भक्तिपंथाने जाणे श्रेयस्कर

    15-Nov-2023   
Total Views |
 swami samarth
 
अहंकार नसावा असे लोक सांगतात; पण आपला मान ठेवून लोकांनी पाया पडावे, असा अहंकार असतोच, यासाठी लोकांनी बोलावे तसेच आपले आचरण ठेवले पाहिजे. बोलणे एक आणि वागणे भलतेच, अशी मानसिकता नसावी. यासाठी परमेश्वरी सत्तेची सतत जाणीव ठेवून, परमेश्वराचे अनुसंधान ठेवावे लागते. त्याने वागण्यात फरक पडतो. भगवंताशिवाय कुणीही सर्वज्ञ नाही, हे एकदा मान्य केल्यावर आपल्या ज्ञानाचा गर्व राहणार नाही आणि आपले आचरण सुधारेल. परमेश्वरी सत्तेची जाणीव सतत राहावी म्हणून ‘भक्तिपंथेचि जावे’ तोच एक सर्वश्रेष्ठ मार्ग आहे.
 
वादविवाद करणे सोडून देऊन, सुखेनैव संवाद करणे सर्वांच्या हिताचे आहे. हा महत्त्वपूर्ण विचार समर्थांनी श्लोक क्रमांक १०८ पासून पुढे आठ श्लोकांत सांगितला आहे. त्या प्रत्येक श्लोकाची शेवटची ओळ ’तुटे वाद, संवाद तो हितकारी’ अशी असून आपल्या हिताचे काय आहे, याचा माणसाने विचार करावा, असे स्वामी म्हणतात. समर्थांनी या आठ श्लोकांतून आपल्या विचाराचे विविध प्रकारांनी विश्लेषण केले आहे. ते आपण यापूर्वीच्या लेखांतून वाचले असेल, तरीसुद्धा पुढील श्लोक क्रमांक ११५ची पार्श्वभूमी स्पष्ट व्हावी म्हणून ते थोडक्यात मांडतो.
 
सर्वप्रथम समर्थांनी सांगितले आहे की, ”सत्संगतीने परमेश्वरासंबंधी जाणीव होऊ लागते. ती जाणीव झाल्यावर परमेश्वराचे प्रेम कसे प्राप्त होईल, या विचाराने साधक आपले आचरण सुधारू लागतो. नुसत्या ज्ञानविषयक बडबडीने काहीही साध्य होत नाही. परंतु, सामान्यजनांना आपले ज्ञान लोकांपुढे दाखवण्याची भारी हौस असते. त्यातून अहंकार प्रबळ झाल्याने वादाचे प्रसंग निर्माण होतात. लोकांनी वाद दूर सारून सुखाने संवाद करावा,” असे समर्थांचे सांगणे आहे.
 
पण, माणसाच्या मनातील अहंकार, गर्व माणसाला स्वस्थ बसू देत नाही. आपला मोठेपणा सर्वांना सांगण्यासाठी आणि दुसर्‍याला दुय्यम दर्जाचा ठरविण्यासाठी जे प्रयत्न केले जातात; तसेच प्रयत्न दुसरेही करत असल्याने संघर्ष निर्माण होणारच, ही अहंकारी वृत्ती सर्वत्र पसरल्याने तिला रोखायचे कसे, असा प्रश्न निर्माण होतो. याचे उत्तर म्हणजे या अहंभावाला जिंकण्यासाठी विवेकाचा, सारासार बुद्धीचा उपयोग करता येतो. सर्वकाळी विवेक जागृत ठेवला; तर अहंभावाला आटोक्यात आणता येते. हे सत्य असून आपल्या हिताचे आहे. माणसाने नेहमी हित कशात आहे, याचा विचार केल्यास अहंकारातून निर्माण होणारे तर्कदृष्ट विचार, खोडसाळपणा, दुष्टावा, दांभिकता ढोंगबाजी इत्यादी दुर्गुणांना आवरता येईल, त्याने वाद संपुष्टात येतील, असे वाटले तरी तसे दिसून येत नाही. कारण असले उपदेश सांगण्यात आणि ऐकण्यात सारा जन्म गेला. पण, वादविवाद आहे तसेच राहिले, त्यात फरक पडला नाही, असे निरीक्षण समर्थांनी नोंदवले आहे.
 
गर्व ताठा असणे, कारण नसता संशय उत्पन्न करणे, दुसर्‍यांना कमी लेखणे इत्यादी कारणांनी शुष्क वाद वाढतच जातात. पुस्तकी पांडित्याने गर्विष्ट झालेले पंडित मरेपर्यंत आपला अहंकार सोडत नाहीत. एवढेच नव्हे तर मरणोत्तर अवस्थेत त्यांचा गर्व, ताठा कायम असल्याने अशा अहंकारी पंडितांना स्वर्गप्राप्ती होत नाही. ब्रह्मज्ञानाचे पुस्तकी वाचन, हे त्यांचे पाप होत नाही. त्यामुळे त्यांना नरकात टाकता येत नाही. या कारणांनी त्यांना बह्मराक्षस होऊन पिशाच्य योनीत जावे लागते. पिशाच्य योनीतील अवस्था दारूण असते. यासाठी माणसाने जीवंतपणी व्यर्थ बडबड करून पांडित्याचे प्रदर्शन करणे टाळले पाहिजे. परमार्थ क्षेत्रात प्रचिती अनुभूती आणि क्रिया, आचरण यांना महत्त्व असते. नुसत्या ज्ञानाच्या गोष्टी बडबडल्याने काहीही हाती लागत नाही.
 
