आतातरी पोटदुखी थांबेल का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2020
Total Views |


Ram Mandir_1  H



श्रीराम मंदिराच्या पायाभरणीसमयी सर्वाधिक दिवाळे वाजले ते शिवसेनेचे. कारण, श्रीराम मंदिराच्या पायाभरणीची तारीख निश्चित झाली. पायाभरणीचा सोहळा झाला. तरी शिवसेना जल्लोष साजरा करताना कुठेच दिसली नाही. कदाचित बेईमानीच्या पायावर उभ्या ठाकलेल्या सत्तास्थानावर बसलेल्या उद्धव ठाकरेंना सोनिया गांधी, राहुल गांधी आणि बारामतीकर काकांची यासाठी परवानगी मिळाली नसेल.

श्रीरामभक्तांच्या आणि हिंदुत्वनिष्ठांच्या शतकानुशतकांच्या संघर्ष यज्ञाचा परिपाक म्हणजे अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीस्थळी उभारण्यात येत असलेले श्रीराम मंदिर. बुधवार दि. ५ ऑगस्ट या मंगल दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील श्रीराम मंदिराची पायाभरणी करण्यात आली आणि कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न साकार झाले. ५०० वर्षांपूर्वी बाबराने श्रीराम मंदिर पाडून बांधलेल्या धर्मांध मानसिकतेवर शौर्याचा आणि तेजाचा भगवा अभिमानाने, डौलाने फडकू लागला. आतापर्यंत लाखो श्रीरामभक्तांनी आणि हिंदुत्वनिष्ठांनी ज्या परमपवित्र दिवसाच्या प्रतीक्षेत आपल्या प्राणांचे बलिदान दिले, अशा सर्वांच्या प्राणाहुतीचे चीज झाले. मात्र, श्रीरामजन्मभूमी मुक्तीसाठी हिंदूंनी दिलेला लढा विश्वाच्या चिरकाल स्मरणात राहणारा आणि आपल्या अस्मिता व स्वत्त्वासाठी झगडणार्‍या प्रत्येकाला प्रेरणा देणारा असल्याचेच दिसते.


सन १५२७-२८ साली मुगल बादशहा बाबराच्या आदेशावरुन त्याचा सेनापती मीर बांकीने अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिर उद्ध्वस्त केले. मात्र, मंदिर पाडल्यापासूनच हिंदू समाजाने प्रत्याक्रमण केले व १८८४ सालापर्यंत तीन लाख श्रीरामभक्तांच्या प्राणार्पणासह तब्बल ७६ वेळा लढा दिला. पुढे १८८५ साली महंत रघुबरदास यांनी फैजाबाद न्यायालयात श्रीरामजन्मभूमीवर अधिकार मिळवण्यासाठी खटला दाखल केला. नंतर १९४९ साली एके दिवशी अचानक बाबरी ढाँचात रामललाच्या मूर्ती प्रकट झाल्या, तर १९८३ साली विश्व हिंदू परिषदेच्या संमेलनात काँग्रेस नेते दाऊ दयाल खन्ना यांनी धर्मस्थान मुक्तीचा विषय मांडला. त्याच्या पुढच्याच वर्षी १९८४ सालच्या धर्मसंसदेत श्रीरामजन्मभूमी मुक्ती यज्ञ समितीची स्थापना करण्यात आली, तर १९८६ साली न्यायालयाच्या आदेशाने बाबरी ढाँचाचे कुलूप उघडले गेले. नंतर १९८९ साली देवकीनंदन अग्रवाल यांनी रामललाचा सखा म्हणून नव्याने दावा दाखल केला, तसेच शिलापूजन कार्यक्रमांची घोषणा झाली. सन १९९० साली प्रथम कारसेवेची घोषणा झाली व भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वात सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा, श्रीरामज्योती कार्यक्रम संपन्न झाला. १९९१ साली दिल्लीतील बोट क्लब येथे विराट हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले आणि १९९२ साली द्वितीय कारसेवेची घोषणा झाली. ६ डिसेंबर, १९९२ रोजी श्रीरामभक्त्यांच्या धक्क्याने बाबरीचे पतन झाले. पुढे २००३ साली बाबरी ढाँचाखाली उत्खननाचा आदेश देण्यात आला व २००४ साली पुरातत्त्व खात्याने उत्खननाबाबतचा अहवाल सादर केला.


दरम्यान, न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर २०१० साली अलाहाबाद उच्च न्यायालयाने श्रीरामजन्मभूमीच्या त्रिभाजनाचा निर्णय दिला. मात्र, त्याला हिंदू पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आणि २०१० ते २०१७ या काळात प्रत्येकाने न्यायालयीन निर्णयाची प्रतीक्षा केली. २०१८ साली केंद्र सरकारवर श्रीराम मंदिराचा कायदा करण्यासाठी दबाव टाकला गेला व हिंदुत्वनिष्ठांकडून देशभरात ३०० धर्मजागरण सभा घेण्यात आल्या. २०१९ साली सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणाच्या सुनावणीसाठी खंडपीठाची घोषणा केली व ९ नोव्हेंबर, २०१९ रोजी हिंदू पक्षाच्या बाजूने निर्णय आला आणि ५ ऑगस्ट, २०२० रोजी पंतप्रधानांनी मंदिराची पायाभरणी केली.


