एकदाचा ‘ऑस्कर’ पटकावला, तेही दोन!

    15-Mar-2023
Total Views |
Oscars 2023 Winners

कार्तिकी गोन्सालवीस दिग्दर्शित ‘एलिफन्ट व्हीसपर्स’ हा तेलुगू भाषेतील लघुपट, शौनक सेनगिल दिग्दर्शित पूर्ण लांबीचा माहितीपट ’ऑल दॅट बिटर्स’ आणि आर. आर. राजमौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ या तेलुगू चित्रपटातील ‘नाटू नाटू’ हे गाणे आणि यात आपण दोन ‘ऑस्कर पुरस्कार’ प्राप्त केले, याचा अतिशय आनंद होत असला, तरी आपला अगदी कोणत्याही भारतीय भाषेतील चित्रपट ‘ऑस्कर’ कधी पटकावणार हा कळीचा मुद्दा दुर्लक्षित करुन चालणार नाही. सध्या आलेले आनंदाचे भरते ओसरल्यावर तरी याचा शांतपणे विचार करायला हवाच.


तुम्हालाही कल्पना आहे की, आजूबाजूला इतके आणि असे चित्रपट पुरस्कार झालेत आणि वर्षभर त्याचे ‘इव्हेन्टस’ सुरु असतात की, नेमक्या कोणत्या वर्षीचा आणि कोणत्या कामांसंदर्भात तो पुरस्कार देण्यात आला आहे, हेच समजत नाही. खुद्द कलाकाराला त्याची कल्पना नसावी.म्हणूनच तर ’राज्य चित्रपट पुरस्कार’, ’राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’, ’इफ्फी चित्रपट पुरस्कार’ असे करत करत ’ऑस्कर पुरस्कार’ अशी पुरस्काराच्या वलय आणि प्रतिष्ठा याची चढती भाजणी आहे.त्यात ‘ऑस्कर’ जगभरातील चित्रपट संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारा पुरस्कार आणि त्यात स्पर्धाही तगडी. म्हणजेच विजेत्याची जवळपास जगभरात दखल. अनेक वर्षांपासून आपली एकूणच चित्रपटसृष्टी, चित्रपट रसिक आणि प्रसार माध्यमे असेच मानत होती, आपल्याकडे हिंदी, मराठी, कन्नड वगैरे २२-२३ भाषांत वर्षभरात बाराशे वगैरे चित्रपट पडद्यावर येतात, तीच आपली ओळख, तिची आपली ताकद. ‘ऑस्कर’पासून आपण कायमच दूर राहणारे असेही आपण जणू गृहीत धरुन चाललो होतो. फार पूर्वीच मेहबूब खान दिग्दर्शित ’मदर इंडिया’ (१९५८) चा ऑस्कर पुरस्कार अगदीच थोडक्यात हुकला. वेशभूषाकार भानू अथ्थय्या यांना रिचर्ड अटनबरो दिग्दर्शित ’गांधी’ (हिंदी व इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये) या चित्रपटासाठी ‘ऑस्कर पुरस्कार’ प्राप्त झाला.

जागतिक ख्यातीचे दिग्दर्शक सत्यजित राय यांना १९९२ साली कोलकात्यातील त्यांच्या घरी येऊन ‘ऑस्कर पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. आपल्या देशातील चित्रपट रसिकांना आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ’लगान’ (२००१) ला ’ऑस्कर’मध्ये विदेशी चित्रपटाच्या नामांकनात स्थान मिळाले आणि ‘ऑस्कर पुरस्कार’ निवड प्रक्रिया कशी असते. त्याच्या एकेक फेरीतील गुण या प्रक्रियेची साधारण ओळख झाली. खुद्द आशुतोष गोवारीकर अमेरिकेत गेला, त्याने ’ऑस्कर’ परीक्षकांसाठी ’लगान’ च्या खेळांचे एकेक करत आयोजन केले. तेव्हा अशी कुजबूज होती की, आशुतोषला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय हे पाहून मग या चित्रपटाचा निर्माता आमिर खान अमेरिकेत गेला. ’लगान’ ‘ऑस्कर पुरस्कार’ पटकावण्यात यशस्वी ठरला असता, तर तो एक ‘ट्रेंड’ सेटर चित्रपट ठरला असता आणि अधिकाधिक प्रमाणात वेगळे विषय आपल्या चित्रपटात पाहायला मिळाले असते.

