प्राचीन नाण्यांवरील नद्या आणि वैशिष्ट्ये

    21-Dec-2021
Total Views | 186

coin.jpg_1


गोदाकाठी गेली हजारो वर्षे वसलेल्या नाशिकमध्ये नुकताच ‘गोदा महोत्सव सप्ताह’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवात अनेक मान्यवर संशोधक आणि स्थानिक नाशिक जिल्हा विशेषज्ञांची माहितीपूर्ण भाषणे झाली. त्यानिमित्ताने गोदाकाठी विकसित झालेल्या संस्कृतीचे सर्वांगीण पुनरावलोकन झाले.


 
या महोत्सवात नाशिकचे नाणे संग्राहक चेतन राजापुरकर यांचे दि. 19 डिसेंबर रोजी ‘प्राचीन नाण्यांमधील नदी’ या आतापर्यंत अलक्षित असलेल्या विषयावर व्याख्यान झाले. प्राचीन तसेच अर्वाचीन नाण्यांचा अनेक दृष्टिकोनातून अभ्यास झाला आहे. पण, भारतीय मूर्तिशास्त्राला धरून नाण्यांवर काढलेल्या नद्यांच्या चित्रांचा परिचय करून देण्याचा स्तुत्य उपक्रम राजापुरकर यांनी करत एका वेगळ्या विषयाकडे लक्ष वेधले. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया प्राचीन नाण्यांवरील नद्या आणि त्याविषयीची अधिक माहिती...


लोकमाता नदी



नद्यांचे मानवी समाज जीवन आणि प्रगतीमध्ये असाधारण महत्त्वाचे स्थान आहे. अगदी प्राचीन ऋग्वेद संहितेमधून पूर्वेस गंगेपासून तो पश्चिमेस वक्षुऑक्सस इ. अनेक नद्यांचे भावपूर्ण आणि देवता म्हणून निर्देश आहेत. कालांतराने मूर्तिकला प्रगत झाली आणि नाण्यांचे चलन प्रचारात आले. तेव्हापासून नाण्यांवर नद्यांची आरेखने दिसतात. हा हिंदू, बौद्ध आणि जैन या परंपरांचा सामायिक वारसा आहे. मूर्तिशास्त्रात बहुतांश सर्व मोठ्या आणि पवित्र समजलेल्या नद्यांची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. त्यांच्या हातातील आयुधे आणि विशेष करून त्यांची जलचर वाहने यावरून मूर्ती अथवा चित्र कोणत्या नदीचे निदर्शक आहे, हे ठरविता येते. जसे, गंगा नदी ही मकर-मगरवाहिनी आहे. राजापुरकरांनी आपल्या भाषणात नदी चित्रांच्या संदर्भात या महत्त्वपूर्ण बाबींकडे लक्ष्य वेधले. मुस्लीम आणि इंग्रजी राज्यकर्त्यांनी नदी चित्रणांची नाणी पाडली नाहीत. स्वातंत्र्योत्तर काळातही आतापर्यंत नद्यांची नाणी पाडलेली नाहीत. आता तशी नाणी पाडता येतील.

 
नाण्यांची वैशिष्ट्ये



नद्यांच्या पाण्यात अनेक प्रकारची नाणी मिळत असतात. ती काढणारी काही कुटुंबे हा व्यवसाय पिढीजात करत असतात. कशाप्रकारे नाणी नदीपात्रात डुबक्या मारून काढली जातात याची चित्रफित भाषणाच्या सुरूवातीला राजापुरकरांनी दाखविली. ते स्वत: अशा व्यावसायिकांकडून नाणी मिळवतात.नाण्यांचा इतिहास इ. स. पूर्व तीन-चारशेपासून सुरू होतो. त्यावेळची नाणी आहत होती. या काळात अनेक ठिकाणी प्रजासत्ताक राज्ये होती. कोसंबी शहरात सापडलेल्या एका आहत नाण्यावर यमुना नदीचे चित्र आहे. त्यावर ब्राह्मी लिपित कोसंबी असे लिहले आहे. त्यानंतरच्या काळात साम्राज्ये स्थापन होऊन त्याचबरोबर नाण्यांवर कोरीव चित्रे टाकण्याचे तंत्र प्रगत झाले. या वेळेपासूनची नद्यांची चित्रे असलेली नाणी उपलब्ध आहेत. अनेक राजघराण्यांनी नद्यांची चित्रे असलेली नाणी पाडली. त्यात गुप्त वंशाच्या राजांची नाणी बरीच उपलब्ध आहेत. राजापुरकरांनी समुद्रगुप्त, कुमारगुप्त यांच्या नाण्यांची छायाचित्रे दाखविली. त्यावर गंगा, यमुना या नद्यांची चित्रे आहेत. गोदावरी नदीचे निर्देश नाण्यांवर ‘गोला’ असे आलेले आहेत. अशी पाच-सहा नाणी उपलब्ध आहेत. काही ओतीव नाण्यांवरही नद्यांची चित्रे आहेत.
नदीचित्रांच्या नाण्यांच्या दृष्टीने विदर्भ समृद्ध आहे. विदर्भातून वाहणारी आजची वैनगंगा नदी नाण्यांवर ‘बेना’ या नावाने अवतरते. वरूणा आणि असी, या दोन नद्यांच्या संगमामुळे ’वाराणसी’ नाव पडले. त्यातील वरुणा नदीचे चित्र असलेले नाणे उपलब्ध आहे. भारतातील सर्वच प्रमुख नद्यांची निर्देश करणारी नाणी उपलब्ध आहेत. कावेरी नदी अगस्ती ऋषीच्या चित्रासह आलेली आहे. अगस्ती ऋषीच्या कमंडलूतून कावेरी नदी निघाल्याचे चित्रण त्या नाण्यावर आहे. त्रिवेणीसंगम दर्शक नाण्यावर तीन महिलांची चित्रे आहेत. एका नाण्यावर नदीच्या हातातून पाण्याचा प्रवाह निघताना दिसतो.

 
 
नद्यांची चित्रे त्यावर असलेल्या जलचरांच्या चित्रांवरून ओळखता येतात. काही नाण्यांवर नदीच्या हातात मासे असतात. ऋषभ मित्र राजाच्या नाण्यावर ऑक्टोपससारख्या जलचराचे चित्र आहे. तसेच दक्षिणेतील चोल राज्यांच्या नाण्यांवर मगर, कासव मासे यांचे चित्रांकन असते. शक-कुशाण काळात भारताबाहेरच्या नद्यांची चित्रे असतात. एका कुशाणकालीन नाण्यावर ऑक्सस नदीचे चित्रांकन आहे. त्याच नाण्याच्या मागच्या बाजूस राज्याचे नाव आणि चित्र आहे. त्यावरून त्याची ओळख पटली. नाण्यांवर नद्या हा वेगळा, अलक्षित विषय यानिमित्ताने समोर आला.

डॉ. प्रमोद पाठक

 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121