असा हा श्रीरामजन्मभूमीमुक्तीसाठी हिंदूंनी तब्बल ५०० वर्षे सर्व पातळ्यांवर केलेल्या युद्धाचा थोडक्यात घटनाक्रम आहे. तथापि, आज श्रीराम मंदिराची पायाभरणी झाली, त्याचवेळी आणि त्याआधीपासूनच हिंदुद्वेष्ट्यांची मळमळ बाहेर आल्याचे दिसले. श्रीराम व हिंदूंच्या श्रद्धास्थाने-प्रतीकांचा द्वेष करणार्‍या टोळक्याने मंदिराच्या पायाभरणीला सेक्युलरिझमची हत्या म्हटले तर असदुद्दीन ओवेसीसारख्यांनी बाबरी होती, आहे आणि राहणार, अशी बांग दिली. मात्र, याव्यतिरिक्त वामपंथीय इतिहासकार, साहित्यिक, पत्रकारांची जळजळही पाहायला मिळाली व श्रीराम मंदिराच्या पायाभरणीने त्यांचा गळू जरा जास्तच ठणकायला लागला. राम पुनियानी आणि कुमार केतकर या दोघांचा अशा दुखणेकर्‍यांत समावेश होतो. पुनियानी यांचे नाव फक्त ‘राम’ आहे, पण त्यांचे विचार आणि वर्तन रामाला खोटे पाडणारे व रामाबद्दल गैरसमज, तिरस्कार पसरवणारेच राहिले. तर राज्यसभा खासदार आणि काँग्रेसमध्ये जाऊनही ज्यांच्याकडे बुद्धी आहे असे मानले गेले, त्या कुमार केतकरांनी दोनच दिवसांपूर्वी आपल्या सुमारपणाचे दर्शन घडवले. रामायण केवळ वाल्मिकींनी रचलेले काव्य असून श्रीरामाच्या अस्तित्वाचा पुरावा नसल्याचे ते म्हणाले. अर्थात, गांधी घराण्याच्या दावणीला बांधून घेतलेल्या कुमार केतकरांना संबित पात्रा यांनी ‘राईस बॅग कन्व्हर्ट’ म्हणून सुनावले हे बरेच झाले. कारण, केतकरांच्या विचारांची मजल केवळ गांधी-नेहरु घराण्याची खुशामत करण्याइतकीच राहिली असून ‘राईस बॅग कन्व्हर्ट’च्या किताबाने, आपल्या हुजरेगिरीची कदर केल्याने ते स्वतःदेखील नक्कीच आनंदले असतील. मात्र, संभाजीराव भिडेंच्या ‘मिशीवाला राम’ या विधानाची खिल्ली उडवणार्‍यांना राम पुनियानी व कुमार केतकरांचा बदमाशपणा दिसला नाही. भिडे यांनी आपल्या मनातला श्रीराम कसा आहे, हे सांगितले, तर राम पुनियानी आणि कुमार केतकरांनी आपल्यात ‘राम’ नसल्याचेच दाखवून दिले होते. तेव्हा अशा लोकांचा समाचार घेतलाच पाहिजे.


दरम्यान, श्रीराम मंदिराच्या पायाभरणीसमयी सर्वाधिक दिवाळे वाजले ते शिवसेनेचे. कारण, बाबरी पाडल्याचे श्रेय घेणार्‍या शिवसेनेने भाजप व संघ परिवाराच्या मंदिर वही बनाएंगे’ या घोषणेची ‘पर तारीख नहीं बताएंगे’ असे म्हणत सातत्याने टिंगल-टवाळी केली. मात्र, श्रीराम मंदिराच्या पायाभरणीची तारीख निश्चित झाली, पायाभरणीचा सोहळा झाला, तरी शिवसेना कुठेच दिसली नाही. भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिमानाने श्रीराम मंदिर निर्मितीचा प्रारंभ केला, पण त्याचे मोकळ्या मनाने स्वागत करण्याचीही पात्रता शिवसेनेची राहिली नाही. बेईमानीच्या पायावर उभ्या ठाकलेल्या सत्तास्थानावर बसलेल्या उद्धव ठाकरेंना सोनिया गांधी, राहुल गांधी आणि बारामतीकर काकांची यासाठी परवानगी मिळाली नसेल. इतकेच नव्हे तर स्वतः काही करण्याची कुवत नसताना राज्यातील श्रीरामभक्तांनी पायाभरणीचा सोहळा साजरा करु नये, याकडेही ठाकरे सरकारने विशेषत्वाने लक्ष दिले. मात्र, सरकारच्या दडपशाहीला झुगारुन श्रीरामभक्तांनी अनेक ठिकाणी आपल्या आराध्य दैवताच्या तंबूवजा झोपडीतून भव्य मंदिरात परतण्याच्या क्षणांचा साक्षीदार होत आनंदोत्सव केला आणि यापुढेही साजरा करतीलच.

 
@@AUTHORINFO_V1@@