मातृहृदयी संत नामदेव

    दिनांक  18-Jul-2020 22:43:01
|


Saint namdev_1  

 


ज्ञानेश्वरांना समकालीन असलेले संत नामदेव यांचे जीवन व कार्य मैलाचा दगड ठराव इतके मोलाचे आहे. आपल्या ८० वर्षांच्या दीर्घ आयुष्यात त्यांनी धर्म व समाजजागृतीचे जे महान कार्य केले, त्याचा १८ जुलै रोजी झालेल्या नामदेवांच्या पुण्यतिथीनिमित्ताने या लेखात घेतलेला हा धावता आढावा...

 


भारतातील वैदिक धर्म व हिंदू संस्कृती यांना पाच हजार वर्षांचा गौरवशाली इतिहास व परंपरा आहे. त्याकाळात सर्व अर्थाने एक वैभवसंपन्न राष्ट्र म्हणून भारत तत्कालीन ज्ञात जगात प्रसिद्ध होता. या देशातून सोन्याचा धूर निघतो, अशी त्याच्या ऐश्वर्याची ख्याती होती. बलशाली राष्ट्र म्हणूनही त्याचा जगात बोलबाला होता. त्यामुळेच शक, कुशाण, हूण यांसारख्या परकीय आक्रमकांना या देशाने केवळ पराभूत केले नाही, तर पचवूनही टाकले होते.

 
मात्र, इसवी सनाच्या आठव्या शतकापासून या परिस्थितीत बदल होत गेला. इ. स. ७१२ सालापासून महंमद बिन कासीम या मुस्लीम आक्रमकाने या देशावर आक्रमण करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून या देशावर इंग्रजांचा सर्वंकष व देशव्यापी अंमल सुरु होईपर्यंत म्हणजे १८१८ पर्यंत इस्लाम धर्म आणि मुसलमानी आक्रमक यांचा पगडा व प्रभाव या देशावर होता. हा काळ सुमारे एक हजार वर्षांचा होता. या काळात दक्षिणेकडे विजयनगरचे साम्राज्य, यादवांचे राज्य आणि पश्चिमेकडे छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेली मराठेशाही या एतद्देशीय राजवटींनी हा प्रभाव रोखण्याचा व स्वातंत्र्यरक्षणाचा प्रयत्न केला. तथापि, त्यांचे स्वरूप देशव्यापी नव्हते. परिणामतः विविध मुस्लीम राजवटींनी आपले पाय या देशात घट्ट रोवले होते. हाच काळ धर्मग्लानीचा व सामाजिक अवनतीचाही होता. वैदिक परंपरा क्षीण व निष्प्रभ झाली होती. बदलत्या परिस्थितीप्रमाणे समाजाला नवी प्रेरणा देण्याचे सामर्थ्य तत्कालीन धर्मसंस्थेत उरले नव्हते. मात्र, याच काळात तेराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून सतराव्या शतकाच्या अखेरपर्यंत म्हणजे सुमारे चारशे वर्षे महाराष्ट्रातील संत परंपरेने धर्मजागृती व समाजजागृती करण्याचा व मुस्लीम आक्रमणाचा प्रभाव कमी करण्याचा व्यापक प्रयत्न केला. संत ज्ञानेश्वरांपासून सुरु झालेली ही संतांची मांदियाळी संत तुकाराम व रामदासांपर्यंत येऊन पोहोचलेली दिसते. या संत परंपरेत अठरापगड जातीत जन्मलेल्या अनेक स्त्री-पुरुष संतांचा समावेश होतो. या लखलखित परंपरेत ज्ञानेश्वरांना समकालीन असलेले संत नामदेव यांचे जीवन व कार्य मैलाचा दगड ठराव इतके मोलाचे आहे. आपल्या ८० वर्षांच्या दीर्घ आयुष्यात त्यांनी धर्म व समाजजागृतीचे जे महान कार्य केले त्याचा धावता आढावा आपण या लेखात घेणार आहोत.
 