संदीप सावंत दिग्दर्शित ’श्वास’ (२००३)ची ‘ऑस्कर पुरस्कारा’साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड होताच, मराठी मन प्रचंड आनंदले. दरम्यानच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीत आलेला तोचतोचपणा झटकला गेला. त्यानंतर परेश मोकाशी दिग्दर्शित ’हरिश्चंद्राची फॅक्टरी’ (२०१०) आणि चैतन्य ताह्मणे दिग्दर्शित ’कोर्ट ’ (२०१४) हे चित्रपट याच पद्धतीने दाखल होताच मराठी चित्रपटसृष्टीला एक प्रकारचे प्रोत्साहन अथवा ‘टॉनिक’ मिळाले. यातील एखाद्या चित्रपटाला ’ऑस्कर पुरस्कार’ प्राप्त झाला असता, तर मराठी चित्रपट आज किमान ५० पावले पुढे असतात. चित्रपटाच्या जगात यश हेच सर्वात जास्त चलनी नाणे असते आणि त्यात ‘ऑस्कर पुरस्कार’ प्राप्त झाल्याने मराठीत आणखीन काही वेगळे प्रयोग झाले असते, असा विश्वास आहे. मीरा नायर दिग्दर्शित ’सलाम बॉम्बे’चे ‘ऑस्कर’ तसेच डॅनी बोयेल दिग्दर्शित ’स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटाला गीतसंगीतासह आठ ‘ऑस्कर पुरस्कार’ प्राप्त झाले, तरी हे चित्रपट अमेरिकेन प्रवेशिका होती. हा झाला छोटासा फ्लॅशबॅक.

अमेरिकेतील ९५व्या ‘ऑस्कर पुरस्कार’ सोहळ्यात कार्तिकी गोन्सालवीस दिग्दर्शित ’एफिलन्ट व्हीसपर्स’ या लघुपटाला आणि राजमौली दिग्दर्शित ’आरआरआर’ या तेलुगू भाषेतील चित्रपटातील सुपर हिट गाणे ‘नाटू नाटू’ याला ‘ऑस्कर पुरस्कार’ प्राप्त झाला. ‘नाटू नाटू’ या गाण्यावर ’ऑस्कर पुरस्कार’ सोहळ्यात ज्युनियर एन. टी. आर आणि रामचरण यांनी नृत्य साकारले. या गीताचे नृत्यदिग्दर्शक प्रेम रक्षित यांचे आहे. गीत चंद्रा बोस यांचे, तर संगीत एम. एम. किरापनी यांचे आहे. ’नाटू नाटू’ म्हणजे डान्स डान्स. हे गाणे या चित्रपटाच्या कन्नड व मल्याळम ‘डब’ आवृत्तीत आहे. पण, हिंदीत ‘नाटू नाटू’ असेच कायम ठेवून लोकप्रियता संपादली.हे घडले आणि चित्रपट रसिकांत आनंद व्यक्त होत असतानाच दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटाच्या प्रगतीकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे. यावर्षी ’छेल्लो शो’ (अर्थात लास्ट शो) हा चित्रपट आपली अधिकृत प्रवेशिका होती. त्या चित्रपटाचा ‘ऑस्कर’च्या पहिल्या फेरीत तरी निभाव लागेल काय, अशी एक शंका होती आणि झालेही तसेच. याउलट यावर्षी अनेक चित्रपट, लघुपट, माहितीपट, गाणे यांची स्वतंत्र प्रवेशिका होती. अगदी निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ’मी वसंतराव’ हा संगीतमय मराठी चित्रपटही होता. पण, तो नामांकनापर्यंत पोहोचू शकला नाही.

