‘पद्मश्री’ श्रीकांत किदंबी

    दिनांक  10-Jul-2020 22:40:42   
|


Srikanth Kadambi_1 &
 

भारतीय बॅडमिंटनपटू श्रीकांत किदंबी याची नुकतीच ‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली. त्यानिमित्ताने त्याच्या प्रेरणादायी प्रवासाचा घेतलेला हा मागोवा...
 

क्रीडा क्षेत्रात अटकेपार भारताचा झेंडा रोवणार्‍या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी सरकारकडून ‘अर्जुन’, ‘खेलरत्न’ या मानांच्या पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. भारतीय बॅडमिंटन संघातही असाच एक खेळाडू आहे, ज्याने आजारावर मात करत बॅडमिंटनमध्ये पहिले स्थान गाठले आणि भारतीय बॅडमिंटन इतिहासात स्वतःचे नाव अजरामर केले. तो खेळाडू म्हणजे श्रीकांत किदंबी. एकीकडे चीन, सिंगापूरसारख्या देशातील खेळाडूंचे बॅडमिंटनमध्ये वर्चस्व होते. मात्र, श्रीकांतने उत्कृष्ट कामगिरी करत जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत पहिले स्थान गाठले आणि युरोपियन देशांच्या वर्चस्वाला तडा दिला. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू ठरला. मात्र, मृत्यूच्या दाढेतून बाहेर येत त्याने स्वतःच्या खेळामध्ये आणखी सुधारणा आणत अव्वल स्थान गाठले. जाणून घेऊया त्याच्या या संघर्षाबद्दल...

 
श्रीकांत किदंबी याचा जन्म ७ फेब्रुवारी, १९९३ रोजी आंध्र प्रदेशच्या रवुलापलेम येथे झाला. एका सामान्य घरामध्ये जन्मलेल्या श्रीकांतचे वडील हे शेतकरी होते. तशी घरची परिस्थिती चांगली होती. श्रीकांत आणि त्याचा मोठा भाऊ के. नंदगोपाल या दोघांनाही बॅडमिंटनमध्ये रस होता. या खेळामधील त्यांची क्षमता ओळखून त्यांच्या वडिलांनी ही आवड गंभीरपणे घेत प्रशिक्षणासाठी हैद्राबादमध्ये पाठवले. गुंटूरच्या त्यांच्या घरापासून जवळजवळ ३०० किमी लांब असलेल्या गाचीबावलीमध्ये गोपीचंद अकादमीत प्रवेश घेतला. प्रशिक्षण केंद्रापासून घर लांब असल्याने अकादमीलाच घर मानले. उंचपुर्‍या श्रीकांतच्या खेळामध्ये एक वेगळी चमक होती, जी त्याचे प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी नेमकी हेरली. गोपीचंद यांनी त्याला एकेरीमध्ये खेळण्यास प्रोत्साहन दिले आणि तो निर्णय योग्यही ठरला. त्याने एकेरी म्हणजे ‘सिंगल्स’ या प्रकारामध्ये खेळण्यास सुरुवात केली. २०११ मध्ये ‘कॉमनवेल्थ युथ गेम्स’मध्ये मिश्र दुहेरीमध्ये स्पर्धेत त्याने रौप्यपदक आणि दुहेरीत कांस्यपदक पटकावले. त्याचवर्षी श्रीकांतने ‘ऑल इंडिया ज्युनिअर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन’ स्पर्धेमध्ये एकेरी आणि दुहेरी अशा दोन्ही प्रकारामध्ये विजय मिळवला. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. पुढे २०१२ मध्ये मालदीव येथे झालेली ‘मालदीव आंतरराष्ट्रीय चॅलेंज’ स्पर्धा जिंकून, त्याने ‘ज्युनिअर विश्व चॅम्पियन’ बनण्याचा मान पटकावला. त्यानंतर पुढे २०१३ मध्ये ‘थायलंड ओपन ग्रांप्री गोल्ड इव्हेंट’ स्पर्धेमध्ये जागतिक क्रमवारीत आठव्या स्थान असलेल्या बुन्साक पोन्स्नाचा पराभव करून ‘पुरुष एकेरी’चे शीर्षक स्वतःच्या नावावर केले. याच वर्षी दिल्लीमध्ये होणार्‍या ‘अखिल भारतीय ज्येष्ठ राष्ट्रीय स्पर्धे’त ऑलिम्पियन पारुपल्ली कश्यपचा पराभव करून ‘प्रथम वरिष्ठ राष्ट्रीय’ ही पदवी स्वतःच्या नावावर केली.
 
२०१४ हे वर्ष श्रीकांत किदंबीच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे वर्ष ठरले. जुलैमध्ये श्रीकांत सरावादरम्यान चक्कर येऊन कोसळला. त्याला लगेचच रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आणि डॉक्टरांनी त्याला ‘मेनिनजायटीस’ अर्थात मेंदूच्या संसर्गजन्य तापाने ग्रासले असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, शुद्धीवर आल्यानंतर तो अकादमीतल्या सहकार्‍यांना ओळखूही शकला नाही. काही उपचारानंतर तो बरा झाला, मात्र सर्व काही चांगले चालू असताना आलेल्या या संकटामुळे त्याचे कुटुंबीय मात्र त्रस्त झाले होते. परंतु, तीव्र इच्छाशक्तीसह त्याने पुन्हा एकदा बॅडमिंटन कोर्टमध्ये पाऊल ठेवले आणि रॅकेट हातात घेतले. मात्र, नुकतेच आजारपणातून बाहेर पडलेल्या श्रीकांतचा खेळ पुन्हा पहिल्यासारखा होईल का, याकडचे सर्वांचे लक्ष होते. मात्र, चार महिन्यांच्या विश्रांतीनंतरही श्रीकांतने पुन्हा चांगल्या खेळाला सुरुवात केली. लखनौमध्ये झालेल्या ‘इंडियन ओपन ग्रॅण्ड प्रिक्स गोल्ड स्पर्धे’मध्ये त्याने दुसरा क्रमांक पटकावला. नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये ‘चीन ओपन सुपर सीरिज प्रीमियर’ स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पाचवेळा विश्वविजेता राहिलेला लीन डेनला सरळ सेटमध्ये पराभूत करत ‘सुपर सीरिज प्रीमियर मेन’चे शीर्षक त्याने स्वतःच्या नावावर केले. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. राष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय संघाचे यशस्वी प्रतिनिधित्व, यामुळे श्रीकांत किदंबी हे नाव देशभरात प्रचलित झाले. २०१८ मध्ये त्याने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान गाठले. या एकाच वर्षामध्ये त्याने चार ‘सुपर सीरिज’ स्पर्धांचे जेतेपदे पटकावण्याचा पराक्रम केला. बॅडमिंटनमध्ये अशी कामगिरी कारण तो पहिला भारतीय पुरुष ठरला. कमी वयामध्ये गाठलेला हा त्याचा उच्चांक अनेकांसमोर आदर्श आहे. याचवर्षी त्याला ‘पद्मश्री पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. याचवर्षी आंध्र प्रदेश सरकारने त्याची निवड गुंटूर जिल्ह्याचा उपजिल्हाधिकारी म्हणून केली. याचप्रमाणे २०२० मध्ये त्याच्या नावाची शिफारस ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा’साठी करण्यात आली आहे. त्याची कामगिरी अशीच यशस्वीपणे चालू राहो यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा...!
 
 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.