सिंधुदुर्गातील 'तिलारी'त अंधारात चकाकणाऱ्या बुरशीचे प्रथमच दुर्मीळ दर्शन

    दिनांक  08-Sep-2020 21:34:35
|
fungi _1  H x W


दोडामार्ग तालुक्यात प्रकाशमान होणाऱ्या बुरशीच्या प्रजातीची प्रथमच नोंद 


मुंबई (अक्षय मांडवकर) - सिंधदुर्ग जिल्ह्यातील तिलारी परिसरातून अंधारात प्रकाशमान बुरशीच्या प्रजातीची प्रथमच नोंद करण्यात आली आहे. वन विभागाने घोषित केलेल्या 'तिलारी राखीव संवर्धन क्षेत्रा'च्या आसपासच्या परिसरात या बुरशीची नोंद झाली आहे. त्यामुळे हा संपूर्ण परिसर जैवविविधतेच्या दृष्टीने समृद्ध असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. 
 
 
पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर अभयारण्य हे अंधारात प्रकाशमान होणाऱ्या बुरशीच्या विविध प्रजातींसाठी प्रसिद्ध आहे. आता सिंधुदुर्गातील दोडमार्ग तालुक्यामधील तिलारी परिसरातून प्रथमच या चकाकणाऱ्या बुरशीच्या प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. स्थानिक निसर्गप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासक संजय सावंत, संजय नाटेकर,तुषार देसाई आणि अमित सुतार यांनी ५ सप्टेंबर रोजी या दुर्मीळ प्रजातीची नोंद केली. जुलै महिन्यात राज्य सरकारने दोडामार्ग तालुक्यातील तिलारी राखीव संवर्धन क्षेत्र घोषित केले होते. याच संरक्षित क्षेत्राच्या आसपासच्या गावांमधून या प्रजातींची नोंद केल्याने तिलारीचे जैविक महत्त्व अधोरेखित झाल्याचे संजय सावंत यांनी सांगितले. सावंतवाडी तालुक्यातील आंबोलीसह गोव्यातील भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य, चोरला घाट या परिसरामधून अंधारात प्रकाशमान होणाऱ्या बुरशीच्या प्रजातीच्या नोंदी आहेत. मात्र, तिलारीत परिसरात प्रथमच ही बुरशी सापडल्याचे माहिती त्यांनी दिली. 


fungi _1  H x W 
 
 
जगभरात अंधारात प्रकाशित होणाऱ्या बुरशीच्या साधारण ७५ प्रजाती सापडतात. यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या केवळ पावसाळ्यातच प्रकाशमान झालेल्या आढळून येतात. त्यांचा अधिवास हा प्रामुख्याने मृत झाडांच्या खोडांवर असतो. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवरील पश्चिम घाटातील जंगलांमध्ये त्यांच्या नोंदी आहेत. चकाकणारी बुरशी साधारण ५२० ते ५३० एनएम तरंगलांबीचा हिरवा रंगाचा प्रकाश निर्माण करते. हे प्रकाश उत्सर्जन सतत चालू राहते आणि केवळ सजीव पेशींमधूनच त्याचे उत्सर्जन होते. प्रकाश उत्सर्जित करणारे अवयव (वनस्पतीचे भाग) हे प्रजातीनुरूप वेगवेगळे असतात. पश्चिम घाटात खास करुन महाराष्ट्रात आढळणाऱ्या प्रकाशित होणाऱ्या बुरशीच्या प्रजातींवर अभ्यास झालेला नाही. त्यामुळे हा अभ्यास हाती घेऊन या दुर्मीळ प्रजातींच्या नोंदी होणे आवश्यक आहे. 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.