तीनदा महापौरपद मिळवण्याचा तरेंचा विक्रम महाराष्ट्रात कुणी मोडला नाही

    22-Feb-2021   
Total Views | 247

anant tare 1_1  



त्रिविक्रमी महापौर अशी ख्याती पावलेले अनंत तरे निवर्तले

 
 
ठाणे (दीपक शेलार) : ठाणे शहराचे सलग तीन वर्ष महापौरपद भुषवणारे त्रिविक्रमी (हॅटट्रीक) माजी महापौर,शिवसेनेचे माजी आमदार तथा कोळी समाजाचे 'डॅशिंग' नेते अनंत तरे यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६७ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात भाऊ संजय, पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे, असा परिवार आहे. त्यांच्यावर मंगळवार दि. २३ फेब्रुवारी रोजी दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तरे शिवसेनेचे उपनेते म्हणून शिवसेनेत कार्यरत होते. तसेच, कार्ला येथील एकविरा देवस्थानचे विश्वस्त आणि कोळी समाजाचे अध्यक्ष होते.
 
 
 
संपूर्ण महाराष्ट्रात सलग तीनवेळा महापौर म्हणून निवडून जाण्याचा विक्रम केवळ तरे यांच्याच नावावर आहे. ठाण्याचे १९९३ ते १९९६ सालापर्यत महापौरपद तीन वेळा भूषवले. तरे महापौर झाले त्यावेळी सभागृहात त्रिशंकू अवस्था होती. त्यामुळे अतिशय अटीतटीच्या लढाईत तरे यांनी महापौर पद शिवसेनेकडे खेचून आणले आणि नंतर ते कायम शिवसेनेकडेच राहिले. विधान परिषदेचे ते आमदार होते पण अनंत तरे यांना विधानसभेचे आमदार होता आले नाही.
 
 
 
बॅरिस्टर अंतुले यांच्या विरोधात अनंत तरे यांनी रायगड मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र तिथे त्यांचा पराभव झाला. गेल्या निवडणुकीमध्ये अनंत तरे यांनी काही काळ औटघटकेची बंडखोरी करून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. विधानसभेसाठी त्यांनी कोपरी- पाचपाखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदें विरोधात अर्ज दाखल करून खळबळ उडवुन दिली होती.
 
 
 
अनंत तरे यांना आमदारकी देण्याचे पक्षाने आश्वासन दिले होते पण ते पाळले न गेल्यामुळे अनंत तरे यांनी विधानसभेसाठी आपली उमेदवारी दाखल केली होती. मात्र पक्ष नेतृत्वाने वेळीच दखल घेत त्यांची समजूत घातल्याने त्यांनी आपला अर्ज मागे घेतला होता. त्यांना ठाणे लोकसभा मतदार संघासाठी विचारणा झाली होती पण तेव्हा त्यांनी नकार दिला होता.
 
 
 
शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक आणि मातोश्रीशी एकनिष्ठ असलेले अनंत तरे यांच्यावर तब्बल ८२ दिवस ठाण्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनाची लक्षणे जाणवल्याने त्यांना दाखल केले होते. अखेर ब्रेन हॅमरेजमुळे सोमवारी सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
 
 
 
श्री एकविरा देवी देवस्थानचे अध्यक्ष, विधान परिषदेचे माजी आमदार आणि ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे यांच्या निधनाने ठाणेकरांविषयी आस्था असलेले एक लोकप्रिय व्यक्तिमत्व व आदरणीय नेते हरपले. सामान्य कुटुंबातून आलेल्या अनंतजी तरे यांनी ठाण्याचे महापौर तीन वेळा भूषविले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी ठाणे शहरातील जनसामान्यांचे अनेक प्रश्न सोडविले होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 
 
 
- निरंजन डावखरे, आमदार व ठाणे जिल्हाध्यक्ष, भाजप


दीपक शेलार

वायसीएमओयू मुक्त विद्यापीठातून वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका, तसेच पदवी. 'मुंबई तरुण भारत' या प्रथितयश मराठी दैनिकात ठाणे ब्युरो चिफपदी कार्यरत. ३० वर्षांपासून वृत्तपत्रविक्रेता, गेले एक तप विविध राज्यस्तरीय, तसेच स्थानिक वृत्तपत्रे व वाहिन्यांसाठी वृत्तांकन. गड-किल्ले भ्रमंती आणि मराठी नाटक, साहित्यात रुची, नवे शिकण्याचा हव्यास.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121