१२ वैदिक साहित्यातील लढाया - दाशराज्ञ युद्ध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2020
Total Views |

the ten kings war_1 


आर्यांनी बाहेरून येऊन भारत जिंकल्याच्या त्या तथाकथित विजयाचा इतिहास वेदात कुठे ना कुठे नोंदवला असेलच आणि त्यातून मोर्टिमर व्हीलरचे गृहीतक कुठेतरी सिद्ध होईलच, अशा वेड्या आशेने आपण मागच्या लेखापासून वेदातील लढायांचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यात आधी ऋग्वेदातील ‘इंद्र-वृत्र’ लढाईचे वर्णन आपण पाहिले. त्यातून आर्यांचे भारतावरील आक्रमण कुठेच सिद्ध होत नाही, हे ही पाहिले. ऋग्वेदात अशा लढायांची वर्णने यापुढे शोधायला गेले, की अजून एक मोठी लढाई पुन्हा पुन्हा दिसत राहते. वैदिक साहित्यात ‘दाशराज्ञ युद्ध’ (Battle of Ten Kings) या नावाने ती प्रसिद्ध आहे. नावावरून लक्षात येते तशी ही ‘दहा राजांमधले युद्ध’ सांगणारी एक अतिशय रोचक कथा आहे. कोण होते हे दहा राजे आणि कसे घडले हे युद्ध?

 

दाशराज्ञ युद्ध: या युद्धकथेतील अनेक पात्रे ऋग्वेदात अनेक ठिकाणी आपल्याला दिसतात. प्रामुख्याने वसिष्ठ ऋषींची सूक्ते संकलित केलेल्या ऋग्वेदाच्या ७व्या मंडलात ही युद्धकथा तुकड्या-तुकड्यांनी (ऋग्वेद ७.१८, ७.३३, ७.८३, आणि इतरत्र) आलेली दिसते. विश्वामित्रांच्या ३ऱ्या मंडलात सुद्धा या कथेचे तुरळक निर्देश दिसतात. वसिष्ठांच्या या सूक्तांची देवता मुळात ‘इंद्र’ किंवा ‘इंद्रावरुण’ अशी आहे, अर्थात यात इंद्राच्या पराक्रमाचीच स्तुती केलेली आहे. या कथेनुसार उत्तर भारताच्या पाच नद्यांच्या (पंचनद) प्रदेशात ‘इक्ष्वाकु’ वंशाचा ‘तृत्सु’ राजा ‘सुदास’ राज्य करत होता. याच्या पित्याचे नाव ‘पिजवन’. वसिष्ठ ऋषी त्याचे गुरू किंवा राजपुरोहित होते, तसेच विश्वामित्र ऋषी सुद्धा त्याचे मार्गदर्शक होते, असे ऋग्वेदात अन्यत्र असलेल्या काही उल्लेखांवरून दिसते. पश्चिमेकडे ‘परुष्णी’ नदीपासून (आजची रावी नदी, पंजाब) ते पूर्वेला बहुधा ‘यमुना’ नदीपर्यंत सुदासाचे राज्य पसरलेले होते, असे कथेवरून दिसते. त्याच्या राज्याच्या अवतीभवती असलेल्या काही राजांनी संगनमत करून एकदा त्याला युद्धात घेरले.

 
“दाशराज्ञे परियत्ताय विश्वतः सुदास इन्द्रावरुणावशिक्षतम् । श्वित्यञ्चो यत्र नमसा कपर्दिनो धिया धीवन्तो असपन्त तृत्सवः ॥” दहा राजांनी सुदासाला सगळीकडून घेरले होते. तेव्हा हे इंद्रवरुणांनो, तुम्ही त्याला बळ दिले, बचावाच्या युक्त्या शिकवल्या. निर्मळ मनाचे, जटाधारी आणि बुद्धिमान् तृत्सू सुदासाच्या सोबत होते. त्यांनी आपल्या प्रार्थनेने हे घडवून आणले ॥ ऋग्वेद ७.८३.८ ॥
 

सुदासाचे हे शत्रू दहा असावेत, असे या वर्णनावरून वाटते खरे, पण या एकूण राजांची संख्या मोजायला गेले तर ती निदान चौदा तरी भरते. तुर्वश, यक्षु, मत्स्य, भृगु, द्रुह्यु, पक्थस्, भलानस्, अलिनस्, शिवस्, अजस्, शिग्रु, अनु, कवष, पणि हे राजे आणि यांशिवाय विकर्ण नामक देशाचे काही लोक (वैकर्णि) – अशी सुदासाच्या शत्रूंची मोठी यादी तुकड्या-तुकड्यांनी विखुरलेली सापडते.

 
“पुरोळा इत्तुर्वशो यक्षुरासीद्राये मत्स्यासो निशिता अपीव । श्रुष्टिं चक्रुर्भृगवो द्रुह्यवश्च सखा सखायमतरद्विषूचोः ॥६॥ आ पक्थासो भलानसो भनन्तालिनासो विषाणिनः शिवासः । आ योऽनयत्सधमा आर्यस्य गव्या तृत्सुभ्यो अजगन्युधा नॄन् ॥७॥” सर्वांच्या पुढे जाऊ पाहणारे तुर्वश, यक्षु, मत्स्य, भृगु, द्रुह्यु, इत्यादि जण धन-ऐश्वर्य मिळवण्यासाठी स्पर्धा करत होते. त्यात इंद्राने सुदासाचा मित्र होऊन तुर्वश आदींचा नाश केला, तर सुदासाचे रक्षण केले. पक्थस्, भलानस्, अलिनस्, शिवस्, इत्यादि गोधनाची चोरी करणाऱ्या लोकांचा सुद्धा इंद्राने असाच नाश घडवून आणला ॥ ऋग्वेद ७.१८.६-७ ॥