तत्कालीन राजकीय व सामाजिक स्थिती

 


इस्लाम धर्म तसेच मुस्लीम आक्रमण व राजवटींचा दीर्घकालीन व खोल परिणाम या देशाच्या जनमानसावर, धर्म व संस्कृतीवर झालेला दिसतो. या आक्रमणाचे स्वरूप केवळ राजकीय नव्हते तर, सामाजिक व सांस्कृतिकही होते. या कालखंडात मुस्लीम राज्यकर्त्यांनी अतिशय क्रूर व अमानुष कत्तली केल्या. संपत्तीची लूट केली. सक्तीची धर्मांतरे घडवून आणली. मंदिरांचा विध्वंस केला. मूर्तींची विटंबना केली. मंदिरांचे रूपांतर मशिदीत केले. या देशातील लोक काफीर असून त्यांच्या कत्तली करण्यात आनंद मानणारे हे राज्यकर्ते होते. त्यांनी येथील प्रजेवर जिझीया कर बसविला. करवसुली व नोकरी देण्याच्या बाबतीत त्यांचे धोरण पक्षपाती व हिंदू समाजावर अन्याय करणारे होते. इस्लामी आक्रमणाच्या या अनपेक्षित आघाताने हिंदू समाज भयचकित झाला होता. एका अर्थाने आपल्याच देशात तो आपल्याच अस्तित्वाची शस्त्रहीन लढाई लढत होता. याच काळात येथील राज्यकर्ते फंदफितुरी व अंतर्गत वैमनस्याने त्रस्त होते. शत्रुमित्र विवेक हरवून बसल्यामुळे आक्रमकांना सहकार्य करण्याचा नादानपणा करीत होते. ते आत्मकेंद्री, स्वार्थी व स्वाभिमानशून्य बनले होते. त्यांच्या कारभारात शैथिल्य व बेशिस्त असल्यामुळे मुस्लीम आक्रमकांना त्यांच्यावर वर्चस्व मिळविणे सहजसाध्य झाले होते. तत्कालीन राजकीय अधोगतीचे स्वरूप हे असे होते.
 

ब्राह्मणांची कर्तव्यपराङमुखता, राजघराण्यातील अंत:कलह व क्षत्रियांची सुखासीनता, शूद्रांची आर्थिक व बौद्धिक कुचंबणा याने सामाजिक जीवनात अधोगती आली होती. जन्माधिष्टित उच्चनीचता, कप्पेबंद जातीव्यवस्था, अस्पृश्यता यामुळे सामाजिक जीवन पोखरून गेले होते. रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, कर्मकांड याच्या प्रभावामुळे मूळ धर्माला ग्लानी आली होती. अशा विपरीत परिस्थितीत संतपरंपरेने धर्म जागरणाचे व समाजधारणेचे जे कार्य केले ते लक्षणीय आहे. त्यातील संत नामदेवांची भूमिका ही जनसामान्यांपर्यंत पोहोचून भक्तिमार्गाच्या माध्यमातून परिवर्तनाच्या चक्राला गती देणारी अशी महत्त्वपूर्ण आहे.
 
नामदेवांचा जीवनपट

 


