'प्लास्टिक सर्जरी' सर्वसामान्यांनाही परवडणारी

    14-Jul-2019
Total Views |१५ जुलै हा दिवस जागतिक 'प्लास्टिक सर्जरी दिन' म्हणून साजरा केला जातो. प्लास्टिक सर्जरीबाबत आजही अनेक गैरसमज आहेत. ती केवळ श्रीमंतांनाच परवडते. सर्वसामान्यांच्या तर ती आवाक्याबाहेरच, असे मानले जाते. मात्र अनेक प्रकारच्या 'प्लास्टिक सर्जरी' या सर्वसामान्यांनाही परवडणार्‍या असून ही शस्त्रक्रिया केवळ श्रीमंतांची हा गैरसमज मिटवण्याची वेळ आली आहे.

 

वैद्यकशास्त्रातील आधुनिक उपचार पद्धतीमुळे आज मानवाचे जीवन सुखकर झाले. अनेक आजारांपासून त्याला मुक्ती मिळाली आहे. नव्या, आधुनिक तंत्रज्ञानाने दुर्धर आजारांवरही उपचार करणे सोपे झाले आहे.'प्लास्टिक सर्जरी' ही अशीच एक आधुनिक उपचार पद्धती आहे. दि. १५ जुलै हा 'जागतिक प्लास्टिक सर्जरी दिन' म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त 'प्लास्टिक सर्जरी'बाबतची माहिती घेताना, त्याविषयीचे गैरसमज दूर होणेही गरजेचे आहे.

 

'प्लास्टिक सर्जरी' फक्त सुंदर दिसण्यासाठी आहे का? 'प्लास्टिक सर्जरी' फक्त श्रीमंतांसाठी आहे का? 'प्लास्टिक सर्जरी'मध्ये प्लास्टिक वापरले जाते का? 'प्लास्टिक सर्जरी' फक्त त्वचा रोग असणार्‍या रुग्णांसाठी असते का? असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडतात. 'प्लास्टिक सर्जरी'बाबत अनेक समज गैरसमज आहे. आजकाल तर समाजमाध्यमांवर काय गैरसमज पसरतील, याचा नेम नाही.

 

'प्लास्टिक सर्जरी'मधील 'प्लास्टिक' हा शब्द ग्रीक या भाषेतून आला आहे. 'प्लास्टिकोज' या मूळ शब्दापासूनत्याची उत्पत्ती झाली आहे. 'प्लास्टिकोज' म्हणजे पुनर्मुद्रण (रिमॉडेलिंग). 'प्लास्टिक सर्जरी' म्हणजे 'उती पुनर्मुद्रण कला' (टिश्यू रिमॉडेलिंग). 'प्लास्टिक सर्जरी' ही कुठल्याही एका अवयवाशी निगडित नाही. 'प्लास्टिक सर्जरी' ही नखांपासून ते केसापर्यंत कोणत्याही बाह्य अवयवावर वापरता येते. केसरोपण (हेअर ट्रान्सप्लांट), लायपोसक्शन व टमी टक, स्तनांच्या सौंदर्य शस्त्रक्रिया, नाक सुंदर बनविणे (रायनोप्लास्टी) या प्रकारच्या अ‍ॅस्थेटिक सर्जरी हा 'प्लास्टिक सर्जरी'चा एक भाग आहे.

 

याव्यतिरिक्त 'प्लास्टिक सर्जरी' ही बर्‍याच आजारांना उपयुक्त असते, जसे की चेहर्‍यावरच्या जखमा, हातावरील जखमा, मधुमेहामुळे पायावर झालेल्या जखमा (डायबेटिक फूट), जन्मतः असलेले व्यंग, चिवट जखमा, भाजलेल्या जखमांवर उपचार, विकृती सुधारणा, ट्रॉमा री-कनस्ट्रक्शन,कर्करोग री-कनस्ट्रक्शन 'प्लास्टिक सर्जरी'ने उपचार करता येतात. 'प्लास्टिक सर्जरी' ही सर्वसामान्य माणसांनासुद्धा परवडणारी आहे.

 

शस्त्रक्रियेतील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमानंतर (एमएस) एमसीएच किंवा डीएनबी ही पदवी असलेले डॉक्टर 'प्लास्टिक सर्जरी' करण्यासाठी पात्र असतात. 'असोसिएशन ऑफ प्लास्टिक सर्जन ऑफ इंडिया'१५ जुलै हा राष्ट्रीय प्लास्टिक सर्जरी दिन साजरा करतात. यानिमित्त जनजागृती व रुग्णांना मोफत सल्ला व चिकित्सा करण्यासारखे उपक्रम राबविले जातात. याबाबत वृत्तपत्रांतूनही अनेकदा माहिती येते. उपरोक्त आजाराची शंका असणार्‍यांनी तज्ज्ञ डॉक्टरांकडून चिकित्सा करून घेतल्यास त्यांना उपचारांचा निर्णय घेता येऊ शकतो.

 

- डॉ. प्रितीश श्रीकांत भावसार, प्लास्टिक सर्जन

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat