दादा माझ्या वडलांच्या पिढीतले. मूळचे अभियांत्रिकी उद्योजक. ठाणे, पालघर जिल्ह्यातल्या वाडा गावचे. तिथे एस्टी स्टँडवर उतरून कोणालाही विचारावं, दादा वाडेकरांचे घर... पत्ता मिळायचा. अनेकांचे पत्ते दादांच्या घराच्या संदर्भाने असायचे. घर काही असामान्य नव्हते. माणूस असामान्य होता...
उद्योग पुढच्या पिढीकडे सोपवून दादांनी शेतीत उतरायचे ठरवले. आणि काम करताना लक्षात आले की मजुरांचे आणि छोट्या शेतकऱ्यांचे हाल होतात, अवजारे योग्य नसल्यामुळे. मग दादांच्या शब्दात सांगायचं, तर ते लोहार झाले! त्यांनी अवजारांवर संशोधन सुरू केले.भात कापताना करंगळीला जखम होऊ नये म्हणून विळ्याच्या पात्याला एक एल्बो जोड देऊन पात्याचा कोन त्यांनी बदलला. कानशीने घरीच धार लावता येईल, असा धातू वापरला. मग चिकूसाठी वेगळा झेला, आंब्यासाठी वेगळा. त्यात देठ तुटू नये अशा पद्धतीने पाते लावलेले. मोगऱ्यात किंवा छोट्या झुडपी पिकात फांद्या कापण्यासाठी जी कात्री केली, तिला अंगठ्याभोवती सहज लटकेल असे इलॅस्टिक लावले. छोट्या सरी काढताना योग्य असे फावडे आणि त्याच फावड्याच्या मागील बाजूला टिकावाचे पाते लावलेले... म्हणजे एकच अवजार मळ्यात नेले तरी दोन्ही कामे होतील.
भुईमूग पाल्यापासून वेगळा करण्याची विळी तर गजब आहे. पात्याला आणि मुख्य अंगाला वेगवेगळे धातू वापरून अनेक अवजारांचे वजन त्यांनी कमी केले होते. यातली अनेक अवजारे मी स्वतः वापरून पाहिली आहेत. एकदा आमच्या चळवळीच्या गावातल्या १०० शेतकऱ्यांना त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो. तेव्हा ३०-३५ प्रकारची अवजारे या सर्वांनी वापरून पाहिली. आणि हरखून गेले. प्रत्येकाने काही ना काही खरेदी केलेच. शहरातले मॉल बघून आमच्या शेतकऱ्यांना कधी काही खरेदी करावेसे वाटत नाही, त्यातले काही त्यांच्या जगातच नसते. पण दादांच्या वर्कशॉपवर मात्र काय घेऊ नि काय नको असे त्यांना झाले होते. अनेक जणांनी तर गटाने भिशी करून हत्यारे घेतली.दादांकडे अशा अनेक ठिकाणचे शेतकरी येत, काही वेळा आपल्या अडचणी सांगून दादांना एखादे नविन अवजार तयार करायला लावत. अडचण कळली की दादा सळसळत्या उत्साहाने संशोधनाला लागत. वयाच्या ८० वर्षापर्यंत मी दादांना ठणठणीत आणि सक्रिय पाहिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दादा जुने कार्यकर्ते. यशस्वी उद्योजक असूनही श्रीमंती त्यांनी कधी अंगावर मिरवली नाही. आपल्या जीवनातल्या प्रत्येक कृतीतून समाजरूप जनार्दनाची सेवा म्हणजे संघाचे काम. असे मानणाऱ्या आणि जगलेल्या पिढीतले दादा वाडेकर. परवा त्यांनी देह ठेवल्याचे कळले. एका सुफल जीवनाचे निर्माल्य झाले.
संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आमचे दादा वाडेकर यांचे आज वृद्धापकाळाने दैवज्ञा झाल्याची दुःखद वार्ता कानी पडली.काही दिवसापूर्वी आजाराने त्रस्त असलेला दादांनी आज सायंकाळ च्या सुमारास राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.शेवटच्या श्वासापर्यंत संघाचे काम निस्वार्थपणे दादांनी केले.दोन-तीन महिन्यापूर्वी घराच्या समोरील पटांगणात बालकांची सायंकाळी शाखा लावून... शाखाप्रमुख म्हणून जबाबदारी पार पडत... त्या बालकांच्यात रमलेले मी पाहिलेत.. कोवळ्या मनावर देशभक्तीचे प्रखर राष्ट्रप्रेम निर्माण करण्यासाठी देशभक्तीपर गीते... क्रांतिकारकांचे विचार... व शरीर बळकट होण्यासाठी.. शारीरिक खेळ...दादा शाखेत घेत...बाल... तरूण वा प्रौठ स्वयंसेवक असो सर्वांना एकाच धागेत बांधणारे दादा समाजकार्य करून महान अशा राष्ट्रकार्यात स्वतःला झोकून देले.चैतन्याचा झरा असलेले दादा वाडेकर आंम्हा वाडा शहर व तालुक्यातील स्वयंसेवकांचे जणू पालक होते... तरुण वयापासून ते शेवटपर्यंत दादांनी आपल्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या.व्यवसायाने कृषी क्षेत्राशी निगडित असल्यामुळे.