उलट पोकळ ज्ञानाच्या प्रदर्शनाने मनात गर्व मात्र साठत जातो. अशाने आपले हित साधता येत नाही. आत्मोद्धारासाठी विवेकाच्या आश्रयाने विचारपूर्वक अध्यात्मातील तत्त्वे, चारित्र्य, नीती या गोष्टी आचरणात आणल्या पाहिजेत. क्रिया महत्त्वाची असून वाचाळपणे बडबडण्यात काही अर्थ नसतो. स्वामींनी ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे,’ अशा मार्मिक शब्दांत मागील श्लोक क्रमांक ११४ मध्ये हा विचार स्पष्ट केला आहे. यानंतर ‘वाद-संवाद’ या विचार मालिकेतील शेवटचा ११५वा श्लोक लिहून स्वामींनी ’तुटे वाद संवाद तो हितकारी’ याची सांगता केली आहे. शुल्लक वादविवाद चालले असतील, तर त्यात भाग घेणे योग्य नव्हे. परंतु, एखाद्या तत्त्वाच्या बाजू समजून घेण्यासाठी वादविवाद जिज्ञासेपोटी चालले असतील तर, अशा चर्चेत आपण भाग घ्यायला हरकत नाही. तेथे आपल्या अज्ञानाची भ्रांत नाहीशी होते व आपले विचारा मांडून त्यातील स्पष्टता आजमावता येते.
 
अशा तत्त्वशोधक चर्चेत वाद मिटवण्यासाठी संवाद साधायला हरकत नाही. इतर वादात शहाण्याने पडू नये. उदाहरणार्थ, क्रिकेटच्या सामन्यात भारत जिंकणार की ऑस्ट्रेलिया जिंकणार, यावर लोक तावातावाने वादविवाद करत असतील, तर त्यांच्यात संवाद साधावा म्हणून आपण प्रयत्न करण्यात काही अर्थ नसतो. एखाद्या नाटकातील अथवा टीव्ही मालिकेतील प्रसंगावर वाद होत असतील, तर ते सारे कल्पनेचे खेळ असल्याने त्यात संवाद साधावा, असा प्रयत्न करण्यात काही स्वारस्य नसते. तथापि, जिज्ञासापूर्ण चर्चेतील वाद मिटवण्यासाठी आपण त्यात भाग घेऊन विवेकांची व अहंभाव टाकून देण्याची कल्पना मांडायला हरकत नाही. स्वामींनी संवाद कोठे करावा व संवाद साधण्यासाठी काय करावे लागते हे पुढील श्लोकात सांगितले आहे.
 
तुटे वाद संवाद तेथे करावा।
विवेकें अहंभाव हा पालटवा।
जनीं बोलण्यासारखे आचरावें।
क्रियापालटें भक्तिपंथे चि जावें॥११५॥
 
नुसते शाब्दिक ज्ञान बडबडणार्‍यांचा अहंकार दिवसेंदिवस वाढत जातो. तो जराही कमी न झाल्याने त्यांच्या शब्दज्ञानाचा प्रभाव लोकांवर पडत नाही. यासाठी प्रचितीचे अनुभवाचे जे ज्ञान असते, ते टिकून राहते. त्या ज्ञानाचा संवाद साधण्यासाठी उपयोग होतो. लोकांच्या मनात काही शंका असतात. त्या या ज्ञानाने दूर करता येतात. जिज्ञासा तृप्तीसाठी जर काही वादविवाद चालू असतील, तर अनुभवी ज्ञानाने वाद नाहीसे होऊन, संवादाने जिज्ञासा तृप्ती होणार असेल तर अशा प्रसंगी जरूर संवाद करावा.
 
परंतु, आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करण्यासाठी संवादात भाग घेऊ नये. काही वेळा संवाद साधत असता, सूक्ष्म अहंकार होईल. परंतु, विवेकाने हा अहंकार सूक्ष्म अहंकारही पालटून टाकावा. त्याला मनात स्थान देऊ नये. कधीही अहंभावाची बाधा होऊ देऊ नये. तत्त्वचिंतनाच्या बाबातीत लोक बोलतात खूप चांगले; पण त्यांचे आचरण तसे असतेच असे नाही. अहंकार नसावा असे लोक सांगतात; पण आपला मान ठेवून लोकांनी पाया पडावे, असा अहंकार असतोच, यासाठी लोकांनी बोलावे तसेच आपले आचरण ठेवले पाहिजे.
 
बोलणे एक आणि वागणे भलतेच, अशी मानसिकता नसावी. यासाठी परमेश्वरी सत्तेची सतत जाणीव ठेवून, परमेश्वराचे अनुसंधान ठेवावे लागते. त्याने वागण्यात फरक पडतो. भगवंताशिवाय कुणीही सर्वज्ञ नाही, हे एकदा मान्य केल्यावर आपल्या ज्ञानाचा गर्व राहणार नाही आणि आपले आचरण सुधारेल. परमेश्वरी सत्तेची जाणीव सतत राहावी म्हणून ‘भक्तिपंथेचि जावे’ तोच एक सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. मनाच्या श्लोकांना प्रारंभ करतानाच, समर्थांनी सांगून टाकले आहे की, ’मना सज्जना भक्तिपंथेचि जावे।’ (श्लोक क्र. २) आपल्या वागण्यात चांगला बदल घडवून आणायचा असेल, तर भक्तिपंथाने जाणे श्रेयस्कर.
 
७७३८७७८३२२
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..