दुर्मीळ समुद्री पक्ष्याची मुंबईतून पहिलीच छायचित्रित नोंद; जखमी पक्ष्याला जीवदान

    दिनांक  14-Sep-2020 19:28:20   
|
Red-billed Tropicbird_1&n


'रेड-बिलड् ट्राॅपिकबर्ड' या पक्ष्याची नोंद

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - खोल समुद्रात अधिवास करणाऱ्या 'रेड-बिलड् ट्राॅपिकबर्ड' या पक्ष्याची मुंबईतून प्रथमच छायाचित्रित नोंद करण्यात आली आहे. वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर रविवारी हा पक्षी थकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. 'राॅ' या वन्यजीव बचाव संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्याला वाचवले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून येत्या दोन-तीन दिवसांमध्ये त्याला पुन्हा नैसर्गिक वातावरणात मुक्त करण्यात येईल. 
 
 
यंदा पावसाळ्यात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर अनेक समुद्री पक्षी जखमी वा मृत अवस्थेत आढळून आले आहेत. यामध्ये खास करुन खोल समुद्रात अधिवास करणाऱ्या मास्कड् बूबी, ब्राऊन बूबी या पक्ष्यांचा समावेश आहे. मुंबईतून अशाच एका दुर्मीळ सागरी पक्ष्याची नोंद करण्यात आली आहे. रविवारी सकाळी वर्सोवा किनाऱ्यावर सागर कुटीजवळ प्रभातफेरीसाठी आलेल्या काही नागरिकांना एक जखमी पक्षी थकलेल्या अवस्थेत वाळूत पडलेला आढळला. त्यांनी या पक्ष्याची माहिती 'राॅ' या वन्यजीव बचाव संस्थेला दिली. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पक्ष्याला ताब्यात घेतल्यानंतर त्यांना हा पक्षी 'रेड-बिलड् ट्राॅपिकबर्ड' असल्याचे लक्षात आले. या पक्ष्यावर सध्या उपचार सुरू असून मुंबईतून त्याची प्रथमच छायाचित्रित नोंद झाली आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर या पक्ष्याची छायाचित्रित नोंद आजतागायत केवळ सिंधुदुर्गातील 'वैंगुर्ला राॅक्स'च्या खडकावरुन आहे.
 
 
 
'रेड-बिलड् ट्राॅपिकबर्ड' हा पक्षी १९६२ आणि १९७२ साली मुंबईच्या किनाऱ्यांवर मृतावस्थेत सापडल्याची नोंदी आपल्याकडे आहेत. मात्र, रविवारी वर्सोव्याच्या किनाऱ्यावर सापडलेल्या या पक्ष्याची मुंबईतून पहिलीच छायाचित्रित नोंद झाल्याची माहिती पक्षीतज्ज्ञ आणि निरीक्षक आदेश शिवकर यांनी दिली. हा पक्षी खोल समुद्रात अधिवास करत असून तो सातत्याने उडत असतो. आराम करण्यासाठी तो समुद्राच्या पाण्यावर पोहतो आणि केवळ प्रजनन हंगामात समुद्रातील बेंटाना भेट देतो, असे त्यांनी सांगितले. यापुढे असे पक्षी आढळल्यास तातडीने पक्षीतज्ज्ञ किंवा वन्यजीव बचाव कार्यकर्त्यांना संपर्क साधण्याचे आवाहन शिवकर यांनी यानिमित्ताने केले आहे. रविवारी सापडलेल्या 'रेड-बिलड् ट्राॅपिकबर्ड' या पक्ष्याची प्रकृती आता उत्तम असून तो अन्नग्रहण करत असल्याची माहिती 'राॅ'चे प्रमुख आणि ठाण्याचे मानद वन्यजीव रक्षक पवन शर्मा यांनी दिली. पशुवैद्यकांचा अंतिम तपासणीनंतर त्याला येत्या दोन दिवसांमध्ये नैसर्गिक वातावरणात मुक्त करणार असल्याचे ते म्हणाले. 

 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.