कृषी अवजारे बनवणारे एकमेव कंपनी हे दादा वाडेकराची होती आणि आजही आहे असे बोलले तरी वावगे ठरणार नाही.. तालुक्यातील शेतकऱ्यांना योग्य प्रकारे शेती करता यावी.. शेतीतून विविध प्रकारे उत्पन्न मिळावे यासाठी कृषी अवजारांचे संशोधन व शोध लावून शेतकऱ्यांसाठी ते उपलब्ध करून देणारे महान कृषिरत्न दादा होते...वक्ता कसा असावा एक उत्तम उदाहरण दादा होते.. मुद्देसूद मांडणी, विविध विषयांचे सखोल अभ्यास... प्रचंड शब्दभंडार... वृद्ध असूनही तरुणांना लाजवेल असा प्रखर आवाज... कायमच स्मरणात राहील.आदरणीय दादांनी आपल्या मुलांना,नातवंडानां , लहानपणापासूनच संघाचे शिकवणीत मोठे करून समाजकार्य पुढे निरंतर सुरू ठेवण्याचे दीक्षा दिली.वाडा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक संस्था संघटनेच्या कार्यावर दादांचा आत्मियतापूर्ण शैलीचा प्रभाव होता..त्यांच्या निधनाने संघाचा चालता बोलता स्मृतीकोष चिरशांत आला आहे.. एका निस्वार्थी आणि समाजकार्यस आयुष्य चुकून दिलेल्या व्यक्तिमत्त्वाची पोकळी वाडा तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कायम जाणवत राहील. दादा...!आमचा अखेरचा आपणांस वंदेमातरम.. भारत माता की जय...
८२ वर्षाचा तरुण हरपला : वाड्याचे स्वयंसेवक दादा वाडेकर यांना देवाज्ञा
“दुरीतांचे तिमिर जावो विश्वस्वधर्मे सुर्ये पाहो जो जे र्वांछिल तो ते लाभो प्राणी जात “ अशा भावनेतून प्रत्यक्ष जीवन जगणारे , प्राणी पक्षांना रोज खाऊ घातल्याशिवाय ज्यांचा दिवस उगवलाच नाही असा करूणेचा सागर आज अचानक आटला तो कायमचा.. उद्योजकता संशोधन या कौशल्याचा केवळ स्वतःलाच लाभ न देता सर्व समाजाला लाभ मिळावा त्यासाठी सतत कष्ट करत राहणे आणि समाधान पावणे हा त्यांच्या जीवनाच्या प्रवासाचा ठरलेला पथ होता लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा पुढे नेण्यासाठी त्यांचे शाखा चालू ठेवण्याचे शेवटपर्यंत प्रयत्न चालू होते शाकाहाराचा आग्रह धरताना अनेक वेळा जवळच्यांबरोबर संघर्ष करायला ते कधी धजले नाही . चांगला आहार आणि व्यायाम हा त्यांच्या सुदृढ जगण्याचा मंत्र होता . यशस्वीपणे उद्योग सांभाळताना समाजकार्याची कास कधी सोडली नाही त्यामुळेच आणीबाणीमधेही संपूर्ण वाड्यातून त्यांनाच कैद झाली होती . आपल्या घराला समाज जीवनाचे आधार केंद्र बनवणारे , संपूर्ण कुटुंबाचे आदर्श आणि प्रेरणादायी कर्ता असलेले दादा आपल्या तीनही मुलांमध्ये सुनांमध्ये आणि नातवांमध्ये दिलेले संस्कार पाहताना समाधान पावत होते . समाजाभिमुख आयुष्य जगणारे आणि अजून पुढे अनेक वर्ष समाज सुलभतेच्या कामांची यादी पूर्णत्वाला नेण्यासाठी सज्ज असतानाच त्यांची मरणाबरोबर झुंज चालू झाली आणि अखेर ही झुंज त्यांच्या मृत्यूने थांबली . स्वयंसेवक ,स्वातंत्र्य सेनानी ,उद्योजक ,संशोधक ,सच्चा समाजसेवक ,आदर्श कुटुंब प्रमुख , आणि बघणाऱ्याला लाजवणारे ८२ वर्षाचे तरुण व्यक्तिमत्व आज पंचतत्वात विलीन झाले. प्रचंड जनसमुदायात त्यांचा हा शेवटचा प्रवास…
शब्दांकन- अनंता दुबेले (वाडा)