'निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालया'ला अजूनही टाळाच!
पालिकेच्या कामकाजावर टिकेची झोड
12-Dec-2023
Total Views | 89
मुंबई (समृद्धी ढमाले): पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या 'निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहायला'वर गेल्या अनेक दिवसांपासुन ताशेरे ओढले जात आहेत. या प्राणीसंग्रहालयातील ३६ प्राण्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची चौकशी करावी अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवार दि. १२ डिसेंबर रोजी केली आहे. प्राणीसंग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यूची घटना गंभीर असली तरी या प्राणीसंग्रहालयावर इतरही अनेक प्रश्न उपस्थीत केले जात आहेत.
१९९० साली सुरू झालेल्या या छोटेखानी प्राणीसंग्रहालयाला २०१७ पासुन टाळा लागलेला आहे. नुतनीकरणासाठी बंद असलेले हे प्राणीसंग्रहालय उघडण्याची प्रतिक्षा गेली सहा वर्ष स्थानिकांकडून करण्यात येत आहे. नूतनीकरणाच्या कामाला विलंब का होत आहे?, केंद्राकडून दिल्या गेलेल्या निधीचे काय झाले?, गेल्या दोन वर्षांत प्राणीसंग्रहालय सल्लागार समितीची एकही बैठक का झाली नाही? अशा अनेक प्रश्नांनी आता डोकं वर काढलं आहे. याबाबत प्राणीसंग्रहालयातील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या सर्व कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थीत होत असून प्राणीसंग्रहालय लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
दरम्यान, ३६ प्राणी दगावल्याच्या घटनेबाबत आमदार अश्विनी जगताप यांनी प्रश्नोत्तराच्या तासात मुद्दा उपस्थित केला होता. याला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी चौकशीचे आदेश देत हे प्राणीसंग्रहालय वनविकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश ही देण्यात आले आहेत.
६ वर्षांत दगावले ३६ प्राणी
२०१७ ते २०२३ या कालावधीमध्ये या प्राणीसंग्रहालयातील ३६ प्राणी दगावल्याचे वृत्त समोर आले. यामध्ये मगर, कासव, पक्षी आणि सापांचा समावेश आहे. या प्राण्यांचे शवविच्छेदन औंध येथील शासकीय पशूरुग्णालयात केले असून नैसर्गिक किंवा आजारपणातुन या प्राण्यांचे मृत्यू झाल्याचे अहवालात म्हंटले असून हा अहवाल सी. झेड. ए (सेंट्रल झू ऑथोरिटी) कळविण्यात आले आहे.
“सध्या प्राणीसंग्रहालयात एकुण १८५ प्राणी आणि पक्षी असून पशुवैद्यकांमार्फत त्यांची देखरेख केली जात आहे. सर्वांचे आरोग्य सध्या व्यवस्थीत असून नुतनीकरणामध्ये पिंजऱ्यांमध्ये बदल केल्यानंतर त्यांना नवीन पिंजऱ्यांमध्ये हलविण्यात येणार आहे.”
“२०२१ पासुन प्राणीसंग्रहालय सल्लागार समितीची (Zoo Advisory) एकही बैठक पालिकेने घेतली नाही, त्यामुळे प्राणी मृत्यूमुखी पडलेल्या प्राण्यांविषयी माहिती वनविभागाला असणे शक्यच नाही. त्यातही, नुतनीकरणाचे काम किती टक्के झाले, निधी किती बाकी आहे, प्राणीसंग्रहालयाचा अॅनिमल कलेक्शन प्लॅन काय आहे, याबाबत ही माहिती दिली जात नसल्यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरीतच राहतात.”