राणीच्या बागेत दिवाळीनिमित्त उच्चांकी गर्दी

    18-Nov-2023
Total Views |



mumbai zoo



मुंबई (विशेष प्रतिनिधी): भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयात दिवाळीनिमित्त लाखो पर्यटकांनी भेटी दिल्या असून या गर्दीने आत्तापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. दिवाळीच्या कालावधीत म्हणजेच दि. १० ते १५ नोव्हेंबर दरम्यान १,१४,५९० पर्यटकांनी भेट दिली आहे. तर, यातुन ४३,३५,०४५ रुपयांचा महसूल गोळा झाला आहे.
दिवाळीमुळे मोठ्या सुट्ट्यांचा कालावधी आल्यामुळे अनेक पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली आहे. राणी बागेत आणलेल्या पेंग्विन्स आणि इतर प्राण्यांमुळे आकर्षित होऊन मोठ्या संख्येने पर्यटक राणीच्या बागेत भेट देतात. सुट्टीच्या दिवशी लहान मुले तसेच शाळेच्या सहलीही येत असतात. मंगळवार दि. १४ नोव्हेंबर २०२३ रोजी उद्यानात ३९,७९२ पर्यटकांनी भेटी दिल्या असून १४,४१,५२५ रुपये इतका महसूल गोळा झाला आहे.
वर्षाच्या सुरुवातीला दि. १ जानेवारी रोजी ३९,१०६ पर्यटकांची नोंद करण्यात आली होती. १ जानेवारीपेक्षा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची संख्या वाढलेली यावेळी दिसून आली. दि. १० ते १५ नोव्हेंबर दरम्यान एक लाखापेक्षा अधिक पर्यटकांनी भेटी दिल्या. गेल्या वर्षी दि. २२ ते २७ ऑक्टोबर २०२२ च्या दिवाळी दरम्यान ९१,६२६ पर्यटकांनी भेट दिली होती. यंदा ही संख्या २२,९६४ अधिक पर्यटकांनी वाढली. गेल्या वर्षी दिवाळीच्या कालावधीमध्ये ३४,९५,३१० रुपयांचा महसूल गोळा झाला तर, यंदा ८,३९,७३५ रुपयांनी या महसूलात भर पडली आहे.
"उद्यानात नव्याने झालेल्या विकासकामांमुळे तसेच नवीन प्राणी आल्यामुळे पर्यटक आकर्षित होत आहेत. जय आणि रुद्र हे वाघाचे बछडे, पेंग्विन, मगर, सुसरी या प्राण्यांना पाहण्याचे ही आकर्षण पर्यटकांना आहे, त्यामुळे पर्यटकांचा प्रतिसाद मिळत आहे."

- डॉ. अभिषेक साटम
जनसंपर्क अधिकारी,
वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.