ठाणे : बहुमजली टॉवर्स, मोठमोठे फ्लायओवर्स म्हणजे शहराचा विकास नाही. सर्वसामान्यांना परवडतील अशा दरात उपचार देणारी रुग्णालये, शाळा,परिवहन सेवा आणि उत्तम पर्यावरण ही कोणत्याही शहराच्या विकासाची मापदंडे असायला हवीत, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी व्यक्त केले.
शनिवारी संध्याकाळी प्राच्यविद्या अभ्यास संस्थेत पुरातत्व अभ्यासक जो अल्वारिस यांच्या पुरातत्वीय छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन तसेच त्यांनी लिहिलेल्या ‘ठाणे- द इर्टनल सिटी’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात न्या. ओक बोलत होते. यावेळी माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका डॉ. शोमा घोष, प्राच्यविद्या अभ्यास संस्थेचे ड़ॉ. विजय बेडेकर उपस्थित होते.
"गेल्या काही वर्षात ठाणे शहराचा विकास झाला असला तरी या प्रक्रियेत निसर्ग आणि पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाला. पूर्वी ठाण्यात ४७ तलाव होते. त्यापैकी आता केवळ २७ उरले आहेत. मोठ्या प्रमाणात असणारी हिरवाई वृक्षतोडीने नाहीशी झाली आहे. शिलाहारकालीन कौपीनेश्वर मंदिर, चर्च, सिनेगॉग, जैन मंदिर, अग्यारी, मशिदी सेक्युलर ठाण्याची साक्ष देतात," असेही अभय ओक यांनी त्यांच्या भाषणात नमूद केले.
पुस्तक प्रकाशनापूर्वी ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ यांनी जो अल्वारिस यांच्याशी साधलेल्या संवादातून ठाणे शहराच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरांचा परामर्श घेतला गेला. "मुंबईच्या तुलनेत ठाणे हे कितीतरी प्राचीन शहर आहे. कल्याण, नालासोपारा, घोडबंदर येथील बंदरांमधून मोठ्या प्रमाणात जगभरात माल वाहतूक होत होती. विविध संस्कृती येथे नांदल्या. त्यांच्या खुणांचे जतन, संवर्धन केले तर पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो. ऐतिहासिक खुणांच्या जतनातून जगभरात अनेक ठिकाणी पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली आहे. रोम, जेरूसेलेम त्याची ठळक उदाहरणे आहेत," असे जो अल्वारिस यांनी सांगितले.
महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहराची ऐतिहासीक खुणा आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्यासाठी प्रशासन शक्य ते सर्व प्रयत्न करेल, अशी ग्वाही यावेळी बोलताना दिली. विनय सहस्त्रबुद्धे यांनी त्यांच्या भाषणात ठाणे शहराचा ऐतिहासिक संदर्भ असणारे सर्व दस्तऐवज संकलीत करावेत. एक विशिष्ट्य दिवस ठरवून ठाणे दिन साजरा करावा. नागरिकांना शहराविषयी आपलेपणा वाटेल, असे उपक्रम राबवावेत. जो अल्वारिस यांच्या इंग्रजी पुस्तकाचे संक्षिप्त स्वरूपात मराठी आणि हिंदीमध्ये आवृत्ती प्रसिद्ध करावी, अशा सूचना केल्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन नरेंद्र बेडेकर यांनी केले. ठाणे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.