देशहितासाठीची कारवाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Sep-2021   
Total Views |

kashmir_1  H x

कुठल्याही खासगी कंपनीत एखाद्या कर्मचार्‍याने कंपनीशी संबंधित संवेदनशील किंवा तत्सम कुठलीही महत्त्वाची माहिती, व्यावसायिक गुपिते आदी स्पर्धक कंपनीला कुठल्याही कारणास्तव देऊ केली आणि हे प्रकरण उघडकीस आले, तर दोषी कर्मचार्‍यावर निलंबनाची कारवाई होतेच. शिवाय, प्रकरण गंभीर असेल तर अशा कर्मचार्‍यांना पोलीस कोठडीदेखील होऊ शकते. परंतु, एरवी खासगी क्षेत्राचे गोडवे गाणार्‍यांना मात्र जम्मू-काश्मीर सरकारने याच अनुषंगाने घेतलेला एक निर्णय मात्र काश्मीरविरोेधी आणि अन्यायकारक वाटतो आहे.

२०१९साली जम्मू-काश्मीरमधून ‘कलम ३७०’ रद्द केल्यानंतर हा संपूर्ण प्रदेश केंद्रशासित झाला. त्यामुळे आधी भारतभरातले जे कायदेकानून एकट्या काश्मीरमध्ये लागू होत नव्हते, तेही सरसकट या राज्यात लागू होऊ लागले. परंतु, ‘कलम ३७०’ संपुष्टात आले असले, तरी तेथील काही स्थानिकांमध्ये मुरलेला फुटीरतावाद, पाकप्रेम आणि भारतद्वेष मात्र कायम दिसतो. त्यातही ही मंडळी जम्मू-काश्मीर सरकारच्या सेवेत असल्याने सरकारी दस्तावेज, सुरक्षासंबंधी माहिती याचीही त्यांना पूर्ण कल्पना असतेच. तेव्हा, शासकीय सेवेत राहून वर्षानुवर्षे उदरनिर्वाह करणार्‍या; परंतु प्रलोभनांपायी देशद्रोह्यांना साहाय्य करणार्‍यांना जम्मू-काश्मीरच्या सरकारने चांगलाच दणका दिला आहे.


यापूर्वीही अशाच दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणास्तव तेथील सरकारने ११ कर्मचार्‍यांना सरकारी सेवेतून निलंबित केले होते आणि नुकतेच दहशतवाद्यांशी असलेले धागेदोरे लक्षात घेता, जम्मू-काश्मीर सरकारने आणखीन सहा कर्मचार्‍यांना सरकारी सेवेतून निलंबित केले आहे, ज्यामध्ये दोन पोलिसांचाही समावेश आहे. तसेच कर्मचार्‍यांनी देशाप्रति आणि संविधानाशी एकनिष्ठ राहण्याचे आवाहन राज्य सरकारने केले असून, कर्मचार्‍यांना या कारवाईतून कडक इशाराच दिला आहे. यापूर्वीदेखील सरकारने कर्मचार्‍यांना पारपत्र काढण्यासाठी त्यांची चौकशी करण्यात येईल, अशाप्रकारचे आदेश दिले होतेच. त्यामुळे याच मातीत राहायचे, इथेच खायचे आणि शत्रूला मदत करून देशाशी गद्दारी करायची, ही फुटीरतावादी वृत्ती यापुढे जम्मू-काश्मीरच्या सरकारी सेवेत खपवून घेतली जाणार नाही. तेव्हा, राज्य सरकारचा हा निर्णय सर्वस्वी स्तुत्य असून, त्यामुळे निश्चितच अशा फुटीरतावादी मानसिकतेला खीळ बसेल, अशी आशा.

काश्मीर : विकासाची प्रयोगशाळा

जम्मूू-काश्मीरमधून ‘कलम ३७०’ हटविल्यानंतरही ‘पीडीपी’च्या नेत्या आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती त्या धक्क्यातून अद्याप सावरलेल्या दिसत नाहीत. म्हणूनच, अधूनमधून त्या भारतविरोधी गरळ ओकताना दिसतात. त्यातच अफगाणिस्तानात तालिबानचे इस्लामिक सरकार सत्तेवर आल्यापासून तर मुफ्तीसारख्यांना नाहक एक चेव चढलेला दिसतो. नुकत्याच एका पत्रकार परिषदेत मुफ्तींनी आपल्या वाचाळवाणीला असेच मोकाट सोडले. मुफ्ती म्हणाल्या की, “दिल्लीमध्ये बसलेले लोक जम्मू-काश्मीरचा प्रयोगशाळेसारखा वापर करत आहेत. नेहरू, वाजपेयी यांसारख्या नेत्यांकडे जम्मू आणि काश्मीरसाठी एक दूरदृष्टी होती. पण, मोदी सरकार हिंदू आणि मुसलमानांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. कारण, सरदार आता खलिस्तानी, मुस्लीम पाकिस्तानी आणि भाजपच काय तो हिंदुस्थानी झालाय.”

प्रयोगशाळेबाबत मुफ्तींनी केलेले विधान एकाअर्थी योग्यच! कारण, ‘कलम ३७०’ कायमस्वरूपी हटविण्याच्या प्रयोगातूनच काश्मीरच्या विकासाचा मार्ग आज प्रशस्त झाला आहे. उलट यापूर्वी काश्मीरमध्ये सत्ता उपभोगताना मुफ्ती आणि अब्दुल्लांच्या परिवाराने राज्यहिताचे प्रयोग तर केले नाहीच; पण काश्मिरी जनतेची लूट करून स्वत:च्या तुंबड्या मात्र हिमालयाएवढ्या भरून घेतल्या. याच सत्तेचा कित्येक वर्षे नुसता उपभोग घेणार्‍या मुफ्ती आणि अब्दुल्लांनी काश्मीरच्या सर्वच क्षेत्रांत प्रयोग केले असते, तर काश्मीरची अवस्था कदाचित इतकी बिकट नसतीच. पण, या परिवारांनी प्रयोग केले ते काश्मिरात फुटीरतावादाचे, प्रयोग केले ते काश्मिरी तरुणांच्या हातात चार पैसे टेकवून दगडफेकीचे अन् भारतीय सैन्याच्या खच्चीकरणाचे. प्रयोगशाळा या खरंतर विकासाचे, नवतेचे, गतिमान समाजाचे प्रतीक. म्हणूनच ‘३७०’च्या प्रयोगानंतर जम्मू-काश्मीर कृषी क्षेत्रापासून ते वाहतूक, पर्यटन अशा सर्वच क्षेत्रांत भरपूर प्रयोगही करते आणि त्यांचे प्रयोग यशस्वीही होताना दिसतात. हीच खरी मुफ्तींची जळजळ!कारण, जे जे या मुफ्तीबाई, अब्दुल्ला मियाँ वर्षानुवर्षे सत्तेत राहूनही करू शकले नाहीत, ते ते सर्व काही, अगदी अपेक्षेपलीकडचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या नेतृत्वात सध्याचे जम्मू-काश्मीर सरकार करताना दिसते. तेव्हा, जम्मू-काश्मीर असो वा देशातील अन्य कुठलाही भाग, सगळ्यांना हिंदुस्थानी असल्याचा अभिमानच आहे आणि हो, मुफ्तींसारखे फुटीरतावादी त्याला अपवादही आहेच, ज्यांचे डोके भविष्यातही ठिकाणावर येण्याची शक्यता धुसरच!
 @@AUTHORINFO_V1@@