तालिबान विरुद्ध ताजिकिस्तान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2021   
Total Views |

Taliban_1  H x
 
 
 
ताजिकिस्तान हा अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील देश. दोन्ही देशांची सीमा जवळपास १,३५७ किमी पसरलेली. त्यातच सीमेवर फक्त डोंगर-दऱ्या आणि नद्यांचा खळखळाट. म्हणूनच फार पूर्वीपासून या दोन्ही देशांमध्ये घुसखोरीचे प्रमाणही जास्त. पण, जोवर अफगाणिस्तानमध्ये घनी यांचे सरकार आणि अमेरिकेचे सैन्य तैनात होते, तोवर शेजारी ताजिकिस्तानही तुलनेने निश्चिंत होता. परंतु, तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून ताजिकिस्तानच्या चिंतेतही शंभरपटींनी भर पडली आहे. परिस्थिती सध्या इतकी चिघळली आहे की, दोन्ही देशांनी सीमेवर तैनाती वाढवली असून सैनिकांना पाचारण केले आहे.
 
 
खरंतर अफगाणिस्तानच्या सीमा लागून असलेले इराण, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, पाकिस्तान हे सगळेच इस्लामिक देश. परंतु, तरीही जेव्हा प्रश्न तालिबानचा येतो, तेव्हा यापैकी एकाही देशाने तालिबान सरकारला मंजुरी दिलेली नाही. पाकिस्तान यासाठी आग्रही असला तरी मध्य आशियातील इस्लामिक देशांनी तालिबानबाबत अतिशय सावध पवित्रा घेतलेला दिसतो. परिणामी, इस्लामिक समानता असूनही पूर्वापार परंपरेप्रमाणे हे देश मात्र एकमेकांविरोधातच आजही उभे ठाकलेले दिसतात.
 
 
असे म्हटले जाते की, प्रत्येक चार अफगाणींपैकी एक ताजिकवंशीय असतो. एवढेच नाही, तर काबूलमध्येही ताजिकवंशीय अस्मितेला सर्वोपरी मानणार्‍यांची संख्याही दखलपात्र आहे. यावरुन या दोन्ही देशांतील समान सांस्कृतिक धागा अन् वारशाची कल्पना यावी. पण, जेव्हा जेव्हा अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा झेंडा फडकला, तेव्हा तेव्हा ताजिकिस्तानमध्येही तेथील कट्टरतावादी संघटनांनी डोके वर काढले, असा तेथील इतिहास सांगतो आणि वर्तमानातही सध्या तीच परिस्थिती निर्माण झाल्यामुळे दोन्ही देशांमध्ये कमालीचे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
ताजिकिस्तानच्या इस्लामिक कट्टरतावादी असलेल्या ‘जमात अन्सरुल्ला’ ज्यांना ‘ताजिक तालिबान’ म्हणूनही ओळखले जाते, त्यांच्यावर तालिबानने अफगाणिस्तानमधील ताजिकिस्तान नजीकच्या सीमावर्ती भागाच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवली. त्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि शस्त्रास्त्रांचाही पुरवठाही केला. त्यामुळे साहजिकच ताजिकिस्तानचे पित्त खवळले आणि सीमेवर त्यांनी २० हजार सैनिकांची अधिकची कुमक तैनात केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून तालिबाननेही आत्मघातकी हल्लेखोरांची फौज सीमेवर आणून उभी केली. त्यामुळे दोन्ही देशांच्या सीमांवर सध्या तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली दिसते आणि हा तणाव असाच कायम राहिला किंवा भडकला, तर मध्य आशियामध्ये युद्धाचे ढग दाटून यायला फार वेळ लागणार नाही.
 
 
एवढेच नाही, तर पंजशीर खोरे तालिबानच्या अधिपत्याखाली आल्यानंतर अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह आणि तालिबानशी दोन हात करणाऱ्या मसूद यांनीही ताजिकिस्तानचीच वाट धरली होती. ‘पंजशीरचा सिंह’ म्हणून ओळख असलेल्या मसूद यांचे वडील अहमद शाह मसूद यांना, तर ताजिकिस्तानने सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सन्मानितही केले होते. म्हणूनच पंजशीर खोरे आणि ताजिकिस्तानचेही पूर्वीपासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत, जे साहजिकच तालिबानच्या नजरेत खुपणारे!
 
 
त्याचबरोबर तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर हजारो अफगाणी नागरिकांनी ताजिकिस्तानचीही वाट धरली होती. परंतु, ताजिकिस्तान सरकारने अफगाणी निर्वासितांना सीमेनजीकच रोखून धरले. तसेच ताजिकिस्तानमध्ये रशियन सैन्यही काही प्रमाणात तैनात असल्याने तालिबान ताजिकिस्तानच्या वाटेला जाणार नाही, अशी सध्या तरी चिन्हे असली, तरी तालिबानी माथेफिरू कधी काय करतील, याचा नेम नाही. म्हणूनच ताजिकिस्तान एक-एक पाऊल काळजीपूर्वक उचलताना दिसते.
 
 
खरंतर तालिबान सरकारला ताजिकिस्तानने मान्यता द्यावी म्हणून हा दबावनिर्मितीचाच एक प्रयत्न असू शकतो. ‘आम्हाला मान्यता द्या अथवा तुमच्या विरोधातील उपद्रवी गटांना आम्ही अधिक बळकटी देऊ,’ असा तालिबानने आपल्या आजवरच्या कृतीतून ताजिकिस्तानला इशाराच दिला आहे. त्यामुळे आगामी काळात तालिबान विरुद्ध ताजिकिस्तान तणाव कोणते वळण घेतो, ते पाहणे महत्त्वाचे ठरेल.
 
 
@@AUTHORINFO_V1@@