सिंधुदुर्गात सागरी कासव विणीला सुरुवात; या किनाऱ्यांवर सापडली घरटी

    दिनांक  21-Jan-2021 12:52:39   
|

sea turtle_1  H
आॅलिव्ह रिडले प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी दाखल 

 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनाऱ्यांवर सागरी कासवांच्या विणीला सुरुवात झाली आहे. आठवड्याभरापासून समुद्री कासवांच्या माद्या येथील किनाऱ्यांवर अंडी घालण्यासाठी दाखल होत आहेत. गेल्या आठवड्याभरात कासवांची सात घरटी सापडली आहेत. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोकण किनारपट्टीवर सागरी कासवांच्या विणीला सुरुवात झाली आहे. 
 
 
 
 
कोकण किनारपट्टीवर दरवर्षी समुद्री कासवांमधील आॅलिव्ह रिडले प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनाऱ्यांवर प्रामुख्याने या माद्यांची विण होते. महाराष्ट्रात नोव्हेंबर ते मार्च हा सागरी कासवांचा प्रमुख हंगाम आहे. मात्र, वातावरणातील बदलांमुळे गेल्या काही वर्षात जानेवारीपासून हा हंगाम सुरू होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कासव विणीच्या अनषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केल्यास येथील सात किनाऱ्यांवर सागरी कासवे अंडी घालण्यासाठी येतात. यामध्ये वेळागर, मोचेमाड, सागरतीर्थ, वायगंणी (वेंगुर्ला), मुणगे, तांबळडेग, शिरोडा या किनार्‍यांचा समावेश आहे. गेल्या आठवड्यापासून यामधील काही किनाऱ्यांवर कासवांची घरटी सापडण्यास सुरुवात झाली आहे. 
 
 
 

आॅलिव्ह रिडले प्रजातीच्या माद्या वाळूत साधारण दीड फूट खोल खड्डा करुन त्यामध्ये अंडी घालतात. याला ’घरटे’ म्हटले जाते. अशा प्रकारची घरटी तांबळडेग, मुणगे, वायंगणी आणि शिरोडा किनाऱ्यावर आढळून आली आहेत. आज सकाळी तांबळडेग आणि मुणगे किनाऱ्यावर कासवाची दोन घरटी आढळल्याची माहिती सिंधुदुर्गचे मानद वन्यजीव रक्षक नागेश दप्तरदार यांनी दिली. तसेच गेल्या आठवड्यात शिरोडा आणि वायंगणी किनाऱ्यावर प्रत्येकी एक कासवाचे घरटे सापडले. तर आज सकाळी वायगंणी किनाऱ्यावर पुन्हा दोन घरटी सापडल्याची माहिती वनरक्षक सावला कांबळे यांनी दिली. अशा पद्धतीने आजतागायत कासवाची सात घरटी सिंधुदुर्गात सापडली आहेत. या कासवांच्या घरट्यांची निगा स्थानिक कासवमित्र आणि वन विभागाकडून राखण्यात येत आहे. 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.