'कोरोना' महिलांनाही होतो...

    दिनांक  13-Mar-2020 21:36:39   
|


china corona_1  


चीनमध्ये आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या शांघायच्या जिंयांग जिनजिन या महिलेने एक विदारक सत्य मांडले आहे. तिने समाज माध्यमावर माहिती दिली की, 'कोरोना'ग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी काम करताना विशिष्ट पद्धतीचे कपडे घालावेच लागतात. ते कपडे महिलांसाठी अत्यंत त्रासदायक आहेत.


इंटरनेट आणि जागतिकीकरणाच्या जाळ्याने एक कुटुंब बनलेल्या जगाला 'कोरोना'ने आज दुभंगून टाकले. 'कुणीही कुठेही जाऊ शकते'च्या पार्श्वभूमीवर आज ठराविक देशांना ठराविक देशांमध्ये मात्र 'नो एन्ट्री' आहे. परदेशी पाहुण्यांना 'अतिथी देवो भव'च्या ऐवजी 'अभी नही फिर कभी आना'चे नियम लादले गेले. स्वाभाविकच आहे. प्रत्येक देशावर आपापल्या देशवासीयांच्या जीविताची जबाबदारी आहे. काळजी म्हणून सगळे करावेच लागते. थोडक्यात, 'कोरोना'ने जगभरात हाहाकार माजवला आहे. चीन, इराण आणि इटली त्याची केंद्रे झाली आहेत, तर गरीब म्हणू नका श्रीमंत म्हणू नका, लहान म्हणू नका थोर म्हणू नका, 'कोरोना'चा कहर सगळीकडे झाला आहे. काही खेळाडू, अभिनेते, राजकारणी यांनाही 'कोरोना'ने गाठले आहे. आजाराच्या भीतीने मानवी जीवनात किती गुंतागुंत झाली, याचे एक दु:खद महाकाव्यच बनेल. हे सगळे आठवण्याचे कारण की, चीनमध्ये 'कोरोना'च्या रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर्स त्यांची मनस्थिती कशी असेल? मनाचे सोडा, त्यांची दैनंदिन परिस्थिती कशी असेल, यावर प्रकाश टाकणारी नुकतीच एक घटना घडली.

 

चीनमध्ये आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या शांघायच्या जिंयांग जिनजिन या महिलेने एक विदारक सत्य मांडले आहे. तिने समाज माध्यमावर माहिती दिली की, 'कोरोना'ग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी काम करताना विशिष्ट पद्धतीचे कपडे घालावेच लागतात. ते कपडे महिलांसाठी अत्यंत त्रासदायक आहेत. आता कुणी म्हणेल की, या बायकांना इथेही फॅशनचे आणि मॅचिंगचे कपडे हवे असतील. पण तसे नाही. हे कपडे त्रासदायक का आहेत, हे सांगताना जिंयांग म्हणते की, हे कपडे घालून पाणी पिणे किंवा जेवणे हे स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही त्रासदायकच आहे. पण, महिलांसाठी त्रासदायक यासाठी की, मासिक पाळीच्या वेळी या कपड्यामुळे खूपच त्रास होतो. सॅनिटरी पॅड वापरणे, बदलणे या गोष्टी शक्य होत नाहीत. त्यामुळे त्रास होतो. तिच्या माहितीवर एकाने प्रसारमाध्यमांवर मत व्यक्त केले की, 'इथे माणसे मरत आहेत आणि तुला हे सगळे पडले आहे.' ढोबळमानाने पाहिले तर या व्यक्तीने व्यक्त केलेले मत योग्यही वाटेल. पण, एक मुलगी, एक महिलाच केवळ जिंयांगचे म्हणणे चांगल्या प्रकारे समजू शकते. यावर काही महिला कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, 'कोरोना'चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तयार केलेला विशिष्ट पोशाख हा 'कॉम्रेड'नी तयार केला आहे. (इथे पुरुषांना सर्रास 'कॉम्रेड' म्हटले जाते. कारण, कम्युनिस्ट राजवट आहे.) हे मत मांडणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, पुरुषांनी हा पोशाख बनवल्यामुळे एका महिलेला या पोशाखामुळे काय त्रास होऊ शकतो, याची जाणीव त्यांना नसणार.

 

ही एक चर्चा म्हणूनही आपण पाहू शकतो. पण, 'कोरोना'च्या निमित्ताने चीनमध्ये महिलांचे स्थान काय आहे, हे पाहू. आज चीनमध्ये सॅनिटरी पॅडचाही तुटवडा निर्माण झाला आहे. चीनमधल्या महिला कार्यकर्त्यांचा आक्षेप आहे की, चीनमध्ये 'कोरोना'च्या आणीबाणीग्रस्त परिस्थितीमध्ये अनेक जीवनावश्यक वस्तूंची टंचाई भासत आहे. चीनने अत्यावश्यक गोष्टींची यादी बनवून त्या वस्तू तातडीने मागवण्याची व्यवस्थाही केली आहे. पण, महिलांसाठी अत्याश्यक असूनही त्या यादीमध्ये सॅनिटरी पॅडचा समावेश नाही. तसेच, अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या महिलांना जास्त काळ सार्वजनिक शौचालयाचा किंवा कार्यालयीन शौचालयाचा वापर करावा लागतो. सॅनिटरी पॅडचा वापर केल्यामुळे अस्वच्छता वाढते, तसेच मासिक पाळीमुळे कर्मचारी महिलांच्या एकंदर दैनंदिन कामावरही परिणाम होतो. यावर तेथील काही आस्थापनांकडून सांगितले जात आहे की, हे सगळे सहन करण्यापेक्षा महिलांनी मासिक पाळी पुढे जाण्याच्या गोळ्या खाव्यात. मग त्यांना हे सगळे सहन करावे लागणार नाही. त्यासाठी काही आस्थापनांकडून महिलांना या गोळ्याही देण्यात आल्या आहेत. गोळ्या घेण्यासाठी सक्ती जरी नसली तरी भक्कम सूचना मात्र आहेत. अर्थात, यावर चीनच्या महिलांनी आवाज उठवला आहे. त्यांचे म्हणणे आहे, 'कोरोना'च्या उत्पातामध्ये त्यांचे स्त्रीत्व तर बदलणार नाही. 'कोरोना'शी लढण्यासाठी जर जगण्यात बदल करायचा असेल तर त्यात महिलांच्या दृष्टीनेही विचार करायला हवा. कारण, 'कोरोना' केवळ पुरुषांना नाही, तर महिलांनाही होतो. त्यामुळे या महिलांचे म्हणणे हे विचारात घ्यायलाच हवे.

 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.