‘सावली प्रतिष्ठान’ दिवाळी संमेलन

    दिनांक  17-Nov-2020 22:53:22
|

pg_1  H x W: 0
विक्रोळी येथे ‘सावली प्रतिष्ठान’ वस्ती पातळीवर कार्यरत आहे. सेवावस्तीतील मुलांचे शिक्षण आणि आरोग्य यावर संस्था काम करते. कोरोना काळातही या संस्थेने सेवाकार्य केले. दि. 16 नोव्हेंबर रोजी भाऊबीज आणि पाडवा हा मुहूर्त साधत ‘सावली प्रतिष्ठान’ने परिसरातील बाल गोपालांसाठी स्नेहमेळा आयोजित केला होता. त्या स्नेहमेळाव्याचा घेतलेला आढावा.
 
 
भाऊबीज आणि पाडवा एकत्रच. दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा. पण कोरोनाचे सावट दिवाळीवरही आहे. वस्त्यांमध्ये वरकरणी जरी कोरोनाचे सावट दिसत नसले तरी आतून मात्र कोरोनाची भीती कायमच आहे. सण आले की पारंपरिक पद्धतीने सणवार साजरे करण्यासाठी लोकांची झुंबड उडते. आताही दिवाळीनिमित्त लोक कोरोना वगैरे भीती झुगारून रस्त्यावर उतरले. पण त्यात एक शिस्तबद्धपणा होता. मास्क वगैरे लावूनच लोक दिवाळीची खरेदी करत होते. तेच वातावरण विक्रोळीच्या टागोर नगरमध्येही होते.
 
 
काही महिन्यांपूर्वी या परिसरामध्ये आणि आजूबाजूला कोरोनामुळे हाहा:कार उडाला होता. कित्येकांचे अकाली मृत्यू झाले होते, तर कित्येक जण क्वारंटाईन झाले होते. कित्येक जण गावी गेले होते. एकंदर मार्च ते काल-परवापर्यंत या परिसरामध्ये कोरोनाचे सावट होतेच होते. अशा वातावरणात शाळा बंद आणि कामधंदेही बंद. वस्तीतील मुलाबाळांना घरात एकप्रकारे कैदच होती. शाळेत जावे, बाहेर खेळावे, आई-बाबांसोबत बाजारात जावे वगैरे या गोष्टी बंदच झालेल्या. अभ्यासही ऑनलाईन, अशा परिस्थितीमध्ये मुलांच्या जीवनावर आणि मनावरही याचा गंभीर परिणाम झालेला.
 
 
प्रत्यक्ष दिवाळीमध्येही असेच वातावरण. कोमेजलेल्या वातावरणात टवटवी आणणे गरजेचे होते. त्यामुळे ‘सावली प्रतिष्ठान’ने या मुलांसाठी एक वेगळा उपक्रम आयोजित केला. या मुलांचे स्नेहसंमेलन आयोजित केले. त्याची सर्व रूपरेखा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी मुलांनीच करायची. या स्नेहसंमेलनात काय होणार? कोण काय करणार? ते जेवणासाठी मेनू काय असणार? हे मुलांनीच ठरवले. कुठे करायचे हेसुद्धा मुलांनीच ठरवले. मुलांनी ठरवले की, वस्तीमध्येच मोकळ्या जागेत संमेलन ठेवायचे.
 
 
त्यासाठी आर्थिक मदत आणि इतर मार्गदर्शन ‘सावली फाऊंडेशन’चे अध्यक्ष अनिल देवकुळे आणि त्यांच्या पत्नी कावेरी देवकुळे यांनी केले. अनिल आणि कावेरी हे जोडपे तसे हरहुन्नरी आणि प्रचंड संवेदनशील. परिसरातील कुणाच्याही मदतीला हे जोडपे तत्पर असते. त्यामुळे जेव्हा या संमेलनाची कल्पना मांडली तेव्हा पालकांनी आपल्या पाल्यांना संमती दिली. या संमेलनामध्ये मुलांना प्रेरणादायी मार्गदर्शन तसेच दिवाळी कथा सांगितली गेली. कोरोना जागृतीही केली गेली.
 
 

- मदनमोहन कुशवाहा
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.