राधेयचा कडाडून हल्ला

    दिनांक  26-Jun-2019राधेय त्वेषाने पेटून उठला होता. त्याचा एकही बाण वाया जात नव्हता. समोर येईल त्याला तो कापत होता. इकडे कृपाचार्य धृष्टद्युम्नावर बरसत होते. त्यांना द्रोणाचार्यांच्या वधाचा बदला घ्यायचा होता.


राधेय आणि नकुल एकमेकांना भिडले. त्यांचे युद्ध अतिशय प्रेक्षणीय होते. त्याचवेळी भीम आणि अश्वत्थामा एकमेकांशी झुंज देत होते. दुर्योधन युधिष्ठिराशी लढत होता. ‘संसप्तकां’च्या सैन्याने अर्जुनाला आव्हान दिले. कृप धृष्टद्युम्नाबरोबर लढले, तर श्रुत्कीर्ती आणि शल्य यांची जोरदार लढाई झाली. शिखंडी कृतवर्मासह लढत होते. दु:शासनाला सहदेवाने आव्हान दिले. भीमाने अश्वत्थाम्याचा पराभव केला. श्रुत्कीर्ती शल्याकडून हरला. सहदेवाने दु:शासनाचा पराभव केला. नकुलने राधेयला आव्हान दिले आणि जोरात हल्ला केला. पण, थोड्याच वेळात राधेयने त्याचे धनुष्य तोडून टाकले. नकुल दुसरे धनुष्य घेऊन लढू लागला. नंतर राधेयचेही धनुष्य तुटले. बराच वेळ दोघे लढत होते. राधेयने एक एक करत त्याची सर्व आयुधे हिरावून घेतती. रथ तोडला, धनुष्य तोडले, घोडे मारले, तलवारीचेही दोन तुकडे केले. तो जाऊ लागला तसे राधेयने त्याला अडवले. धनुष्याच्या टोकाने त्याला मागे वळवून ओढले आणि म्हणाला, “तू व्यर्थच बडबड केलीस! तू माझ्या तोडीचा योद्धा नाहीस. यापुढे लक्षात ठेव, आपल्याहून जे वरचढ आहेत त्यांना आव्हान देत जाऊ नकोस, पण माझ्याकडून पराभूत झाला म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. उलट राधेयशी लढला आहेस याचा अभिमान बाळग. बाळा, तू आता घरी जा किंवा अर्जुनाकडे जा.” राधेयच्या डोळ्यांच्या कोपऱ्यात जमा झालेले अश्रू कुणालाच दिसले नाहीत. ते फक्त श्रीकृष्णच पाहू शकत होता. तो स्वत:शीच म्हणाला, ‘राधेय, आपले वचन विसरला नाही. त्याने कुंतीमातेस वचन दिले आहे की, अर्जुन सोडून तो एकाही पांडवाची हत्या करणार नाही. पण, अपमान सहन करण्यापेक्षा नकुलाचा मृत्यू झाला असता तर बरे झाले असते.’

 

राधेय त्वेषाने पेटून उठला होता. त्याचा एकही बाण वाया जात नव्हता. समोर येईल त्याला तो कापत होता. इकडे कृपाचार्य धृष्टद्युम्नावर बरसत होते. त्यांना द्रोणाचार्यांच्या वधाचा बदला घ्यायचा होता. तो युद्धभूमीतून जसा निघून जात होता, तसा कृपाचार्यांनी त्याचा पाठलाग केला. शिखंडीचे पण कृतवर्मासमोर काही चालत नव्हते. अर्जुनाने ‘संसप्तकां’चे सैन्य पळवून लावले. अनेकांचा संहार केला. दुर्योधन आणि युधिष्ठिर यांचे युद्ध प्रेक्षणीय झाले. युधिष्ठिराने दुर्योधनाचे चार घोडे मारले. पाचव्या बाणाने दुर्योधनाचा सारथी पण मारला. सहाव्या बाणाने ध्वज तोडला आणि सातव्या बाणाने त्याचे धनुष्य तोडून टाकले. आठव्या बाणाने त्याने दुर्योधनाची तलवारही उडवली. त्यानंतरचे पाच बाण दुर्योधनासजखमी करण्यास पुरेसे होते. पण, त्याच्या मदतीला सारे धावून आले. राधेय, अश्वत्थामा, कृप हे दुर्योधनाचे रक्षण करण्यास पुढे आले. आता ते ‘द्वंद्वयुद्ध’ न राहता ‘सार्वत्रिक युद्ध’च सुरू झाले. अखेर युधिष्ठिराने फेकलेल्या एका भाल्याने दुर्योधन जखमी झाला आणि त्याला कृतवर्मा बाजूला घेऊन गेला. सूर्यास्तापर्यंत धुमश्चक्री चालूच होती. दोन्ही बाजूंना सैन्याचे खूप नुकसान झाले होते. राधेयच्या सेनापतिपदाचा पहिला दिवस अशा रीतीने खूपच गाजला. सूर्य मावळला तरीही रात्री पण युद्ध सुरू राहील की काय, अशी भीती सर्वांना होती. पण, दोन्ही बाजूंना सैनिकांनी आपणहून माघार घेण्यास सुरुवात केली. जो तो आपल्या शिबिराकडे जाण्यास उत्सुक होता. पहिल्या दिवशी भीष्म सेनानायक असताना जसे युद्ध झाले तसेच आजचे युद्ध झाले होते. (क्रमश:)

 

- सुरेश कुळकर्णी

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat