पालीच्या तीन नव्या प्रजातींचा उलगडा !

    दिनांक  01-Jun-2020 19:32:13   
|
gecko _1  H x W

 

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र तेजस ठाकरेंचा शोधकार्यात समावेश

 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू राज्यामधून पालीच्या तीन नव्या प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे. महाराष्ट्रातील चार तरुण उभयसृपशास्त्रज्ञांनी हे शोधकार्य केले. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र तेजस ठाकरे यांचा देखील समावेश आहे. या शोधामुळे पालीच्या 'निम्पास्पिस' (डवार्फ गेको) पोटजातीमध्ये 'बंगारा' या नव्या गटाचा (group) समावेश झाला आहे. तसेच सर्वसाधारपणे पश्चिम घाटात आढळणाऱ्या या पोटजातीमधील पालींचा उलगडा प्रथमच त्याबाहेरील प्रदेशांमधून करण्यात आला आहे. 
 
 

gecko _1  H x W 
 
भारताच्या वन्यजीव संशोधन क्षेत्रामधील उभयसृप संशोधनाचे क्षेत्र देशाच्या जैवविविधतेत भर घालत आहे. देशातील सरीसृपांचा विचार केल्यास आजही या प्रजातींवर संशोधनाचे काम सुरू आहे. गेल्या दशकभरात या जीवांवर अभ्यास करणारी संशोधकांची फळी देशासह महाराष्ट्रात तयार झाली आहे. या कामाअंतर्गत राज्यातील तरुण उभयसृपशास्त्रज्ञ अक्षय खांडेकर, इशान अग्रवाल, शौनक पाल आणि तेजस ठाकरे यांनी तीन नव्या पालींचा उलगडा केला आहे. यामध्ये कर्नाटकातून 'निम्पास्पिस बंगारा', आंध्रप्रदेशामधून 'निम्पास्पिस ग्रेनेटीकोला' आणि तामिळनाडूमधून 'निम्पास्पिस येलेगिरीएन्सिस' या नव्या प्रजाती आहेत. 'जर्नल आॅफ झूलाॅजिकल सिस्टिमॅटिकस अॅण्ड इव्होल्यूशनरी रिसर्च' संशोधनपत्रिकेत आज या शोधाचे वृत्त प्रकाशित झाले. नव्याने उलगडलेल्या या पाली त्या त्या विभागाला प्रदेशनिष्ठ आहेत. म्हणजेच जगभरात केवळ त्याच भूप्रदेशात आढळून येतात. त्यांचा समावेश 'निम्पास्पिस' पोटजातीमध्ये होतो. या पोटजातींमधील पालींची विभागणी सात ते आठ गटांमध्ये होते. आता या शोधकार्याने 'निम्पास्पिस' पोटजातीत 'बंगारा' या नव्या गटाची भर टाकली आहे. सर्वसाधारणपणे गटामध्ये शोधलेल्या पहिल्या जीवाच्या नावावरुन त्या गटाचे नामकरण करण्यात येते.

gecko _1  H x W
 
 
 
 
'निम्पास्पिस बंगारा', 'निम्पास्पिस येलेगिरीएन्सिस' या पाली २०१८ मध्ये आणि 'निम्पास्पिस ग्रेनेटीकोला' ही पाल २०१५ मध्ये आम्हाला आढळून आल्याची माहिती उभयसृपशास्त्रज्ञ अक्षय खांडेकर यांनी 'महा MTB'शी बोलताना दिली. 'निम्पास्पिस बंगारा' ही पाल कर्नाटकामध्ये सोनाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या 'कोलार' जिल्ह्यामध्ये आढळून आली. या पालीच्या शेपटीच्या शेवटी सोनेरी रंगाची छटा आहे आणि कर्नाटकात सोन्याला 'बंगारा', असे म्हटले जात असल्यामुळे रंगावरुन या प्रजातीचे नाव 'निम्पास्पिस बंगारा' ठेवण्यात आले. तर ग्रेनाईटच्या खडकावर 'निम्पास्पिस ग्रेनेटीकोला' ही पाल आढळल्याने खडकाच्या नावावरुन तिचे नामकरण करण्यात आले. आंध्रप्रदेशात प्रथमच 'निम्पास्पिस 'पोटजातीमधील पाल आढळल्याचे खांडेकर यांनी सांगितले. तामिळनाडूमधील 'येलेगीर' या थंड हवेच्या ठिकाणी 'निम्पास्पिस येलागिरीएन्सिस' ही प्रजात सापडल्याने जागेच्या आधारे तिला नाव दिल्याचे खांडेकर म्हणाले. 'निम्पास्पिस' पोटजातीमधील पालींचा अधिवास साधारणपणे पश्चिम घाटमध्ये आहे. मात्र, प्रथमच या पोटजातीमधील पाली पश्चिम घाटाबाहेरील प्रदेशात आढळून आल्या आहेत. पश्चिम घाटामधील त्यांचा अधिवास हा आद्रर्तायुक्त भागांमध्ये असतो. या पाली तीव्र उष्णता सहन करु शकत नाहीत. परंतु, आता या पाली ज्या प्रदेशातून सापडल्या ते उष्ण प्रदेश आहेत. अशा परिस्थितीत तग धरुन राहण्यासाठी त्या ग्रेनाईटच्या खडकांवर अधिवास करत असल्याची नोंद या शोधकार्यामुळे झाली आहे. त्यामुळे खाणकाम किंवा इतर काही विकासकामांमुळे हे खडक नष्ट झाल्यास त्याचा फटका थेट या पालींच्या अधिवासावर बसण्याची शक्यता खांडेकर यांनी व्यक्त केली आहे. 
 

gecko _1  H x W 
 
 

गुणसूत्र आणि आकारशास्त्राच्या आधारे चाचणी
या दोन्ही नव्या प्रजातींची चाचणी 'गुणसूत्र' (डीएनए) आणि 'आकारशास्त्रा'च्या (मोर्फोलाॅजी) आधारे करण्यात आली आहे. या पाली ४० ते ४५ मिमी आकाराच्या आहेत. छोटे किडे आणि अपृष्ठवंशीय प्राणी त्यांचे प्रमुख खाद्य आहे. या तीन नव्या प्रजाती धरुन भारतात निम्पास्पिस पोटजातीत ४५ पालींचा समावेश होतो. तेजस ठाकरे हे ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनमध्ये काम करत असून खांडेकर आणि अग्रवाल या फाऊंडेशनबरोबरच बंगळुरू येथील 'नॅशनल सेंटर फाॅर बायोलाॅजिकल सायन्स इन्स्टिट्यूट ' या संस्थेमध्ये काम करतात. तर शौनक पाल हे 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'मध्ये कार्यरत आहेत.
 

gecko _1  H x W 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.