संत नामदेवांचा जन्म इ. स. १२७० मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीला हिंगोली जिल्ह्यातील नरसी या गावी एका गरीब कुटुंबात झाला. त्यांना ८० वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांचे बालपण पंढरपुरात गेले, त्यामुळे लहानपणापासूनच सावळ्या विठोबाचा सहवास त्यांना लाभला. त्याकाळी महाराष्ट्रात संतांची मांदियाळीच अवतरली होती. निवृत्तीनाथ, सोपानदेव, ज्ञानदेव, मुक्ताबाई या चार तेजस्वी संतभांवंडांबरोबरच विसोबा खेचर, सेना न्हावी, गोराकुंभार, चोखामेळा, नरहरी सोनार आणि त्यांच्या घरात बालपणापासून राहायला आलेल्या संत जनाबाईही होत्या. नामदेवांचा सारा परिवार संतवृत्तीचा होता. नारा, विठा, गोंदा, महादा ही नामदेवांची चार मुलेही संतप्रवृत्तीची होती. त्यांच्या मुलांचे अभंगही नामदेव अभंगगाथेत उपलब्ध आहेत. हे सर्व कुटुंब विठुरायाचे अनन्य भक्त होते. नामदेव तर विठोबाशी सलगी करून संवादही करीत असत. त्यांना त्याचा अभिमान होता. पुढे आपणच विठोबाचे सर्वश्रेष्ठ भक्त आहोत असा अहंकारही त्यांच्या मनात निर्माण झाला. ही बाब लहानग्या मुक्ताईच्याही लक्षात आली. तिनेच पुढाकार घेऊन त्यांचा हा अहंकार दूर केला व त्यांना खर्‍या व डोळस भक्तीचा मार्ग दाखविला. त्यासंदर्भातील आठवण अतिशय हृद्य आहे. एकदा नामदेवांच्या कीर्तनात सर्व संत हजर असताना निवृत्ती, ज्ञानदेवादि सारे संत त्यांना नमस्कार करतात. मात्र, गर्वाने फुगलेले नामदेव त्यांना प्रतिनमस्कार करण्याचे सौजन्यही दाखवित नाहीत. आपल्या भावंडांचा हा अपमान पाहून मुक्ताई तेथे जमलेल्या सर्व संतांमध्ये लहान असूनही नामदेवांना नमस्कार करण्याचे स्पष्ट नाकारते. निवृत्तीनाथांनी सांगूनही ती नमस्कार करीत नाही. उलट म्हणते,

 


 
अखंड जयाला देवाचा शेजार। काय अहंकार गेला नाही ॥
मान अभिमान वाढविशी हेवा । दिस असतो दिवा हाती घेसी ॥

 


 
पण, शहाण्याला शब्दांचा मार पुरा नसतो ना! पुढे एका प्रसंगी सर्व संत एकादशीसाठी पंढरपुरात एकत्र जमले असता तेथे वयाने ज्येष्ठ व ज्यांना सारे आदराने ‘काका’ म्हणत, अशा गोरा कुंभारांना मुक्ताई सर्व संतांची परीक्षा घेण्याचे सुचविते. गोरोबा हातात थापटणे घेऊन प्रत्येक संतांच्या डोक्यावर थापटतात. कोणीही काही बोलत नाही. मात्र, नामदेवांच्या डोक्यावर थापटणे मारल्यावर ते चिडतात. तेव्हा ‘हे मडके कच्चे आहे’ असा निर्वाळा गोरोबा देतात. मुक्ताई नामदेवांना ‘गुरूशिवाय ज्ञान वा भक्ती व्यर्थ आहे,’ असा उपदेश करून त्यांना गुरूचा उपदेश घेण्याचा सल्ला देतात. त्यामुळे नामदेवांनी मुक्ताईचे शिष्य ‘विसोबा खेचर’ यांना गुरु केले. वय, अधिकार आणि भक्तीने श्रेष्ठ असूनही नामदेवांना त्यांचे न्यूनत्व स्पष्टपणे सांगण्याचे धाडस मुक्ताईने केले आणि त्यांच्या श्रेष्ठत्वाचा मार्ग खुला झाला. भक्तिपंथातही आत्मसाक्षात्कारासाठी व मोक्षप्राप्तीसाठी गुरुची भेट व अनुग्रह आवश्यक आहे, हेच खरे! पुढे स्वतः नामदेवांनी चोखामेळ्याच्या शिरावर वरदहस्त ठेवला व त्यांना नाममंत्राची दीक्षा दिली आणि हृदयस्थ परमात्म्याचा चोखोबांना साक्षात्कार झाला.

