मानखुर्द बालसुधारगृहातील मुलांसह कर्मचाऱ्यांची स्वॅब टेस्टिंग करा : किरीट सोमय्या

    दिनांक  27-Jul-2020 18:41:18
|
mankhurd_1  H x

मानखुर्दच्या चिल्ड्रन होममधील ३० जणांना कोरोनाची बाधा

मुंबई : मानखुर्द बालसुधारगृहातील स्वॅब टेस्टिंग केलेल्या ५४ मुलांपैकी ३० मुलांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येणे हे खरोखरच धक्कादायक आहे. मुंबई महापालिकेने या सुधारगृहातील सर्व मुलांची आणि कर्मचाऱ्यांची १०० टक्के स्वॅब टेस्टिंग करावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमैया यांनी केली आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, पालिकेच्या एम/पूर्व विभागात ठिकठिकाणी सर्वेक्षण आणि फिव्हर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर, नुकतीच गोवंडी येथील चिल्ड्रन होममधील २६८ जणांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी ३० जणांना कोरोना झाला आहे. या व्यक्ती १३ ते ७० वयोगटातील असून यात २५ पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे, अशी माहिती एम/पूर्वचे साहाय्यक आयुक्त सुधान्शू द्विवेदी यांनी दिली. यात तरुणांची संख्या कमी असून ५० वयोगटानंतरच्या व्यक्तींची संख्या जास्त आहे. यात काही गतिमंद रुग्णांचाही समावेश आहे. दरम्यान, यातील २७ जणांना बीकेसीतील कोरोना रुग्णालयात, तर तिघांना शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तिघांपैकी दोघांना टीबी असून एकाला कोरोनाची तीव्र लक्षणे आहेत.


सोमैया यांनी सोमवारी मानखुर्द बालसुधारगृहाची भेट घेतली आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. येथील कर्मचाऱ्यांना गेल्या ४ महिन्यापांसून पगारही मिळालेला नाही. इथे गतिमंद आणि इतर मुलांसाठी अशी दोन सुधारगृह आहेत. यावेळी बबलु पांचाळ आणि युवराज मोरे आणि अनिल ठाकूर, सोमय्या यांच्यासोबत होते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.