दुर्मीळ खवले मांजर पडले विहिरीत; पुढे काय झाले, पहा व्हिडीओ

    दिनांक  23-Jul-2020 19:11:16
|
pangolin_1  H x


चंद्रपूर जिल्ह्यातील घटना 


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - चिमूर तालुक्यातील शंकरपूरमधील एका विहिरीत आज सकाळी दुर्मीळ खवले मांजर पडलेले आढळून आले. शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखून या खवल्या मांजराला विहिरीबाहेर काढून घटनेची माहिती वन विभागाला दिली. त्यानंतर वनाधिकाऱ्यांनी या प्राण्याची नैसर्गिक अधिवासात सुखरुप सुटका केली. शेतातील किंवा जंगलाच्या आसपास असलेल्या कठडे नसलेल्या विहिरी या नेहमीच वन्यजीवांच्या मुळावर उठण्यास कारणीभूत ठरतात. बऱ्याचदा अशा विहीरींमध्ये पडून वाघ, बिबट्यांसारख्या प्राण्यांचा मृत्यू झाल्याचाही घटनाही घडल्या आहेत. आज चंद्रपूर जिल्ह्यातील शंकरपूर गावामधील विहिरीत खवले मांजर पडल्याची घटना समोर आली. येथील शेतकरी आणि 'ट्री फाऊंडेशन'चे अध्यक्ष युवराज मुरस्कर यांच्या शेतातील विहिरीत खवले मांजर पडलेले आढळून आले. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुरस्कर शेतकामासाठी शेतात गेल्यानंतर त्यांना हे खवले मांजर विहिरीत पोहताना आढळून आले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती आपल्या शेतकरी मित्रांना दिली. त्यांच्या मदतीने या खवले मांजराला सुखरुपरित्या विहिरीबाहेर काढण्यात आले.pangolin_1  H x
 
 
विहिरीवर बसवलेल्या इंजिनाकडील खुल्या भागामधून हे खवले मांजर विहिरीत पडल्याची शक्यता मुरस्कर यांनी वर्तवली. २.३ फूट लांब आणि ४ किलो वजनाच्या या खवले मांजराला विहिरीबाहेर काढल्यानंतर त्याची माहिती आम्ही शंकरपूर वनपरिक्षेत्राचे वनरक्षक केदार यांनी दिल्याचे मुरस्कर यांनी सांगितले. त्यानंतर वनाधिकाऱ्यांनी खवले मांजराला ताब्यात घेऊन त्यांची पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुटका केली. खवले मांजर बचावाच्या या कामात मुरस्कर यांना शेतकरीमित्र भीमराव शेंडे, महादेव खांदे, संदीप खांदे अक्षय चौधरी, स्नेहल शेंडे यांनी मदत केली. वन्यजीवांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीच्या बाजारपेठेत खवले मांजराला मोठी मागणी असून त्यांची मोठ्या प्रमाणावर तस्करी होते.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.