अविश्वसनीय ! सुसरीने केले १,१०० किमीचे स्थलांतर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2020   
Total Views |
gharila _1  H x
 
 

नेपाळच्या राप्ती ते पश्चिम बंगालमधील हुगळी नदीपर्यत प्रवास

 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - मगरीच्या प्रजातीमधील एका सुसरीने नेपाळ ते पश्चिम बंगालदरम्यान १ हजार १०० किमीचे स्थलांतर केल्याचे समोर आले आहे. 'सुसर संवर्धन कार्यक्रमा'अंतर्गत या सुसरीला नेपाळच्या राप्ती नदीत सोडण्यात आले होते. त्यानंतर ६१ दिवसांनी ही सुसर पश्चिम बंगालमधील हुगळी नदीत मासेमारीच्या जाळ्यात अडकली. 'वाईल्डलाईफ ट्रस्ट आॅफ इंडिया'च्या (डब्लूटीआय) शास्त्रज्ञांनी तिच्या शेपटीवरील विशिष्ट आकारावरुन तिची ओळख पटवली.
 
 
 

gharila _1  H x 
 
 
 
जगातून दुर्मीळ होत असलेल्या प्रजातींच्या यादीत सुसरीचा समावेश होतो. उत्तर भारतातील नद्यांच्या विरळ शाखांमधील नैसर्गिक अधिवासात अंदाजे ६५० सुसरी शिल्लक राहिल्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशातील 'चंबळ अभयारण्या'त मोठ्या संख्येने सुसरींचा अधिवास आहे. त्यानंतर नेपाळमध्ये नारायणी आणि भारतात गंडक नावाने ओळखल्या जाणाऱ्या नदीच्या प्रवाहात सुसरींचा वावर आढळून येतो. स्थलांतर करणाऱ्या प्रजातींच्या अधिसूचनेत सुसरीला 'परिशिष्ट-१' दर्जाचे संरक्षण देण्यात आले आहे. 'डब्लूटीआय' या संस्थेकडून गंगा, घाघरा आणि गंडक नद्यांमध्ये 'सुसर संवर्धन कार्यक्रम' राबविण्यात येत आहेत. 'डब्लूटीआय'च्या संवर्धन विभागाचे प्रमुख डॉ. समीर कुमार सिन्हा यांनी सांगितले की, सुसर ही नेपाळामधून भारतात प्रवाहीत होणाऱ्या नंद्यांमध्ये आंतरदेशीय स्थलांतर करते. 
 
 
 

gharila _1  H x 
 
 
'डब्लूटीआय'च्या शास्त्रज्ञांना नुकतीच नेपाळच्या राप्ती नदीपासून पश्चिम बंगालमधील हुगळी नदीपर्यंत स्थलांतर केलेली एक सुसर आढळून आली आहे. पश्चिम बंगालच्या नाडिया जिल्ह्यातील हुबळी नदीच्या प्रवाहात असलेल्या राणी नगर घाट परिसरात मासेमारीच्या जाळ्यात ही सुसर अडकली. गंडक नदीत सुसर संवर्धनाचे काम करणारे 'डब्लूटीआय'चे जीवशास्त्रज्ञ सुब्रत बेहेरा यांनी तिच्या शेपटीवरील विशिष्ट आकारावरुन तिची ओळख पटवली. प्रत्येक सुसरीच्या शेपटीवरील उभार वेेगवेगळे असतात. त्यावरुन त्यांची ओळख पटवली जाते. नेपाळच्या 'चितवन राष्ट्रीय उद्याना'तील 'ससुर संवर्धन आणि प्रजनन केंद्रा'तून राप्ती नदीच्या प्रवाहात या सुसरीला संशोधक बेद बहादूर खडका यांनी सोडले होते. त्यावेळी तिच्या शेपटीवरील उभारांच्या आकाराचे छायाचित्र त्यांनी बेेहेरा यांना पाठवले होते. या छायाचित्रांवरुन बेहेरा यांनी या सुसरीची ओळख पटवली. बेहेरा यांनी सांगितले की, या सुसरीला राप्ती नदीत सोडल्यानंतर तिने ६१ दिवासांमध्ये नारायणी (भारतातील गंडक), गंगा, फरक्का आणि हुगळी नदीतून सुमारे १ हजार १०० किमीचे स्थलांतर केले आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@