छत्रपतीच्या किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळाल्याने डोंबिवलीत भाजपाकडून जल्लोष

    13-Jul-2025   
Total Views |

डोंबिवली, युनेस्कोकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसास्थळांचा दर्जा मिळाल्याने डोंबिवलीत भाजपातर्फे शनिवारी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. डोंबिवलीतील पूर्व, पश्चिम आणि ग्रामीण भागात एकमेकांना पेढे भरवित आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला.

डोंबिवली पूर्वतील इंदिरा गांधी चौकात कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्ष मितेश पेणकर, बाळा पवार आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

नंदू परब यांनी सांगितले, महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ किल्ला युनेस्कोच्या यादीत गेल्याने आम्हाला खूप अभिमान वाटत आहे. महायुती सरकारच्या काळात हे किल्ले युनेस्कोच्या यादीत गेले आहेत. त्यामुळे यांचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,अजित पवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना जाते. महायुतीच्या सरकारमुळे मराठी माणसाला हा अभिमानाचा क्षण पाहता येत आहे असे ही त्यांनी सांगितले.

शशिकांत कांबळे यांनी सांगितले, संपर्ण देशासाठी अभिमानाची, स्वाभिमानाची, आणि गर्वाची गोष्ट आहे. युनेस्कोने जागतिक वारसा यादी तयार केली आहे. त्यात आपल्या शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा समावेश केला आहे. त्याचे श्रेय महायुतीच्या सर्व नेत्यांना जात आहे. कारण आपण गेले अनेक वर्ष जगाचा इतिहास काय ते पाहत होतो. पण जगाच्या पातळीवर इतिहासाची नोंद झाली आहे. देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वात लंडनमधील डॉ. आंबेडकर यांचे घर देखील घेतले होते. आणि आता छत्रपतीच्या किल्ल्यांची ही युनेस्कोच्या यादीत नोंद देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच झाली आहे. हा दुग्धशर्करा योग आहे असे त्यांनी सांगितले.

डोंबिवली पश्चिमेतील सम्राट चौक येथील भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर भाजपा पदाधिकारी आणि कार्यकत्र्यानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्य़ास अभिवादन करत पुष्पाहार अर्पण केले. डोंबिवली पश्चिम उपाध्यक्ष हरिश जावकर, मयुरेश शिर्के आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

हरिश जावकर यांनी सांगितले, प्रत्येक मराठी माणसासाठी हा दिवस अभिमानाचा आहे. मराठा मिलिटरी लॅडस्केप्स ऑफ इंडिया या नावाने महाराष्ट्रातील ११ ऐतिहासिक किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे. हे केवळ जागतिक गौरवच नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा, शौर्याचा आणि स्वराज्य स्थापनेचा जागतिक सन्मान आहे. भाजपा पदाधिकारी व कार्यकत्र्यानी जल्लोष करत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या. ग्रामीण भागात देखील भाजपातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.