या सर्व राजांची राज्ये भौगोलिक दृष्ट्या आज नेमकी कुठे येतात, हे निश्चितपणे सांगता येत नाही. या बाबतीत विद्वानांमध्ये बरेच मतभेद आहेत. शिवाय यावर नवनवीन मते आजही येत असतात. परंतु तृत्सु राज्याच्या अवतीभवतीच ही राज्ये असावीत, हे मात्र तर्काने सांगता येते. सूक्तकार वसिष्ठांना इथे बहुधा ‘दहा प्रमुख राजे’ असे सांगायचे असावे, किंवा या युद्धात यांच्यापैकी कुणा दहा राजांनी सुदासाला एका वेळी घेरलेले असावे, असे सांगायचे असावे. पण यापैकी काहीही मानले, तरी हा सुदास राजा या सर्व शत्रूंना पुरून उरला होता, हे मात्र नक्की!

यांच्यापैकी ‘अनु’ हा तर सुदासाच्या बायकोचा भाऊ होता, असेही एका उल्लेखावरून समजते. घरचे भेदी, अस्तनीतले निखारे, वगैरे वर्णनांशी जुळणारी पात्रे त्या काळी सुद्धा होतीच. तर अशा या अनेक राजांनी एकत्र येऊन सुमारे ६६००० हून अधिक सैन्यबळ जमा केले होते. याविरुद्ध सुदासाचे सैन्य मात्र कितपत होते, याचा निश्चित आकडा मिळत नाही.

 
“नि गव्यवोऽनवो द्रुह्यवश्च षष्टिः शता सुषुपुः षट् सहस्रा । षष्टिर्वीरासो अधि षड्दुवोयु विश्वेदिन्द्रस्य वीर्या कृतानि ॥” हे इंद्रा, तुझ्याच कृपेने सुदासाने अनु आणि द्रुह्यु यांच्या सहासष्ट हजार सहासष्ट इतक्या सेनेचे निर्दालन केले ॥ ऋग्वेद ७.१८.१४ ॥
 

या युद्धा दरम्यान एकदा सुदास पूर्वेकडे यमुना नदीपर्यंत गेला. त्याचा अर्थातच काही राजांनी पाठलाग केला. पुन्हा यमुनेच्या काठी सुद्धा लढाई झाली. त्यात मात्र सुदासाचा निर्णायक विजय झाला. बहुतेक शत्रुपक्ष वरचढ होत असल्याचे पाहूनच सुदासाने युद्धाचा पवित्रा बदलला असावा आणि तो मुद्दाम त्याला अनुकूल असलेल्या प्रदेशात - पूर्वेकडे यमुनेकाठी गेला असावा. त्याद्वारे त्याने शत्रूला तिकडे खेचून घेतले असावे आणि तिथेच त्यांचे पारिपत्य सुद्धा केले असावे, असे वाटते. या युद्धात सुदास राजाला वसिष्ठ ऋषींचे प्रमुख मार्गदर्शन मिळालेले दिसते. कारण यानंतर सुदास वसिष्ठांना सोन्याने मढवलेले चार घोडे दान देत आहे, असे वर्णन दिसते. या युद्धातला निर्णायक विजय सुदास राजाला इंद्राच्याच कृपेने मिळाला, अशा भावनेने या सूक्तांमध्ये वसिष्ठांनी इंद्राची स्तुती केलेली दिसते. लेखाची मर्यादा लक्षात घेऊन इथे याहून अधिक उद्धरणे देणे आणि कथेचे अजून तपशीलात वर्णन करणे शक्य नाही. जिज्ञासूंनी हे सगळे मुळातूनच वाचावे.

कथेचे तात्पर्य: इथे ऋग्वेदात युद्धाची अजून एक कथा तर सापडली. पण यात चित्र काय दिसते? या कथेनुसार विजेत्या सुदास राजाचे राज्य परुष्णी (रावी) नदीपासून ते यमुना नदीपर्यंत पसरलेले होते. हा प्रदेश भारतातलाच आहे. अर्थात राजा सुदास हा ‘एतद्देशीय’ राजा आहे, कुणी परकीय आक्रमक नाही. आजकालच्या आंदोलकांच्या दृष्टीने तोच खरा ‘मूलनिवासी’ म्हटला पाहिजे. उलट त्यानेच दहा आक्रमकांना हरविल्याची ही युद्धकथा आहे. आर्य जर परकीय आक्रमक असते आणि त्यांनी जर स्वत:चे साहित्य म्हणून वेदांची निर्मिती केली असती, तर आपला पराभव झाल्याची आणि इथला मूलनिवासी मात्र जिंकल्याची कथा अशी ऋग्वेदात ते स्वत:च कशासाठी लिहितील? इथे ना कुठे परकीय आर्यांचे आक्रमण दिसते, ना कुठे इंद्राने त्याद्वारे केलेला मूलनिवासींचा विध्वंस दिसतो. मोर्टिमर व्हीलरने असा कुठला चष्मा वापरला आणि या गोष्टी वेदातून शोधून काढल्या, हा प्रश्न मात्र इथेही अनुत्तरितच राहतो.

 

- वासुदेव बिडवे

 
@@AUTHORINFO_V1@@