर्थ नाही - राज ठाकरे
“सरकारच्या निर्णयानंतर मला संजय राऊतांचा फोन आला. त्यांनी विचारले की, आता काय करायचं? त्यावर मी म्हणालो की, मोर्चा तर रद्द करावा लागेल. मग ते म्हणाले की आपण एक विजयी मेळावा घ्यायला पाहिजे. मी म्हटलं, घेऊयात. मी माझ्या लोकांशी चर्चा करेन आणि मग ठरवू की काय करायचं? अजून ठिकाण वगैरे काही ठरलं नाही. मेळावा जरी झाला तरी त्याला पक्षीय लेबल लावण्यात काही अर्थ नाही. हा मेळावा कोणत्याही पक्षाचा नाही तर मराठी माणसाच्या विजयाचा आहे आणि त्या दृष्टीकोनातून याकडे पाहिले पाहिजे. मराठी माणसानेही आपल्या आजूबाजूला काय घडतंय, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बाकीच्या गोष्टी मी ५ तारखेच्या मेळाव्यात सविस्तर बोलेन,” असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\