पूरग्रस्त जिल्ह्यांमधून पालीच्या दोन नव्या प्रजातींचा शोध

    दिनांक  13-Aug-2019 13:10:53   


 

 

 शोधकार्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरेंचा समावेश


मुंबई (अक्षय मांडवकर) : महाराष्ट्रात आढळणाऱ्या पालींच्या प्रजातींमध्ये आणखी दोन नव्या प्रजातींची भर पडली आहे. पुराने वेढलेल्या सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांमधून या नव्या प्रजातींचा उलगडा करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील तीन तरुण उभयसृपशास्त्रज्ञांना कोयनेच्या खोऱ्यातून 'निमास्पिस कोयनाएन्सिस' आणि आंबा घाटामधून 'निमास्पिस आंबा' या दोन नव्या प्रजाती आढळल्या आहेत. या उभयसृपशास्त्रज्ञांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून आजतागायत पालीच्या 'निम्पास्पिस' पोटजातीमध्ये नऊ नव्या पालींचा शोध लागला आहे.

 

कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला पुराने वेढलेले असताना एक सुखद बातमी समोर आली आहे. राज्यातील तरुण उभयसृपशास्त्रज्ञांनी या दोन जिल्ह्यांमधील  कोयना आणि आंबा घाट परिसरातून पालीच्या दोन नव्या प्रजाती शोधून काढल्या आहेत. देशातील सरीसृपांचा विचार केल्यास आजही या वर्गाबाबत संशोधनाचे काम सुरू आहे. उभयसृपांच्या प्रजातीचे ५० टक्केच वर्गीकरणाचे काम झाल्याने अजूनही या गटात नव्या प्रजातींचा उलगडा होत आहे. आजही केवळ बाहेरील निरीक्षणाच्या आधारावर सरीसृपवर्गात नव्या प्रजाती दिसत असल्याचे संशोधक सांगतात. महत्वाचे म्हणजे गेल्या दशकभरात या जीवांविषयी संशोधनाचे काम करणारी संशोधकांची फळी महाराष्ट्रात तयार झाली आहे. या कामाअंतर्गत राज्यातील उभयसृपशास्त्रात संशोधनकार्य करणारे संशोधक अक्षय खांडेकर, इशान अग्रवाल आणि तेजस ठाकरे यांनी दोन नव्या पालींचा उलगडा केला आहे. यापैकी खांडेकर आणि अग्रवाल हे बंगळुरू येथील 'नॅशनल सेंटर फाॅर बायोलाॅजिकल सायन्स इन्स्टिट्यूट ' या संस्थेत कार्यरत आहेत. संशोधकांना या पाली जून, २०१८ मध्ये आढळून आल्या होत्या. काही महिने अभ्यास केल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्यांनी या पालींवरचा शोध निबंध 'झूटॅक्सा' या आंतरराष्ट्रीय शोध पत्रिकेकडे तपासणीकरिता पाठविला होता. मंगळवारी 'झूटॅक्सा'ने या संशोधनाचे वृत्त प्रकाशित केले. या दोन्ही प्रजाती 'निम्यास्पिस' या पोटजातीमधील आहेत. पालींच्या या पोटजातीमध्ये भारतात सुमारे ३९ प्रजाती आढळतात.

 
 

 
 
नव्याने सापडलेल्या या दोन प्रजाती केवळ पश्चिम घाटातील कोयना आणि आंबा घाटामध्ये सापडत असल्याने त्यांचे नामकरण या भूभागाच्या आधारे केल्याची माहिती संशोधक अक्षय खांडेकर यांनी दै. 'मु्ंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. वन विभागाच्या परवानगीने पश्चिम घाटातील या परिसरातून आम्ही अजून काही पालींच्या नमुन्यांचे संकलन केले आहे. त्यावर संशोधनाचे काम सुरू असून येत्या काळात महाराष्ट्रातून पालीच्या नव्या प्रजातींचा उलगडा होणार असल्याचे खांडेकर यांनी सांगितले. नव्याने सापडलेल्या 'निमास्पिस कोयनाएन्सिस' 'निमास्पिस आंबा' या प्रजाती कोयनेतील 'हुंबर्ली' आणि आंबा घाटातील 'मानोली' परिसरात आढळून आल्या. यांचा वावर विशेषत: जंगलांमध्ये आढळतो. 'निमास्पिस कोयनाएन्सिस' ही प्रजात कोयनेतील सड्यांवर (पठारांवर) तर 'निमास्पिस आंबा' ही आंबा घाटातील झाडांवर व शेवाळ्यांनी भरलेल्या खडकांवर आढळते. त्या कीटकांवर गुजराण करतात. त्यांना यापुढे इंग्रजीमध्ये 'कोयना डवार्फ गेको' आणि 'आंबा डवार्फ गेको' या सर्वसामान्य नावाने संबोधता येईल.


गुणसूत्र आणि आकारशास्त्राच्या आधारे चाचणी

या दोन्ही नव्या प्रजातींची चाचणी 'गुणसूत्र' (डीएनए) आणि 'आकारशास्त्रा'च्या (मोर्फोलाॅजी) आधारे करण्यात आली आहे. गुणसूत्रांच्या आधारे चाचपणी करताना आम्ही 'निमास्पिस' या पोटजातीमधील सर्वच प्रजातींच्या गुणसूत्रांची मांडणी केल्याचे खांडेकर यांनी सांगितले. तर आकाराशास्त्राच्या आधारे निरीक्षण करताना त्यांच्या पोटावरील उभ्या काटेरी खवल्यांच्या संख्येच्या आधारे निरीक्षण करण्यात आले. 'निम्पास्पिस' पोटजातीमधील प्रत्येक पालीच्या पोटीवरील काटेरी उभ्या खवल्यांची संख्या निरनिराळी असते. 'निमास्पिस कोयनाएन्सिस' या प्रजातीमध्ये ही संख्या १२८ ते १३९ च्या दरम्यान तर 'निमास्पिस आंबा' यामध्ये ती १४१ ते १४९ च्या दरम्यान आढळली आहे. या पाली ३० ते ३५ मिमी आकाराच्या आहेत.