शनीदेवांच्या दरबारात भ्रष्टाचारी मोकाट ; शनी शिंगणापूर देवस्थान विश्वस्तांकडून बनावट अॅपद्वारे भाविकांची फसवणूक

    11-Jul-2025   
Total Views | 16

मुंबई
: अन्याय करणाऱ्याला शनिदेव शिक्षा करतात अशी श्रध्दा आहे. शनी शिंगणापूरात कधी चोरी होत नाही म्हणून तेथील घरांना दरवाजे नाहीत. पण शनी शिंगणापूर देवस्थानातील विश्वस्तच देवाची फसवणूक करून उजळ माथ्याने मिरवत आहेत. शनी शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तांनी देवस्थानात सुमारे अडीच हजार बोगस कर्मचारी दाखवून हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे समोर आले आहे. पूजाविधीचे बोगस अॅप तयार करून त्या माध्यमातूनही भाविकांकडून कोट्यवधी रुपये उकळले जात असल्याची धक्कादायक माहिती शुक्रवार, दि. ११ जुलै रोजी विधानसभेत देण्यात आली.

शिवसेना आमदार विठ्ठल लंघे यांनी यासंदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. शनी शिंगणापूर देवस्थानात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. विश्वस्त मंडळातील सदस्यांकडून बनावट अॅप तयार करून दोन लाखांपेक्षा जास्त भाविकांकडून पूजाविधीच्या नावाखाली प्रत्येकी १ हजार ८०० रुपये घेतले जातात. जून महिन्यात अशा पध्दतीने भाविकांकडून ३६ कोटींपेक्षा जास्त रुपये उकळून त्यांची फसवणूक करण्यात आली, असे आमदार लंघे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. बनावट क्यूआर कोड व पावत्या छापणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या लक्षवेधीला उत्तर देताना यासंदर्भात नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालाचा दाखला दिला. अडीचशे ते पावणेतीनशे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शनी शिंगणापूर देवस्थानचा कारभार चालत होता. परंतु विश्वस्तांनी २ हजार ४७४ बोगस कर्मचारी भरती केले, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्याचा तपशीलच सादर केला. देवस्थानाच्या रुग्णालयात ३२७ कर्मचारी काम करतात असे दाखवले गेले परंतु प्रत्यक्ष तपासणीत तिथे फक्त ४ डॉक्टर आणि ९ कर्मचारीच आढळले. कोणताही बगिचा नसताना बगिच्यासाठी ८० कर्मचारी दाखवले. १०९ खोल्यांच्या भक्तनिवासात २०० कर्मचारी कार्यरत असल्याचे दाखवले गेले परंतु कुणीही आढळून आले नाही. देणगी स्वीकारण्यास ८, तर तेल विक्रीसाठी ४ असे बारा कर्मचारी दाखवले गेले पण काऊंटरवर फक्त २ कर्मचारीच काम करताना आढळले. पार्किंगमध्ये १३ गाड्यांसाठी १६३ कर्मचारी दाखवले प्रत्यक्षात १३ कर्मचारीच आढळले.
वृक्ष संवर्धन विभागात ८३ कर्मचारी दाखवले पण एकही नव्हता. शेती विभागात ३५ एकर जमिन आहे तिथे ६५ कर्मचारी, पाणीपुरवठा विभागात १८० दाखवले गेले पण त्यांचे काहीच अस्तित्व नाही. गोशाळेत ८२ कर्मचारी दाखवून त्यातील २४ कर्मचारी रात्री १ वाजेपर्यंत काम करतात असे दाखवले गेले. पार्किंग जागेच्या स्वच्छतेसाठी ११८ कर्मचारी, सुरक्षा विभागात ३१५, प्रसादालयात ९७ कर्मचारी दाखवले गेले पण परंतु कोणाचाही मस्टर किंवा हजेरीपट आढळला नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांच्या खात्यात दरमहा पैसे

विश्वस्तांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना बँक खाती उघडायला लावली आणि मंदिराच्या अकाऊंटमधून त्यांच्या अकाऊंटमध्ये पगार म्हणून दरमहा पैसे जातात, असेही अहवालातून समोर आले. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून, विश्वस्तांच्या मालमत्तेचीही चौकशी होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले. याप्रकरणी अंतिम सुनावणी धर्मादाय आयुक्त घेत आहेत. एफआयआर दाखल करण्यासह मंदिर विश्वस्तांच्या मालमत्तेचीही चौकशी केली जाईल. मंदिराच्या नकली अॅप प्रकरणी सायबर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी आणि पंढरपूर देवस्थानप्रमाणे शनी शिंगणापूर देवस्थानमध्येही समिती नेमण्याबद्दल निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

विश्वस्तांकडून कोट्यवधींची मालमत्ता खरेदी

आमदार सुरेश धस यांनी शनी शिंगणापूर मंदिराच्या बोगस अॅपमध्ये ५०० कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा झाली असल्याचे सांगतानाच मंदिराच्या विश्वस्तांकडून दरमहा १०-२० कोटींची मालमत्ता विकत घेतली जाते असा आरोप केला. विश्वस्त मंडळ बरखास्त करा अशी मागणीही त्यांनी केली.

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121