आपल्या देशातील एकाही चित्रपटाला यावर्षीही नामांकन प्राप्त झाले नाही, याचाच अर्थ अजून आपल्याला पूर्ण लांबीच्या चित्रपटाबाबत बरीच प्रगती करावी लागेल, हे मुद्दाम अधोरेखित करतो. मग नामांकन कोणाला मिळाले तर कार्तिकी गोन्सालवीस दिग्दर्शित ’एलिफन्ट व्हीसपर्स’ हा तेलुगू भाषेतील लघुपट, शौनक सेनगिल दिग्दर्शित पूर्ण लांबीचा माहितीपट ’ऑल दॅट बिटर्स’ आणि आर. आर. राजमौली दिग्दर्शित ’आरआरआर’ या तेलुगू चित्रपटातील ‘नाटू नाटू’ हे गाणे आणि यात आपण दोन ‘ऑस्कर पुरस्कार’ प्राप्त केले, याचा अतिशय आनंद होत असला, तरी आपला अगदी कोणत्याही भारतीय भाषेतील चित्रपट ‘ऑस्कर’ कधी पटकावणार हा कळीचा मुद्दा दुर्लक्षित करुन चालणार नाही. सध्या आलेले आनंदाचे भरते ओसरल्यावर तरी याचा शांतपणे विचार करायला हवाच.’आरआरआर’च्या हिंदी डब आवृत्तीत तुम्ही अतिशय उत्फूर्तपणे साकारलेले ‘नाटू नाटू’ नक्कीच पाहिले असणार. ‘ऑस्कर’ प्राप्त झाल्यावर युट्यूबवरही या गतिमान गाण्याचा आनंद तुम्ही घेतला असणारच.आता महत्त्वाची गोष्ट, मानाच्या या पुरस्कारांनी दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टी अधिक ताकदवान आणि ‘फोकस्ड’ बनेल का, तर याचे उत्तर होय आहे. व्यावसायिकदृष्ट्या त्यांनी ’डिजिटल’ युगात केव्हाच पुढची पावले टाकली. त्यांना आपल्याकडील एका भाषेतील चित्रपट हिंदीसह अन्य भाषेत ‘डब’ करण्याचा सपाटाच लावला. ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मवरही ते वेगाने स्थिरावले. काही चित्रपटांना यश, तर काही चित्रपटांना अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे मानतच त्यांनी नियोजन केले.


‘ऑस्कर’ प्रवेशिका हेदेखील योग्य नियोजनच आहे. भविष्यात ते आपले प्रादेशिक भाषेतील चित्रपट अधिकाधिक नियोजनाने ’ऑस्कर’ला पाठवतील.अजून एक महत्त्वाची गोष्ट, ‘ऑस्कर पुरस्कारां’ची जगभरातील चित्रपटसृष्टी आणि माध्यमांतून दखल घेतली जाताना दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट म्हणजेच भारतीय चित्रपट अशी प्रतिमा निर्माण झालीच, तर तो हिंदी चित्रपटसृष्टीला (ज्याला उगाचच ‘बॉलिवूड’ म्हणतात) धक्काच असेल. आणि त्यात आश्चर्य असे काही नाहीच (तसे व्हायला हवे असे मानणारा एक वर्ग समाजात आहे, हे सोशल मीडियातील प्रतिक्रियांमधून दिसतेय) आणि मराठीचे काय? मराठीतही उत्तम आशयावरचे चित्रपट निर्माण होतात, गाणीही लोकप्रिय होतात. मराठीला ‘मार्केटिंग’ची पद्धत बदलावी लागेल का? की भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून ’मराठी चित्रपटाची निवड झाली रे झाली’ की नेहमीप्रमाणेच आनंदून यायचं?तूर्त ‘ऑस्कर पुरस्कार’ विजेत्यांचे अभिनंदन. हा दाक्षिणात्य चित्रपट, तो बंगाली चित्रपट असा या संदर्भात भेदभाव नकोच. तरी राहून राहून एकच वाटतेय, आपल्या पूर्ण लांबीच्या चित्रपटापासून अजून किती काळ ‘ऑस्कर’ दूर राहणार? की अनेक भाषांतील चित्रपट निर्मितीच्या संख्याबळात आपण जगात पुढेच आहोत, हा आनंद सोबतीला आहेच. जय हो! जय चित्रपट!



-दिलीप ठाकूर


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.