ठाणे : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाने मिळविलेल्या दणदणीत विजयाने कार्यकर्त्यांना एक वेगळी उर्जा मिळाली आहे. या विजयाबद्दल रविवारी ठाणे शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खोपट कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. ढोल-ताशे, बॅण्डच्या गजरात नृत्याबरोबरच मिठाई वाटत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या योजनांना तिन्ही राज्यातील जनतेने पसंती दिली. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपाला कौल मिळून नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असा विश्वास जिल्हाध्यक्ष वाघुले यांनी व्यक्त केला.
लोकसभेची `सेमी फायनल' मानली जाणाऱ्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीबद्दल राजकीय वर्तुळात उत्सूकता होती. सकाळपासून निकाल जाहीर होण्यास सुरूवात झाल्यानंतर भाजपाने आघाडी घेतली होती. त्यानंतर ठाणे शहरातील कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालयाबाहेर जमून आनंद व्यक्त केला. तसेच मिठाई वाटून जल्लोष केला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आनंदोत्सवाला भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, सरचिटणीस मनोहर सुखदरे, सचिन पाटील, डॉ. समीरा भारती, उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी, विक्रम भोईर महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहा पाटील, सचिन केदारी, बाळा केंद्रे, मंडल अध्यक्ष विकास घांग्रेकर, दिलीप कंकाळे, सचिन सावंत, सुदर्शन साळवी, हेमंत म्हात्रे, किरण मणेरा, शीतल कारंडे, अर्चना पाटील, वृषाली वाघुले-भोसले आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात गरीबांच्या कल्याणासाठी योजना राबविण्यात आल्या. भाजपा कार्यकर्त्यांनी प्रत्येक गरजू कुटुंबांपर्यंत योजना पोचवून सामान्यांना मदत केली. त्यामुळे आज विजय मिळाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतही भाजपाला यश मिळेल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी व्यक्त केला.