जावेद मियांची जळफळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2020   
Total Views |

javed miandad_1 &nbs
 


धरण बांधायचे, मग जनतेनेच पैसे द्यावे, कोरोनाशी सरकारला लढायचे आहे, तरी जनतेनेच सरकारला आर्थिक मदत करायची, रुग्णालय जनतेला हवे ना, तर लोकांनीच देणगी द्यायची, अशा चोराच्या उलट्या बोंबा. जनतेचा खिसा आधीच रिकामा, त्यात आता फाटलेला, शिल्लक काही नाही, महागाईचा आगडोंब उसळलेला, पण जावेद मियांसारख्या पाकी श्रीमंतांना मात्र या सगळ्याची नाही, तर अणुबॉम्बचीच चिंता जास्त.



गिलगिट-बाल्टिस्तानमधून पाकिस्तानला ‘चले जाव’चा इशारा दिल्यानंतर पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली आहेच, पण सध्या हाताला कामधंदा नसणार्‍या पाकिस्तानच्या आजी-माजी क्रिकेटपटूंचेही वांदे झालेले दिसतात. म्हणूनच कधी शोएब अख्तर तर कधी शाहीद आफ्रिदी क्रिकेटच्या पलीकडे जाऊन भारताला अक्कल पाजळायला जातात आणि तोंडावर आपटतात. पण, ही पाकड्यांची जुनीच खोड. कारण, काश्मीरचा भारतविरोधी राग आळवला की आपण पाकिस्तानात देशभक्त, ‘सच्चा पाकिस्तानी’ वगैरे ठरतो आणि आवामही आपल्याला डोक्यावर उचलून नाचते, हे पाकिस्तानच्या प्रत्येक आजी-माजी क्रिकेटपटूला चांगलेच ठाऊक आहे. म्हणूनच अधूनमधून आता याच क्रिकेट कप्तानीकडून देशाची कप्तानी स्वीकारणार्‍या पंतप्रधान इमरान खान यांना खूश करण्यासाठी असला लाळघोटेपणा काही आजी-माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा सुरुच असतो. त्यात मग पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार जावेद मियांदाद तरी कसे मागे राहतील म्हणा. यापूर्वीही क्रिकेट सोडून काश्मीरवरून भडकाऊ विधाने जावेद मियांनी केली आहेतच. ते साहजिकच, कारण जावेद मियां फक्त पाकिस्तानचे सगे नाहीत, तर पाकिस्तानात लपलेल्या भारतातील मॉस्टवॉण्डेट दाऊद इब्राहिमशी त्यांचे अगदी घरगुती अन् घनिष्ट संबंध. पण, सध्या पाकिस्तानची कडकी सुरु आहे. अर्थव्यवस्था मरणासन्न अवस्थेत, तर कोरोनाने पाकिस्तानची अधिकच कोंडी केलेली दिसते. अशात आगामी काही काळातही पाकिस्तानी नेतृत्वाला अर्थव्यवस्था सावरता येईल, हे जवळपास अशक्यच. चीन असो सौदी अरेबिया, अथवा ‘आयएमएफ’, यांच्याकडून आणखीन आर्थिक साहाय्य पदरी पडायचीही शक्यता तशी धुसरच. या अशा स्थितीतही कोणे एकेकाळी क्रिकेटचे मैदान गाजवणार्‍या जावेद मियांना काळजी आहे ती मात्र पाकिस्तानी अणवस्त्रांची!


जावेद मियांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्या व्हिडिओत जावेद मियां म्हणतात की, आयएमएफ आणि इतर जागतिक अर्थसंस्थांचे कर्ज जर आपण फेडले नाही, तर ते आपला अणुबॉम्ब जप्त करतील. एवढेच नाही तर जावेद मियांनी असे होऊ नये म्हणून एका बँक खात्यात पाकिस्तानींना मदतनिधी जमा करण्याचे आवाहनही करुन टाकले. आपले अणुबॉम्ब हातचे जातील, ही भीती पाकिस्तानी जनतेच्या मनात ठासवून गल्ला भरण्याचाच हा जावेद मियांचा नवीन धंदा. हे असे करण्याची पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूवर वेळ यावी, यातच सर्व काही आले म्हणा. पण, जेव्हापासून इमरान खान पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत, तेव्हापासून जनतेसमोर प्रत्येक गोष्टीसाठी पदर पसरवण्याची, चंदा मागण्याची नवीनच परंपरा या ‘नया पाकिस्तान’मध्ये जन्माला आलेली दिसते. धरण बांधायचे, मग जनतेनेच पैसे द्यावे, कोरोनाशी सरकारला लढायचे आहे, तरी जनतेनेच सरकारला आर्थिक मदत करायची, रुग्णालय जनतेला हवे ना, तर लोकांनीच देणगी द्यायची, अशा चोराच्या उलट्या बोंबा.
 

जनतेचा खिसा आधीच रिकामा, त्यात आता फाटलेला, शिल्लक काही नाही, महागाईचा आगडोंब उसळलेला, पण जावेद मियांसारख्या पाकी श्रीमंतांना मात्र या सगळ्याची नाही, तर अणुबॉम्बचीच चिंता जास्त. अणुबॉम्ब जप्त केले तर पाकिस्तान भारतासमोर कमजोर पडेल. भारत पाकिस्तानवर आक्रमण करेल. त्याचे तुकडे पाडेल, हीच भीती जनतेच्या मनात आजवर येथील राजकारण्यांनी इतकी ठासून भरली आहे की, जनताही या सापळ्यात सहज अडकते आणि मग अशा लोकांचे फावते. जनतेच्याच पैशावर मग सरकारही चालते आणि दहशतवादही पोसला जातो. पण, पाकिस्तानी जनतेने आता डोळ्यांवरची झापडं काढून फेकायची वेळ आली आहे. कुठल्याही देशाचे अणुबॉम्ब जप्त करणे, उद्ध्वस्त करणे हे बंदुकीतून गोळी झाडण्याइतके सोपे नाही. तेव्हा, देशाला वाचवण्याच्या नावाखाली जनतेची अशी धूळफेक पाकिस्तानींनी लक्षात घ्यावी. तसेच जावेद मियांदादला आजवर पाकिस्तानी लोकांना त्याने किती मदत केली, हा जाब विचारावा. तेव्हा जावेद मियां, ऐन रमजानच्या पवित्र महिन्यात स्वत:ची रिकामी झोळी भरण्यासाठी आणि नादान ‘कप्तान’ला खूश करण्यासाठी तरी अण्वस्त्रांच्या आणाभाका खाऊ नका!

 
 
@@AUTHORINFO_V1@@