काँग्रेसला कांशीरामांचा उमाळा

    06-Oct-2023   
Total Views |
Why UP Congress is keen on Kanshi Ram

फक्त आणि फक्त मतपेढीच्या स्वार्थी राजकारणासाठी काँग्रेस पक्षाकडून सध्या विविध समाजघटकांना प्रलोभने दाखविण्याचे उद्योग जोरात सुरू आहेत. म्हणूनच राहुल गांधी कधी शेतात, तर कधी ट्रकतचालकांसोबत, तर कधी सुवर्णमंदिरात लंगरसेवेच्या नावाखाली ‘आम्ही सर्वांचेच’ अशी भ्रमनिर्मिती करताना दिसतात. त्याच कडीतला पुढचा भाग म्हणजे, आता काँग्रेसने चक्क दलित नेते आणि बहुजन समाज पक्षाचे संस्थापक नेते कांशीराम यांच्या पुण्यतिथीपासून ‘दलित गौरव संवाद यात्रा’ काढणार असण्याची घोषणा केली. त्यामुळे उत्तर प्रदेशातील २२ टक्क्यांच्या जवळपास असलेल्या दलित मतपेढीवर डोळा ठेवूनच काँग्रेसचे कांशीराम यांच्यावरील पुतना मावशीचे प्रेम उफाळून आलेले दिसते. यावर काँग्रेसचे म्हणणे असे की, कांशीराम हे कुठल्याही एका पक्षाचे नेते नाहीत, तर ते दलित समाजाचे नेते होते. मग असे असेल तर यापूर्वी काँग्रेसने कांशीराम यांच्या नावाचा, कार्याचा यथोचित गौरव-सन्मान का केला नाही? कांशीराम यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराची मागणीही मायावतींनी कित्येक वर्षे काँग्रेसकडे केली. पण, त्यावेळी सत्तेच्या धुंदीत असलेल्या काँग्रेस सरकारने त्याकडे कधीही गांंभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे आजघडीला केवळ दलित मतपेढीला आकृष्ट करण्यासाठीच काँग्रेसवर कांशीराम यांच्या करिष्म्याचे भांडवल करण्याची वेळ ओढवली, हेच खरे सत्य! पण, हे तेच कांशीराम होते, ज्यांना काँग्रेसची विचारसरणी मान्य नव्हती. कांशीराम यांनी प्रारंभीच्या काळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आरपीआय) समर्थनही दिले. परंतु, त्यावेळी रिपाइंची काँग्रेसशी जवळीक कांशीराम यांना मान्य नसल्यामुळे त्यांनी फारकत घेतली. पुढे मायावती या कांशीराम यांच्या उत्तराधिकारी ठरल्या. बसप-काँग्रेसने काही काळ एकत्रही काम केलेच. पण, आजघडीला मायावतींनीही काँग्रेसपासून चार ‘हात’ लांब राहणेच पसंत केलेले दिसते. त्याचे कारण म्हणजे, काँग्रेसने दलितांचा फक्त मतांसाठीच पुरेपूर वापर करून घेतला. पण, त्यांच्या सामाजिक, आर्थिक उत्थानाचा कधीही विचार केला नाही. तीच काँग्रेस आज कांशीराम यांच्या नावाचा वापर करून ‘गौरव यात्रा’ काढण्याची ढोंगबाजी करताना दिसते. पण, जनता सुज्ञ असून ती अशा दुटप्पी, दलितविरोधी काँग्रेसला त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही!

नूरी ओ नूरी...
 
राहुल गांधींचे श्वानप्रेम तर अगदी सर्वश्रुत. आसामचे मुख्यमंत्री आणि पूर्वाश्रमीचे काँग्रेसवासी हिमंता बिस्व सरमा यांनी तर राहुल गांधींच्या मनुष्यप्रेमापेक्षा श्वानप्रेमाच्या सुरस कथाही जगजाहीर केल्याच आहेत. आता राहुल गांधींसारख्या राजकारण्याने श्वानप्रेमी असण्यात मुळी गैर काहीच नाही. आता आपल्या श्वानाचे नावही ठेवण्याचा सर्वाधिकार श्वानमालकालाच म्हणा. राहुल गांधींनीही नुकतेच त्यांच्या मातोश्री सोनिया गांधींना ‘जॅक रसेल टेरियर’ प्रजातीचे श्वानाचे पिल्लू भेट स्वरूप दिले. त्याचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला. पण, आता या श्वान नामावरून गांधी टीकेचे धनी ठरले आहेत, तर अशा या श्वानाच्या पिल्लाचे नाव राहुल गांधींनी ठेवले ‘नूरी.’ आता ‘नूरी’ हे नाव बघून विशिष्ट समुदायाच्या काही नेत्यांना मिरच्या झोंबल्या. एमआयएम पक्षाचे नेते मोहम्मद फरहान यांनी राहुल गांधींवर ‘नूरी’ हे मुस्लीम मुलींचे नाव श्वानाला दिल्याबद्दल टीका केली. हे नाव श्वानाच्या पिल्लाला देऊन गांधींनी मुस्लीम मुलींचा अपमान केल्याचे फरहान यांचे म्हणणे. आता ‘नूरी’ हे नाव मुस्लीम मुलींमध्ये प्रचलित असले तरी ते कोणत्याही देवीदेवतेचे, धार्मिक प्रतीकाचे नाव नक्कीच नाही. यापूर्वी तर कित्येक हिंदू देवीदेवतांच्या नावांचा वापर बॉम्बपासून ते त्यांच्या प्रतिमा चपलांवर छापण्यापर्यंतचा उद्दामपणाही झाला आहेच. पण, त्या तुलनेत ‘नूरी’ नावावरून हा सगळा वाद निरर्थकच. कारण, ‘नूरी’चा अर्थ होतो प्रकाश. त्यामुळे यावरून खरं तर उकरून वाद निर्माण करण्याचाच हा अनाठायी प्रकार. त्यापेक्षा काँग्रेस असेल अथवा एमआयएम यांनी प्रत्यक्षात मुस्लीम मुलींसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, सामाजिक स्तर उंचावण्यासाठी काय केले, ते सांगावे. म्हणजे एकीकडे आसाममध्ये हिमंता सरमा यांनी बालविवाहावरून अटकसत्र सुरू केले. त्यामध्ये बहुतांशी जोडपी ही अल्पसंख्याक समाजातली. तेव्हा अशा हजारो मुस्लीम नूरींसाठी सरमा सरसावले. पण, राहुल गांधी असतील किंवा ओवेसी किंवा अन्य मुस्लीम नेते, त्यांना बालविवाहाच्या जोखडात अडकलेल्या नूरींचे अश्रू कधी तरी दिसले का? अशाच किती तरी ‘नूरी’ आजही शिक्षणापासून वंचित आहेत. तेव्हा त्यांना या शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी यांपैकी कुणी पुढाकार घेतला? त्यामुळे मुस्लीम समाजातील महिला-मुलींच्या मूळ प्रश्नांना बगल देऊन ‘नूरी’वरून भुंकणार्‍यांचा खरा चेहरा जनता ओळखून आहेच, हेच खरे!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची