मागील 51 वर्षांहून अधिक काळ सामाजिक क्षेत्राबरोबरच पर्यावरण क्षेत्रातही विविधांगी लोकोपयोगी उपक्रम राबविणार्या मुकुंद शिंदे यांच्याविषयी...
पुण्यात विद्यार्थीदशेतच सामाजिक कार्याची आवड निर्माण झाल्याने मुकुंद शिंदे यांनी त्याकामी स्वतःला वाहून घेतले. तरुण वयात पुणे ते काश्मीर अशी ’सायकल दौड’ करीत त्यांनी सातत्यपूर्ण व सकारात्मक जीवन जगण्याचा आदर्श घालून दिला. तोच आदर्श ठेवत त्यांनी विविध माध्यमांतून आपले सामाजिक कार्यही सुरु ठेवले.शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1967 मध्ये ‘एमआयडीसी’ वर्कशॉपमध्ये त्यांनी काही काळ काम केले. त्यानंतर तेथून एका मोठ्या कंपनीत काम करण्याची त्यांना संधी मिळाली. पुण्यापासून तीन किलोमीटर रोज सायकलच्या माध्यमातून ते ये-जा करत. त्यावर कुठलेही काम करण्याची जिद्द असल्याने मी ते काम चोख बजावत होतो, असे मुकुंद सांगतात.
1972 मध्ये दिल्लीत जागतिक प्रदर्शन भरले होते. त्या भावनेने त्यांनी उत्स्फूर्तपणे पुणे ते दिल्ली सायकल सफर केली. त्याच काळात पुणे ते मुंबई, पुणे ते नगर सायकल स्पर्धेतहीते सहभागी होत असत. परिणामी, विविध जिल्ह्यातील प्रश्न आणि त्याची माहिती त्यांना मिळत गेली. पुढे पुणे ते दक्षिण भारत, तर पुणे ते काश्मीर सायकल सफर घडली. सामाजिक कामामुळे कामगारांचे प्रश्न जाणून घ्यायला लागलो. याच काळात संघटनेचे काम वाढविले.कामाच्या ऊर्जेमुळे नवीन ऑक्सिजन मिळत होता आणि मग परत नव्या जोमाने काम करायला त्यांना सुरुवात करता येऊ लागली.
कामाच्या ओघात आणि कामगारांचे प्रश्न सोडवत 60 वर्षे पूर्ण झाली. अखेर दि. 3 डिसेंबर, 2007 रोजी सेवानिवृत्त झाले. मात्र, कामाची जिद्द काही कमी झाली नव्हती. त्यातच मोहन धारिया यांच्या माध्यमातून ‘वनराई’ संस्थेशी जोडलो गेले. ‘वनराई’मध्ये प्रकल्प अधिकारी पदाचे दायित्व सुपूर्द केल्याने मुकुंद यांना आनंद होताच, पण दुसरीकडे सामाजिक कार्याशी जोडले गेल्याचे समाधान वेगळेच असल्याचे ते सांगतात.
‘वनराई’च्या माध्यमातून किर्लोस्कर वसुंधराच्या सहकार्याने मुठा नदी स्वच्छतेसाठी जनजागृतीसाठी पुण्यातील सर्व शाळेत जाऊन त्यांना जनजागृती करण्याची संधी मिळाली. त्याला प्रतिसाद मिळत तब्बल साडेचार हजार विद्यार्थी व विद्यार्थिनी व शिक्षक यांना बरोबर घेऊन मुठा नदी पात्रातील भिडे पूल येथे मानवी साखळी केल्याची आठवण ते सांगतात. विद्यार्थ्यांना ’ब्ल्यूलाईन’ आणि ‘रेडलाईन’ व नदीच्या पात्रात येणारा कचरा, सांडपाणी याबाबत तज्ज्ञांना बोलवून त्यांनी मार्गदर्शन केले.
मुकुंद यांचे पर्यावरण विषयाचे पहिले काम सांगायचे झाल्यास, पुण्यातील तळ्यातील गणपती (म्हणजे आत्ताचे सारसबाग) येथे गाळ काढण्याचे काम त्यांनी केले.
पुणे महापालिका क्षेत्रीय कार्यालय तसेच इतर संस्थांच्या माध्यमातून नदी स्वच्छता अभियान, प्लास्टिक जनजागृतीसाठी ‘सायकल रॅली’ यासाठी मुकुंद कायम तत्पर होते. त्यातच रक्तदान शिबीर, ऑल इंडिया सायकल टूर, चार वेगवेगळया पंतप्रधानांच्या भेटी, पुण्यात हजारोंची वृक्ष लागवड यासह अनेक कामे झाल्याचा आनंद असल्याचे ते सांगतात. ‘अंकुर’चे कुलदीप सावळेकर यांच्यामुळे सामाजिक कार्याचा वारसा अण्णांकडून (डॉ. मोहन धारिया) मिळाल्याचे ते सांगतात. मग ती ‘समग्र नदी परिवार’ असो वा ‘महाएनजीओ फेडरेशन’ असो.
पुढे ‘वनराई’तून स्वेच्छानिवृत्ती पत्करल्यानंतर त्यांनी ’महाएनजीओ फेडरेशन’च्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला. सूंपर्ण महाराष्ट्रात ‘महाएनजीओ फेडरेशन’च्या 1500 विविध सेवाभावी संस्थांसमवेत काम केले. सुनील जोशी (जल बिरादरी) यांच्या नेतृत्वाखाली ‘समग्र नदी परिवार (महाराष्ट्र)’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे मुकुंद शिंदे संस्थापक- विश्वस्त असून महाराष्ट्रातील दोन हजार ‘एनजीओ फेडरेशन’चे संचालक आहेत. ते म्हणतात की, “सध्या माझे वय 74 असून दोन्हींमध्ये मी कार्यमग्न असल्याचे समाधान आहे. समग्र नदी परिवाराचे विश्वस्त म्हणून जबाबदारी स्वीकारत आजही माझे जनसेवेचे काम अविरत सुरु आहे.” ‘नांदेड सिटी’ येथील अक्कलकोट स्वामी महाराज यांच्या मठ परिसरात वृक्षारोपण करून ते आपला वाढदिवस साजरा करतात.
फेडरेशनबाबत ते सांगतात की, “राज्यात दोन हजारांहून अधिक सामजिक संस्थांची शिखर संस्था म्हणजे ‘महाएनजीओ फेडरेशन’ होय. श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणेने दि. 15 ऑगस्ट, 2018 मध्ये पुण्यात ‘फेडरेशन’ची स्थापना झाली. अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. मात्र, त्या एकसंघ नव्हत्या. त्या सर्वांना एका छत्राखाली आणण्याचे कार्य ‘महाएनजीओ फेडरेशन’च्या माध्यमातून शेखर मुंदडा यांनी केले. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष मार्गदर्शन संस्थेस आहे.” ‘फेडरेशन’ने केलेल्या सेवाकार्याचे चार-पाच लाखांहून अधिक लाभार्थी आहेत. समाजातील प्रत्येक गरजवंतांच्या समवेत संस्था खंबीरपणे उभी आहे. आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, ग्रामविकास, दिव्यांग, अनाथाश्रम, आध्यात्मिक, एचआयव्ही/एड्सविषयी कार्य, कायदेशीर सल्ला, गोसेवा, वंचित मुलांचे पुनर्वसन अशा 25 विषयांसमवेत अन्य काही महत्त्वपूर्ण बाबींवर कार्य करते.तेव्हा, असे हे व्यापक समाजकार्य करणार्या मुकुंद शिंदे यांना पुढील प्रवासासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा.
-पंकज खोले