ठाणे - स्वयंपुनर्विकास ही ठाणेकरांचीही गरज आहे. लोकप्रतिनिधीनी एकत्र येऊन नागरिकांना ताकद कशी देता येईल त्याचबरोबर ठाणे जिल्हा बँकेने जास्तीत जास्त शिथिलता आणून जास्तीचे कर्ज उपलब्ध करावे. केवळ धोरण आणून चालणार नाही तर सोसायटीला ‘माझी सोसायटी’ या भावनेतून समजून घेत त्यांचे पालकत्व ठाणे जिल्हा बँकेने स्वीकारावे, अशी विनंती भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी केली. ते शनिवारी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनच्या वतीने स्वयंपुनर्विकासासंबंधी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत बोलत होते.
याप्रसंगी आमदार संजय केळकर, विधानपरिषदेचे आमदार निरंजन डावखरे, ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, नवी मुंबई फेडरेशनचे अध्यक्ष सतिश निकम, आर्किटेक्ट सचिन साळवी, रवी शंकर शिंदे, ठाणे महापालिकेचे अधिकारी योगेश पाटील यांसह मोठ्या संख्येने नागरिक, पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना दरेकर म्हणाले की, ज्यावेळी एखादी चळवळ आंदोलन म्हणून उभी राहते त्यावेळी तीचे महत्व सरकार दरबारी येते व सरकार त्यावर उपाययोजना करत असते. आज स्वयं पुनर्विकास गती घेताना दिसतेय. स्वयं पुनर्विकास हा गृहनिर्माण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भरता‘ आहे. स्वयंपुनर्विकासात तुम्हीच तुमचे मालक आहात. जो काही फायदा होतो तो सभासदांचा असतो. यामध्ये गुणवत्ता आहे. इच्छाशक्ती प्रबळ असेल तर तुम्ही शंभर टक्के यशस्वी होता. मुंबईत आपण स्वयंपुनर्विकासात यशस्वी झालो असल्याचे दरेकर म्हणाले.
तसेच स्वयं पुनर्विकासात जे यश मिळतेय त्याचे सारे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. गोरेगावला गृहनिर्माण संस्थांचा पहिला कार्यक्रम घेतला. १२ हजार गृहनिर्माण सहकारी संस्थांचे अध्यक्ष, सेक्रेटरी आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री यांच्यासमोर १८ मागण्या केल्या. १६ शासन निर्णय महिन्याभरात घेण्यात आले. काही निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही. यासाठी अभ्यूदय नगर येथे धन्यवाद देवेंद्रजी कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमात फडणवीसांना विषयाची व्याप्ती समजली. त्यांनी सह्याद्रीला मॅरेथॉन बैठक घेतली. त्या बैठकीत अनेक निर्णय घेतले. आज मुंबईत स्वयंपुनर्विकासातून १५ इमारती उभ्या राहिल्या असून लोकं मोठ्या घरात राहायला गेली आहेत. ही स्वयं पुनर्विकासाची ताकद असल्याचे दरेकर यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.
यावेळी दरेकर यांच्यातील कवीही उपस्थितांना दिसून आला. कविता करताना ते म्हणाले की,
कुणी घर देता का घर,
होय त्यासाठी चिंता करू नका
आहेत प्रविण दरेकर, त्याचबरोबर
ठाण्यात निरंजन डावखरे, केळकर
सर्वसामान्य फिरतोय घरासाठी बँक टू बँक
पण डोन्ट वरी तुमच्या पाठी आहे
देवेंद्र फडणवीसांच्या पाठबळची थिंक टॅंक,पाठबळाची बँक
आपण चिंता करू नका,
केळकरांनी सांगितलेय माझी सोसायटी, माझी जबाबदारी
पाठीशी आहे फडणवीसांसारखा भक्कम कारभारी...मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रात स्वयंपुनर्विकास गती घेईलदरेकर म्हणाले की, चारकोप येथे श्वेतांबरा इमारतीच्या चावी वाटपाला मुख्यमंत्री फडणवीस आले होते. त्या कार्यक्रमात त्यांनी प्रीमियमवरील व्याज तीन वर्षासाठी माफ करण्याची घोषणा केली. तसा शासन निर्णयही जारी झाला आहे. त्याच कार्यक्रमात त्यांनी माझ्या अध्यक्षतेखाली दरेकर समिती जाहीर केली. आमच्या समितीने मुंबई, नवी मुंबई, पुणे, संभाजीनगर, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात बैठका घेतल्या. त्याचा अहवाल सोमवारी शासनाला सादर केला जाणार असून माझ्या समितीच्या माध्यमातून मुंबई, ठाणे व महाराष्ट्रात स्वयंपुनर्विकास गती घेईन, असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.
स्वयंपुनर्विकासाबाबत सरकारचे अनेक निर्णयदरेकर म्हणाले की, स्वयं पुनर्विकास फार मोठी टेक्नॉलॉजी नाही. सरकारने या योजनेबाबत अनेक निर्णय घेतले आहेत. ९ मी. व ६ मी. उंचीचा प्रश्न होता तोही आदेशित केला असून लवकरच मार्गी लागेल. डिम्ड कनव्हेन्सबाबतचा निर्णयही शासनाने घेतला आहे. सरकार परवानग्या देईल, सवलती मिळतील पण प्रश्न पैशाचा आहे. यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना विनंती केली की राज्य सहकारी संघाला सांगावे. त्यांनी या योजनेसाठी राज्य सहकारी बँकेला एक हजार कोटी देण्याचे आदेश दिले. एनसीडीसीच्या माध्यमातूनही एक हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत. सेल्फ डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन स्थापन करून स्वयं पुनर्विकासासाठी १०-२० हजार कोटींची तरतूद करावी, असे माझ्या समितीच्या अहवालात नमूद केले असल्याचे दरेकरांनी म्हटले.