 
 
गुरुभक्तीपुढे परमेश्वराच्या वैश्विकतेचा साक्षात्कार झालेले नामदेव पुढे ज्ञानदेवांच्या कार्याशी एकरूप झाले. त्यांच्याबरोबर त्यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला आणि सर्व क्षेत्रस्थानी तीर्थयात्रा केली. ज्ञानदेवांची प्रवचने व नामदेवांची नामसंकीर्तने याने अवघा महाराष्ट्र दुमदुमून गेला. त्यावेळचा ज्ञान आणि भक्तीचा हा संवाद म्हणजे महाराष्ट्राला लाभलेले अनमोल देणे आहे.
 
 
ज्ञानदेवप्रणीत भागवत धर्माचा संदेश गावोगाव पोहोचविण्याचे कार्य नामदेवांनी केले. आपल्या वाङ्मयाद्वारे ज्ञानेश्वरांनी शूद्रातिशूद्रांना नवी जीवनदृष्टी दिली; परंतु त्यांच्या जीवनात त्या ध्येयाला साकारता येण्यासाठी त्यांना स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव होणे आवश्यक होते. नामदेवांनी आपल्या ८० वर्षांच्या आयुष्यात मोठ्या निष्ठेने व तन्मयतेने नामसंकीर्तनासारख्या भक्तिमार्गाद्वारे बहुजन समाजाच्या सुप्त आकांक्षा जागृत केल्या. ज्ञानदेवांच्या बुद्धीप्रधान अद्वैत सिद्धांताला नामदेवांनी नामसंकीर्तनाद्वारे सगुणभक्तीची जोड दिली. त्यांच्या या भक्तिभावाने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले. अर्थात, आपण हे लक्षात ठेवायला हवे की, नामसंकीर्तनासारख्या सहजसुलभ मार्गाचा त्यांनी महिमा गायला असला तरी साधनाच्या दृष्टीने ती केवळ एक पायरी आहे, हे त्यांनी वारंवार व निक्षून सांगितले. भक्ती ही सुळावरची पोळी’ आहे. भक्त होण्यासाठी ‘चणे खावे लोखंडाचे’ अशी खडतर साधना करावी लागते, हे त्यांनी अधोरेखित केले. नामसंकीर्तनाचा अट्टाहास हा कर्मठपणाची, कर्मकांडाची नांगी ठेचण्यासाठी आहे; आत्मशुद्धी व सदाचरण यावर त्यांनी भर दिला आहे. त्यांचा हा नामसंकीर्तनाचा संप्रदाय म्हणजे धर्मशिक्षणाची एक प्रचंड मोहीमच होती. ज्ञानदेव म्हणजे ज्ञानियांचे राजे. परंतु ‘नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।’ ही नामदेवांची प्रतिज्ञा होती. लोकांत श्रद्धा होतीच, तिला संतांनी डोळसपणा आणला. सारांश, नामदेवांचे ‘मडके’ कच्चे असल्याची गोरोबाकाकांची परीक्षा आणि विसोबा खेचरांचा अनुग्रह झाल्यानंतर डोळियांचे डोळे उघडिले जेणेहा नामदेवांचा उद्गार यावरून ज्ञान आणि भक्ती त्याकाळी कसे हातात हात घालून जात होते, हे लक्षात येते.
 
ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर संत नामदेव उत्तरेत गेले. पंजाबात वीस वर्षे वास्तव्य होते. तत्पूर्वी त्यांनी गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश येथे आपला भक्तिमार्ग रुजविण्यासाठी पायी प्रवास केला. पंजाबातील गुरुदासपूर जिल्ह्यात घुमान येथे संत नामदेवांचे मोठे स्थान आहे. लाहोर, अमृतसर, गुरुदासपूर, लायलपूर, जालंधर, लुधियाना, अंबाला,हिस्सार येथे नामदेवांची मंदिरे आहेत. ते उत्तर भारतातील निर्गुण भक्तीचे प्रवर्तक मानले जातात. त्यांनी आपली १२५ पदे हिंदीत लिहिली. त्यातील ६१ पदांचा समावेश गुरु ग्रंथसाहेबात ‘नामदेवकी गुरुबानी’ असा असून आजही त्यांचे श्रद्धेने शीखबांधव पठण करतात. नामदेवांच्या एका रचनेत ‘चंद्रसूर्य हे दिवे’ ही कल्पना आली आहे. तिचाच उच्चार पुढे दीडशे वर्षांनी गुरुनानकांनी गगनमे थालु रविचंद्रु दीपक बने’ या आरतीत केला आहे, हा योगायोग विलक्षण म्हणावा लागेल. नामसंकीर्तनाचे व निर्गुण उपासनेचे प्रवर्तक, नामाचा महिमा, गुरुचे महत्त्व, चराचरात भरून राहिलेले ब्रह्म, ईश्वरभक्ती हे नामदेवांच्या उपदेशाचे विषय. ‘असथापर जंगम कीट पतंगम। घटि घटि राम समाना रे॥’ ही वैश्विक दृष्टी असणारे नामदेव अखेरच्या काळात माहेरी-पंढरपुरी-आले आणि १८ जुलै १३५० रोजी त्यांनी विठुरायाच्या चरणी देह ठेवला. आजही श्रीविठ्ठल मंदिरात ‘नामदेवाची पायरी’ ओलांडल्याशिवाय प्रवेश होत नाही!
 
नामदेवांचे संत साहित्य

 


कोणत्याही संतांची खरी ओळख त्याच्या उपलब्ध असलेल्या लिखित साहित्यातूनच होत असते. नामदेवांनाही त्यांच्या अभंगातूनच जाणावे लागते. नामदेव गाथेत पंचवीसशे अभंग असून त्यातील १२५ हिंदी भाषेत आहेत. नामदेव हे मराठी भाषेतील आद्य आत्मचरित्रकार होते. त्यांनी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई व समकालीन सर्व संतांची रसाळ चरित्रेही लिहिली आहेत. त्यांनी भागवतातील काही श्लोकांचा स्वैर अनुवादही केला, त्यामुळे त्यांना अनुवादकारही म्हणता येईल. ज्ञानदेवांनी तरुणवयात समाधी घेतली. त्या गंभीर प्रसंगी ते उपस्थित होते. त्यांनी या हृदयाला पाझर पडणार्‍या प्रसंगाचे अतिशय उत्कट वर्णन आपल्या गाथेत केले आहे. तो त्यांच्या साहित्याचा कळसाध्याय म्हणावा लागेल!
 

नामदेव हे विठ्ठलाचे भावभोळे भक्त होते. त्यांची कविता ही मातृप्रेमाच्या महतीने भरल्यामुळे पारिजाताच्या फुलासारखी सुंदर, नाजूक, कोवळी व सुगंधी होती. तो त्यांच्या वत्सल भावभक्तीचा सहजसुंदर आविष्कार होता. अगदी बालवयात ते विठूमाऊलीचे बाळ बनले. म्हणून भक्तिक्षेत्रातील त्यांचा बालसुलभ भाव प्रांजळ आणि उत्कट आहे. ‘तू माझी माऊली, मी वो तुझे पाडस। पाजी प्रेमपान्हा पांडुरंगे॥अशा आर्ततेने ते विठाईला हाक मारतात. त्यांच्या अभंगात माऊली आणि तिचा तान्हा, गाऊली आणि तिचे वासरू, हरिणी आणि तिचे पाडस, पक्षिणी आणि तिचे पिलू अशा वत्सल नात्याची मालिकाच त्यांनी उभी केली आहे.
 
