राजकारण करू नका!

    दिनांक  01-May-2020 20:19:50   
|
Donald Trump_1  
 
 
 
 
 

आपल्या विधानांना जगाने गांभीर्याने घ्यावे असे वाटत असेल तर डोनाल्ड ट्रम्प यांनी याकडे एक संधी म्हणून पाहायला हवे, अन्यथा ट्रम्प यांनी चीनवर आरोप करून उलट निर्दोष सिद्ध करण्यात साहाय्य केले असे म्हणावे लागेल. 


आपल्या वैविध्यपूर्ण वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर निशाणा साधून नव्या वादाला जन्म दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प गेले अनेक दिवस कोरोना विषाणूसाठी चीनला जबाबदार धरतात. विषाणूचा उल्लेखही ’चिनी कोरोना व्हायरस’ असा ते करत होते. हे जैविक युद्ध असून त्याकरिता चीनने मुद्दाम असा विषाणू बनवला, हा दावाही अनेक दिग्गजांनी केला आहे. चीनचे याविषयातील वर्तनही संशयास्पद आहेच. त्याचे कारण अमेरिकेतील तज्ज्ञांच्या एका समूहाला अभ्यास-परीक्षणासाठी चीनला जायचे होते. चीन सरकारने त्याकरिता परवानगी नाकारली. तसेच, या रोगाविषयीची माहिती चीनने जागतिक आरोग्य संघटनेला कळवली नव्हती. असे अनेक मुद्दे चीनला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करतात.

मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी हा विषाणू चीनने स्वतःच्या प्रयोगशाळेत बनवला, असाच आरोप केला आहे. तसेच आमच्या गुप्तचर यंत्रणा याबाबत शोध घेत आहेत, असेही सांगून डोनाल्ड ट्रम्प मोकळे झाले. आता ब्रिटिशप्रायोजित वृत्तसंस्थांनी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांकडे अशी कोणतीही माहिती नसल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा काय सांगू इच्छितात, याबाबत विश्वासार्ह सूत्र डोनाल्ड ट्रम्प हेच असू शकतात. तसेच ब्रिटिश वृत्तसंस्थेला अमेरिकेचा गुप्तचर यंत्रणा माहिती पुरवतात ती खरी असेल कशावरून? दुसर्‍या बाजूला डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष या नात्याने गुप्तचर यंत्रणांची माहिती एखाद्या पत्रकाराला का सांगतील? अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने चीनमधील कथित प्रयोगशाळेचा छडा लावला असला तरी त्या माहितीला जगाची अधिमान्यता कशी लाभणार? अमेरिकन गुप्तचर यंत्रणेला त्याबाबत निर्विवाद पुरावे गोळा करावे लागतील. अमेरिकन गुप्तचर यंत्रणा तसे करू शकल्या, तर या सगळ्या खटाटोपातून काहीतरी साध्य होऊ शकते, अन्यथा बातमी व अंदाज याव्यतिरिक्त यातून काहीच निष्पन्न होणार नाही.

चीनला निर्दोष करार देण्याचे काही कारण नाही. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याला गांभीर्याने घेण्यात अनेक धोके आहेत. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांना आगामी निवडणुकीला सामोरे जायचे आहे. अमेरिकेच्या राजकारणात राष्ट्रीय शत्रूची भूमिका महत्त्वाची असते. अनेक वर्षे अमेरिकेत रशियाला राष्ट्रीय हितशत्रू समजले जात होते. गेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत ट्रम्प यांना रशियाने मदत केली, असा आरोप क्लिटंन यांच्या गटाकडून झाला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी “चीन मला पराभूत करू इच्छित आहे,” असे विधान नुकतेच केले आहे. त्यामुळे स्वतःच्या राजकीय फायद्यापोटी डोनाल्ड ट्रम्प अशी वक्तव्ये करू शकतात.

पण, त्यांनी चीन व जागतिक आरोग्य संघटनेच्या दुटप्पीपणा विरोधात भूमिका घेतलेली भूमिका ही कौतुकास्पद आहे. तसेच जागतिक आरोग्य नियमनाच्या दृष्टीने चीन हा युद्धगुन्हेगारच आहे. मात्र, त्याबाबत ठोस उपाययोजना व्हायला हव्यात. वरचेवर आरोप करण्याला काही अर्थ नाही. त्यामुळे खर्‍या गुन्हेगारांचा अधिक फायदा होण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा स्वभाव स्वैर वक्तव्य करण्याचा आहे. अमेरिकेतील आगामी निवडणुकांचा विचार केल्यास यात राजकारण होण्याची शक्यता आहे. पण, हा प्रश्न जगाचा आहे. जगातील मानवसमुदायाचे हित याविषयाशी जोडले गेलेले आहे. चीनवरील आरोपात तथ्य आहे. त्या आरोपांच्या मुळाशी जाऊन तपास करण्याची गरज आहे. त्यात पुढाकार आंतरराष्ट्रीय स्तरावर कोण घेणार, हा प्रश्न आहे.


डोनाल्ड ट्रम्प यांनी याविषयात केलेल्या वक्तव्यांनी स्वतःवरची जबाबदारी वाढवली आहे. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी या विषयावर निर्विवाद पुरावे शोधून काढावेत. कारण, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी यात थेट आरोप केले आहेत. तसेच ट्रम्प यांच्या वक्तव्यांचा विचार गंमतीने केला जातो. त्यामुळे आपल्या विधानांना जगाने गांभीर्याने घ्यावे असे वाटत असेल तर डोनाल्ड ट्रम्प यांनी याकडे एक संधी म्हणून पाहायला हवे, अन्यथा ट्रम्प यांनी चीनवर आरोप करून उलट निर्दोष सिद्ध करण्यात साहाय्य केले असे म्हणावे लागेल.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.