गोदामाईसाठी ‘एन् ट्रीट’ची ‘रिट्रीट’

    12-Mar-2023
Total Views |
river cleaning experiment is going to be done using 'N Treat' device for water treatment in drains


नाशिकची जीवनवाहिनी गोदावरीला प्रदूषणमुक्तीच्या विळख्यातून सोडण्यासाठी ‘कल्क’च्या प्रयोगानंतर आता येत्या एप्रिल पासून नाल्यांमधील पाण्याच्या प्रक्रियेसाठी ‘एन् ट्रीट’ नावाच्या उपकरणाद्वारे नदी स्वच्छतेचा ‘प्रयोग’ केला जाणार आहे. ’एन् ट्रीट’द्वारे नाल्यामधील सांडपाण्यावर प्रयोग करुन मगच ते नदीपात्रात जाणार आहे.नाशिक शहरात जवळपास ३५ ते ४० नाले असून त्यातील बहुतांश नाल्यामधून मलयुक्त दूषित पाणी वाहते. नैसर्गिक नियमाप्रमाणे हे दूषित नाले उतारामुळे पुढे वालदेवीसह गोदामाईला जाऊन मिळतात. गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी केल्या जाणार्‍या उपायांर्तगत महापालिकेला ‘आयआयटी’ पवईच्या चमूने सहकार्य करत सर्वेक्षणकरत आहे. त्यातून या चमूने ‘एन्ट्रीट’चा पर्याय महापालिकेला सुचवला. प्रायोगिक तत्त्वावर प्रारंभी शहरातील पाच नाल्यांमधील पाण्यावर याद्वारे प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामध्ये विहितगाव जवळील डोबी नाला, चेहेडी नाला, गंंगापूर गावाजवळील चिखली नाला, नाशिक रोडवरील ’फेम सिनेमा’जवळील नाला आणि वाघाडी नाला (ही पूर्वी स्वच्छ नदी होती) या नाल्यांची निवड पहिल्या टप्प्यात करण्यात आली आहे. नाल्याच्या उगम ठिकाणीच सांडपाण्यावर प्रक्रिया करुन प्रक्रियायुक्त पाणी नद्यांमध्ये प्रवाहित करण्याचा हा ’पायलट प्रकल्प.’ याद्वारे नदीमध्ये प्रचंड प्रमाणात मिसळणारे प्रदूषण काही अंशी, तरी कमी होईल असे वाटते. पाणी दूषित होण्याच्या स्रोताची आणि त्यावर प्रक्रिया करुन ते स्वच्छ करण्याचे प्रमाण अत्यंत व्यस्त असल्याने हा केवळ प्रयोग तितकासा प्रभावी ठरणार नाही, असे नदी प्रदूषण अभ्यासक सांगातात. कसेही असले तरी निदान महापालिका गोदा प्रदूषणमुक्तीसाठी पर्यायी प्रकल्प राबवत आहे, हेही आश्वासकच.मागील महिन्यात ’कल्की’चा प्रयोग झाल्यानंतर हा दुसरा प्रयोग. ‘कल्की’ ही सूक्ष्मजंतूंचे मिश्रण असलेली जैविक मात्रा पुण्यातील वेंगुर्ला येथील ‘औंदुबर अक्षय साहाय्य फाऊंडेशन’चे अजितकुमार परब यांनी विकसित केली. त्यामध्ये तीन हजार वनस्पती, जीवाणू, एकपेशीय वनस्पती, ‘इष्ट’सारख्या सूक्ष्म जंतूचे शक्तिशाली मिश्रण असून त्याचे द्रवरुप नदीमध्ये सोडले गेले. ‘कल्की’ जैविक प्रयोग असून त्यातून नदी शुद्धीकरणाचा प्रयोग नाशिकमध्ये झाला. जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी नाशिकमधील वडाळा येथील साईनगरी मध्ये कल्की वापराचा शुभारंभ केला. त्यानंतर ‘एन्ट्रीट’चा होऊ घातलेला प्रयोग स्वागतार्ह आहे.

 
‘तारांकित’ रस्ता...!


नाशिक पूर्वचे आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी पेठ रोडच्या दुरवस्थेसंदर्भात विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. याद्वारे प्रशासानाचे लक्ष वेधल्यानंतर राज्य शासनाने पेठ रोडचे डांबरीकरण येत्या तीन महिन्यांत करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या पावसाळ्यापासून पेठ रोडवर एक ते दीड फुटांचे खड्डे पडले आहेत. या रोडचे क्राँक्रिटीकरण करण्यासाठी निधी नाही, अशी सबब दाखवून महापालिकेने ७१ कोटी रुपयांच्या क्राँक्रिटीकरणाचे काम थंड बस्त्यात ठेवले. नगरविकास खात्याचे अपर सचिव शंकर जाधव यांनी येत्या तीन महिन्यांत नाशिक महापालिकेच्या हद्दीतील रस्त्याची डांबरीकरणाने पुनर्बांधणी करावी, असे निर्देश दिले. अखेर या प्रश्नांवर राज्याच्या नगरविकास खात्याला नाशिक महापालिकेचे कान टोचावे लागले. सक्षम आणि कार्यक्षम आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला ते योग्यच होते! ‘राऊ हॉटेल’पासून पुढे दिंडोरीची हद्द सुरु होईपर्यंत जवळपास साडेसहा किमीच्या पेठ रोडची सध्याला अक्षरश: चाळण झाली आहे. गुजरातकडून येणार्‍या पर्यटकांसह रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असणार्‍या वसाहतीतील नागरिकांसाठी रस्त्यांची दुरवस्था डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यांमुळे पेठकडून भाजीपाला व अन्य अवजड मालवाहतूक करणार्‍या वाहनांची अतिशय दयनीय अवस्था होत आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यापासून आजर्यंत रस्त्यासाठी शंभराच्या वर आंदोलने झाली. आ. ढिकले यांनीही याबाबत महापालिकेकडे नियमितपणे पाठपुरावा केला. त्यावर पालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असल्याचे कारण दिले गेले. नंतर यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे ७१ कोटी रुपयांची मागणी केली गेली. तिथेही हिरवा कंदील मिळाला नाही. त्यानंतर राज्याच्या बांधकाम विभागाकडे रस्ता हस्तांतरित करुन निदान तिकडून तरी निधी मिळतो का, याचीही चाचपणी झाली. तेही ‘सपशेल’ अपयशी ठरल्यानंतर अखेर आ. अ‍ॅड, ढिकले यांनी विधानसभेत ‘तारांकित’ प्रश्न उपस्थित करण्याचे अस्त्र उगारले, हे योग्यच झाले..! येत्या तीन महिन्यांत डांबरीकरणाने पेठ रस्ता तयार करण्याचे निर्देश राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने दिले. आता विहीत कालावधीत रस्ता होणार किंवा कसे याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर पेठ रस्त्यांचे ‘काँक्रिटीकरण’ होणे अधिक योग्य आहे. कारण हा अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. येथेही दूरदुष्टीचा आभाव दिसला. निदान डांबरीकरणाने रस्त्यांची पूणर्बांधणी तरी वेळेत व्हावी हीच अपेक्षा...!



-निल कुलकर्णी




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.