पक्षिणी प्रभाती चारियासी जाये। पिलू वाट पाहे उपवासी॥
तैसे माझे मन धरी वो तुझी आस। चरण रात्रंदिवस चिंतीतसे॥

 


अशी भक्तीची आर्तता, कासाविशी ते आपल्या कवितेत व्यक्त करतात. त्यांची कविता गाणे होताना सुरांच्या मिळणीसाठी अडत नाही की शब्दांच्या जुळणीसाठी थबकत नाही. नामदेव मनोधर्मे गात राहतात.

 


डोळुले शिणले वाटुली पाहता। अवस्था दाटली हृदयामाजी॥
तू माझी जननी,
सरसी ये सांगातिणी।
विठ्ठले धांवोनि देई क्षेम॥
माहेरासाठी आसुसलेले नामदेव व्याकूळ होऊन म्हणतात,
नेत्र माझे रोडले, आठवे माहेर। भेटेन निरंतर बाईयानो॥
चतुर्भुज विठ्ठल, कैं देखेन डोळा। भक्तांचा जिव्हाळा जीव माझा॥
येणे शोके वाळलो शरीरी।
आठवतो हरी, मी काय सांगू?॥
चारी भुजा उचलोनी क्षेम देईल।
कैं मज नेईल पंढरपुरा॥

 


तर अशी ही परमतत्वाला जिव्हाळा देणारी आणि माऊलीचा कळवळा देणारी नामदेवांची हृदयस्पर्शी अभंगवाणी! त्यांत शब्दांची कसरत नाही की कल्पनेच्या भरार्‍या नाहीत. भक्तिभावाने भारलेल्या, अनुभूतीने हरखलेल्या भक्ताचे ते प्रेमळ सुखसंवाद आहेत. तो काळ अगदी प्राथमिक अशा लोकजागृतीचा होता. नामदेवांची नामसंकीर्तनाची पद्धत अपूर्व, भावविभोर आणि परिणामकारक होती. आपल्या अभंगातून, कीर्तनातून त्यांनी नुसती सर्वसामान्य दिशा दाखविली. सबंध मार्ग आखून दिला नाही. प्रत्येक व्यक्तीला आपापल्या स्वभावानुसार कोणताही मार्ग स्वीकारण्याची मोकळीक होती. या अर्थाने आपापले व्यवसाय निर्वेधपणे चालू ठेवून सर्व सामाजिक जीवनाचा स्तर उंचावण्याची खटपट त्यांनी केली, यातच त्यांचे मोठेपण, श्रेष्ठत्व सामावले आहे.

 
समारोप

 


तत्कालीन समाजात असलेली लौकिक जीवनातील विषमता नाहीशी करणे संतांच्या हाती नव्हते. समाजाभोवती असलेल्या कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक तटबंद्या भेदणे हे सोपे काम नव्हते. त्याकाळातील ही पोलादी चौकट तोडण्याची त्यांच्यात ताकद नव्हती व परिस्थितीही अनुकूल नव्हती. त्यावेळच्या भौतिक परिस्थितीवर त्यांचा ताबा नसल्यामुळे त्यांनी आंतरिक स्थिती बदलण्याची धडपड केली. म्हणून सामाजिक प्रश्नांच्या वाटेला न जाता , जमिनीवरील वास्तव स्वीकारून तत्कालीन संतांनी धार्मिक, पारलौकिक क्षेत्राकडेच आपली दृष्टी वळवली. त्यांनी समता व बंधुभाव तसे ईश्वरासमोर सारे सारखे या तत्वांचा पाठपुरावा करून सामाजिक प्रश्नांची धार कमी करण्याचा प्रयत्न केला. संतांच्या या कार्यात संत नामदेवांचे स्थान महत्त्वाचे व योगदान मोठे होते. त्यांच्या या अलौकिक कार्याला त्यांच्या १८ जुलैच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
 
 

 

- प्रा. श्याम अत्रे

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.